भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-४५

४७

संरक्षण मंत्रीपदाची सूत्रे घेण्यासाठी दिल्लीस जाण्यापूर्वी मा. यशवंतराव चव्हाण यांनी केलेले भाषण* (१९ नोव्हेंबर १९६२)
-----------------------------------------------------------
मा. श्री. चव्हाण यांनी त्यांच्याबद्दल ज्यानी प्रशंसोद्‍गार काढले त्यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांना दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली; त्याचप्रमाणे त्यांनी सर्वसामान्य जनांचेही आपण ऋणी आहोत असे म्हटले.
---------------------------------------------------------------
*M.L.C. Debates, Vol. VIII, Part II, 19th November 1962, pp. 34-35.

अध्यक्ष महाराज, गेला अर्धा तास मी भावनापूर्ण भाषणे ऐकत आहे. गेले दोन चार दिवस मी अशाच प्रकारची भाषणे ऐकत आहे, परंतु आज दुपारी खालच्या सभागृहात आणि आता ह्या सभागृहात होणारी सन्माननीय सभासदांची आणि सहकार्याची भाषणे ऐकत असताना माझ्या मनात गहिवरून येते. आज आपल्या भारतामध्ये एक गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या गंभीर परिस्थितीत एका अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी मी जात असताना लांबलचक भाषण करणे मला शोभून दिसणार नाही. हा भाषणाचा प्रसंग नाही, सभेचा प्रश्न नाही, तर एक प्रकारे गांभिर्याचा प्रश्न आहे. एका अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळालेली आहे आणि यामध्ये यशापयशाचा प्रश्न आहे, तो दूरचा प्रश्न आहे, परंतु आपल्या सगळयांची सहानुभूती आणि शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे त्यामुळे मला सामर्थ्य वाटते. ज्या प्रेरणेने मी तेथे जावयाचे ठरविले आहे ती प्रेरणा माझ्या मनात कायम राहील आणि तुम्ही ज्या भावनेने मला पाठवीत आहात त्या भावनेला खंत वाटेल असे माझ्या हातून काहीही घडणार नाही.

आज आपल्यापुढे जो प्रश्न आहे तो सबंध देशाच्या गुंतागुंतीचा प्रश्न आहे तेव्हा उद्या सकाळपासून मी असे ठरविले आहे की राजकीय भाषणे करावयाची नाहीत. संरक्षण मंत्र्यांनी राजकीय भाषणे करू नयेत असा सिध्दांत आहे तो मला पाळावयाचा आहे. ज्याला प्रश्न सोडवावयाचे आहेत त्याच्या भागात त्यामुळे अडचणी येतात तेव्हा त्या जागेवर जात असताना मी माझ्यावर भाषणबंदी घालून जात आहे. आपण आज माझ्याबद्दल ज्या सदिच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्राबद्दल चिंता वाटणारी अनेक माणसे ह्या ठिकाणी आहेत. माझ्या जाण्यामुळे महाराष्ट्र दुबळा होईल असे मला वाटत नाही. एक व्यक्ती गेली म्हणून महाराष्ट्र कदापि दुबळा होणार नाही तर ह्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते निर्माण होतील आणि महाराष्ट्रातील जागृत जनतेची सेवा करतील अशी मला खात्री आहे. महाराष्ट्रातील जनता सुशिक्षित आहे, जागृत आहे, जाणती आहे आणि त्यागाची भावना तिच्या मनात रुजली असल्यामुळे मी निश्चिंतपणे जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आणि विरोधी पक्ष जाणता आणि जागृत आहे म्हणून निश्चिंत मनाने मी येथून जात आहे. माझ्या भावनांची आपण आठवण ठेवाल आणि तुमच्या भावना माझ्याजवळ राहतील एवढे या प्रसंगी मी सांगू इच्छितो.
----------------------------------------------------------------------------
Before leaving for Delhi to become the Union Defence Minister, the members of the House praised Shri Chavan, for his services to Maharashtra and showed confidence in him by moving a resolution to that effect. Replying to the appreceative references about him, he explained the House the national emergency in which he was called upon to hold the reins of Defence Ministry. He gave an assuarance to the people of Maharashtra that he would certainly keep in mind the feelings of and inspiration which he received from the people. Shri Chavan expressed his gratitude to all the Members of the House for their co-operation during his tenure as Minister, Chief Minister and expected the same love and affection in future from the people and their representatives.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org