४६
काँग्रेस पक्षाकडून धाकदपटशा दाखविला गेल्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरलेल्या घबराटीसंबंधी नियम ९६ नुसार चर्चा* (२५ जुलै १९६२)
----------------------------------------------------------------
वरील चर्चेला उत्तर देताना मा. चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर विरोधी पक्षीयांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले व याउलट विरोधी पक्षीयांनीच काँग्रेस जनाना कशा धमक्या दिल्या हे सोदाहरण सांगितले.
---------------------------------------------------------------------------------
*M.L.C. Debates, Vol. VII, Part II, 25th July 1962, pp. 771 to 775.
अध्यक्ष महाराज, ह्या चर्चेपैकी मला एक मुद्दा मान्य आहे आणि त्या बाबतीत सरकारचा आणि विरोधी पक्षाचा मतभेद नाही. ह्या राज्यात लोकशाहीला पोषक असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाने केला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे. ही परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टिने लोकशाहीत एकापेक्षा अधिक पक्ष असणे अपरिहार्य आणि आवश्यक आहे. मी ज्या पक्षाचा प्रतिनिधी आहे आणि हे सरकार चालविण्याची जबाबदारी अंगावर घेतली आहे त्या पक्षाचा आणि सन्माननीय सभासद श्री. राजहंस यांच्यामध्ये ह्याबाबत काही मतभेद नाही. प्रश्न आहे तो यापुढेच आहे. प्रश्न निर्माण होतो तो असा की खरे काय आहे ? तत्त्वाच्या बाबतीत एकवाक्यता आहे. परंतु तपशिलाच्या बाबतीत मात्र अर्थाचा अनर्थ आणि अनर्थाचा अर्थ होतो अशी परिस्थिती आहे. त्यांनी सातार्याबद्दल, पुण्याबद्दल, नाशिकबद्दल कहाण्या सांगितल्या. ही सूचना माझ्याकडे आली तेव्हा वृत्तपत्रातील माहितीच्या सत्यासत्यतेबद्दल माहिती जमविण्याचा मी प्रयत्न केला. मला जी माहिती मिळाली ती सगळी सांगून मी सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु मला जी माहिती मिळाली आहे ती पाहता या सूचनेमध्ये जो आक्षेप घेण्यात आला त्याचा मला संपूर्णपणे इन्कार केला पाहिजे असे मला वाटते. या ठिकाणी जी हकीगत सांगितली गेली तिचा मला स्पष्ट शब्दात इन्कार केला पाहिजे. सरकारी यंत्रणेने काँग्रेसपक्षाची बाजू घेतली असा जो आक्षेप घेण्यात आला तो आक्षेप कोणत्याही प्रकारे स्वीकारण्यास मी तयार नाही. कोणी असे सांगितले की दारू पिणारी माणसे पकडली जातात आणि काँग्रेसवाला असेल तर त्याला सोडून देण्यात येते. त्यांनी दोन तीन उदाहरणे दिली, नाशिकच्या शिवाजी मोर्याचे उदाहरण दिले. ते शेतकरी कामकरी पक्षाचे होते. मला हे सांगावयाचे आहे की, यामध्ये पक्षाचा संबंध नाही. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला खासगी जीवन असते. या खासगी जीवनामध्ये दुसर्या काही खासगी कारणामुळे दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वैमनस्य असू शकते. तसेच आपण हे लक्षात घेतले पाहिजे की प्रत्येक पक्षात बरेवाईट लोक असतात. आमचा पक्ष प्रचंड असल्यामुळे त्या पक्षात कदाचित इतर पक्षांपेक्षा जास्त बरीवाईट माणसे असू शकतील. त्याबाबत आमचा वाटा कदाचित मोठा असेल. शेवटी पक्षातील माणसे झाली तरी ते समाजाचेच चित्र असते. तेव्हा प्रत्येक माणसाची जिम्मेदारी घेणे शक्य नाही. तथापि राज्ययंत्रणेचा ज्या ठिकाणी संबंध येतो त्या ठिकाणी राज्ययंत्रणा कोणत्याही पक्षाची बाजू घेत नाही हे पाहण्याची माझी जिम्मेदारी आहे. म्हणून मला या ठिकाणी स्पष्टपणे असे सांगावयाचे आहे की, ज्या ठिकाणी शासनयंत्रणेने विशिष्ट पक्षाची बाजू घेतली आहे किंवा विशिष्ट पक्षाला संरक्षण दिले आहे अशी एक जरी केस कोणी पुराव्यानिशी माझ्या निदर्शनास आणून दिली तर मी सरकारच्या वतीने माफी मागावयास तयार आहे.
या ठिकाणी काँग्रेसपक्षाकडून झालेल्या अन्यायाची माहिती सांगण्यात आली. परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाची मोठी थोरली यादी माझ्याजवळ आहे. पण मला त्याला वाचा फोडावयाची नाही. कारण जो विजेता आहे त्याने आरडाओरड करणे बरोबर नाही. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले की आपण हे सगळे विसरले पाहिजे. जो जिंकला आहे त्याने विनय दाखविला पाहिजे आणि टीका सहन केली पाहिजे. काही ठिकाणी राजकीय क्षेत्रात काम करणारी माणसे निवडणुकामध्ये खासगी सूड उगविण्याचा प्रयत्न करतात. निवडणुकीला मोठया यात्रेसारखे स्वरूप येत असल्यामुळे अनेक प्रकारची माणसे त्यात येतात. मराठयातून अशीच एक बातमी प्रसिद्ध झाली होती. परंतु निवडणुकीचा संधीकाल असल्यामुळे आम्ही गप्प बसलो होतो. कर्मधर्मसंयोगाने असे झाले की, एका काँग्रेसवाल्यावरही तसाच प्रसंग आला. यामध्ये काही खासगी वैर होते. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी दोन्हीकडून होत असतात. परंतु सरकारी यंत्रणेने कोणत्याही एका पक्षाची बाजू घेतली असे आपल्याला पुराव्यानिशी माप टाकता येणार नाही. निवडणुकीपूर्वीही अशाच गोष्टी होत होत्या. शिवाजी मोर्याचे नाव सांगण्यात आले. परंतु काकासाहेब वाघांना त्यांनी निवडणुकीत विरोध केला म्हणून असे झाले असे नाही. विशेषतः मी या बाबतीत फार जागरूक आहे की मला माहीत असलेल्या सार्वजनिक कार्यकर्त्यांविरुद्ध काही घडले तर यामध्ये काही राजकारण आहे की काय हे प्रथम शोधण्याच मी प्रयत्न करतो. या दृष्टीने मी या सभागृहातील आणि खालच्या सभागृहातील सभासदांशी संबंध ठेवून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. असे असताना कोणत्याही पुराव्याचा आधार न घेता मोघमपणे असे बोलावयाचे की या राज्यात दहशतीचे वातावरण आहे, हुकूमशाहीचे वातावरण आहे, हे अन्यायाचे आहे. या बाबतीत सहिष्णुतेची भूमिका आपण घेतली पाहिजे. मी असे म्हणेन की, लोकशाही वृत्ती फक्त विजयी झालेल्या पक्षानेच दाखवावी हे बरोबर नाही. पराजित झालेल्या पक्षानेही ती दाखविली पाहिजे. या दृष्टीने माननीय सभासद श्री. गोगटे यांनी ''विजयोन्मत्त झालेला पक्ष'' असे जे म्हटले ते बरोबर नाही, असे मला म्हणावयाचे आहे. माननीय सभासद श्री. सोहनी यांनीही काही तक्रारी मांडल्या. जनसंघाच्या लोकांचा पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे. त्यांना वाटते की, राजकारण हा विशिष्ट लोकांचा मक्ता आहे.