भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-१

व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर ज्या ठिकाणी राज्यकारभाराचे मुख्य केंद्र म्हणजे सेक्रेटेरिएट असते तेथे जर अधिवेशन भरविले तर येथे अधिवेशनासाठी जे जनतेचे प्रतिनिधी येतात त्यांना हवी असलेली माहिती ताबडतोब मिळू शकते. राज्यकारभार पाहणारे मंत्री आणि जनतेचे प्रतिनिधी यांचा संबंध सातत्याने येतो आणि ज्या अडचणी असतील त्या शक्य तितक्या तातडीने सुटू शकतात. म्हणून माझे असे मत आहे की, ह्या बाबतीत राजधानीची कल्पना आणून चालणार नाही. शिवाय एखाद्या ठिकाणी अधिवेशन भरविण्यात आले म्हणजेच त्या शहराचे महत्त्व मान्य झाले असेही म्हणता येत नाही. नागपूर शहराचे महत्त्व मंजूर करूनसुध्दा आणि त्यामागे असलेले इतर नैतिक हक्क मान्य करूनसुध्दा राज्यकारभाराच्या सोईच्या दृष्टीने नागपूरला अधिवेशन भरविण्याला मी संमती देऊ शकत नाही.

एका सन्माननीय सभासदांनी असे सांगितले की, नागपूरला सभासदांसाठी जे रेस्ट हाऊस आहे ते येथल्या मॅजेस्टिक हॉटेलपेक्षा किती तरी पटींनी चांगले आहे, पण अध्यक्ष महाराज, मुंबईत रेस्ट हाऊस बांधण्याचे काम सरकारने पुरे केल्यानंतर सन्माननीय सभासदांना मुंबईच बरी असे वाटू लागेल असा मला विश्वास आहे. तेव्हा मला एवढेच सांगावयाचे आहे की, केवळ एखादा प्रश्न निर्माण करून त्यावर चर्चा करावयाची एवढाच सन्माननीय सभासदांचा हेतू असेल तर त्याचा व्यवहाराच्या दृष्टीने काही उपयोग नाही. विरोधी पक्षाचा आणि सरकारचा ह्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मूलतः भिन्न आहे. ह्या सरकारला हे द्विभाषिक चालवावयाचे आहे, ते मोडावयाचे नाही. हे राज्य मोडण्याच्या अपेक्षा जे लोक करीत असतील त्यांना मी एवढेच सांगू शकतो की, त्यांचे ते एक वुईशफुल थिंकिंग आहे, त्यांना पाहिजे तर त्यांनी तसा विचार करावा, पण मी ह्या बाबतीत त्यांच्याशी सहमत होऊ शकत नाही. तेव्हा सन्माननीय सभासद श्री.भिडे यांनी आपला ठराव मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा ठराव मागे घेण्यास त्यांची तयारी नसेल तर माझा ह्या ठरावाला विरोध आहे एवढे सांगून मी रजा घेतो.
----------------------------------------------------------------------------------
Shri Y. B. Chavan, Chief Minister, in his speech on 16th October opposed a resolution moved by an opposition member requesting Government to hold a Session of the Bombay Legislature in Nagpur. He justified his opposition to the resolution with cogent arguments. The resolution was lost.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org