भाग २ विधानपरिषदेतील भाषणे-२३

महाराष्ट्र शासनाच्या कार्याची योग्य परीक्षा व्हावयाची असेल, योग्य असेसमेंट किंवा मूल्यमापन व्हावयाचे असेल तर ते आम्ही जाहीरपणे दिलेल्या कसोटयांवरून जनता करू शकते. त्या कसोटया आम्ही जनतेच्या हातात दिल्या आहेत. परंतु आम्ही समाजवादाचे धोरण जाहीर केल्याबरोबर ताबडतोब कोठे आहे समाजवाद असे विचारून चालणार नाही. कारण हे एक लक्षावधी माणसांच्या दैनंदिन जीवनातून घडणार्‍या प्रयत्‍नातून हळूहळू निर्माण होणारे चित्र आहे. विणकर जेव्हा एखादे महावस्त्र विणण्यासाठी बसतो तेव्हा ते महावस्त्र ताबडतोब तयार होत नाही. सुरुवातीला तो आपल्यासमोर सगळे गुंतागुंतीचे लांब धागे टाकून बसतो तेव्हा आपल्याला सगळा गोंधळ दिसतो. एका धाग्याशी दुसरा धागा समांतर अशा पद्धतीने टाकलेला असे अनेक धागे आपल्याला दिसतात. त्यावरून आपल्याला वाटते की यातून हा कसले महावस्त्र निर्माण करणार? परंतु हळूहळू तो जेव्हा त्या समांतर धाग्यांमधून आडवे धागे टाकण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याच्यातून हळूहळू सुंदर महावस्त्र तयार होत चालल्याचा प्रत्यय आपणास येतो. समाजवाद आणण्यासाठी अशाच तर्‍हेचा प्रयत्‍न हिंदुस्थानामध्ये करावा लागेल आणि तो सर्वांना करावा लागेल. आमची अशी इच्छा आहे की तो समाजवाद लौकरात लौकर यावा, परंतु त्याची काही विशिष्ट प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेतून आपल्याला जावे लागेल. मला असे वाटत नाही, अध्यक्ष महाराज, की या प्रश्नावर मी सभागृहाचा अधिक वेळ घ्यावा.

तिसरी महत्त्वाची अमेंडमेंट सीमा प्रश्नासंबंधी आहे. सन्माननीय सभासदांनी ज्या आग्रहाने आपले विचार मांडले तो मी समजू शकतो. त्यांच्या याबाबतीतील भावना मी समजू शकतो, त्यांची तितीक्षा मी समजू शकतो, तिडीक समजू शकतो. पण एका सन्माननीय सभासदांनी जो वाकडया बोटाचा सिध्दांत सांगितला त्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. आम्हाला कोणाच्या बरणीत बोट घालावयाचे नाही, तर आम्हाला आमची बरणीच परत घ्यावयाची आहे. आम्हाला कोणाकडे वाकडे बोट करावयाचे नाही की वाकडी नजर टाकावयाची नाही. आम्हाला सगळे न्यायाने आणि सरळपणाने करावयाचे आहे. चळवळीची निंदा केली असे म्हटले जाते. चळवळीची निंदा मला करावयाची नाही. हा एक विश्वासाचा प्रश्न आहे. परंतु काय केले असता मार्ग सोपा होईल हे मला सांगितले पाहिजे. तुमच्या चळवळीने हा प्रश्न सुटणार नाही असा माझा विश्वास असेल तर सांगण्याचा मला जरूर अधिकार आहे व माझा असा विश्वास आहे की हा प्रश्न चळवळीने सुटणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची परिस्थिती वेगळी होती. त्याबाबतीत महाराष्ट्रातील जनता एकमताची होती. हा बॉर्डरचा जो प्रश्न आहे तो वेगळा आहे. बंगलोरमध्येही काँग्रेस सरकार आहे आणि येथेही काँग्रेस सरकार आहे असा प्रश्न यामध्ये नाही. हा एक प्रश्न आहे याबद्दल दुमत नाही.

मी असे सांगू इच्छितो की, त्या भागातील जनतेची ही चळवळ आहे हे मी समजू शकतो. तेथील जनतेला वाटल्यास तिने चळवळ जरूर करावी. परंतु त्या जनतेलासुध्दा मी सल्ला देईन की, तिने आपली सर्व शक्ती खर्च होईल असा मार्ग पत्करू नये. येथे काँग्रेस सरकार आहे आणि तेथेही काँग्रेस सरकार आहे असे सांगून हा प्रश्न सुटत नाही. हे निव्वळ काँग्रेसमधील भांडण आहे असे नाही. दिल्लीमध्ये समाजवादी आहेत. येथेही समाजवादी आहेत. दिल्लीमध्ये जनसंघीय आहेत. येथेही आहेत. दिल्लीमध्ये कम्युनिस्ट आहेत. येथेही आहेत. या सर्वच पक्षाचे लोक ते एकाच पक्षाचे असले तरी निरनिराळया भूमिकेतून या प्रश्नाचा विचार करीत आहेत. बंगलोरच्या समाजवाद्यात आणि तेथील समाजवाद्यात तरी या प्रश्नाबाबत एकमत आहे काय? म्हणूनच मी असे म्हणतो की हा काँग्रेस पक्षातील भांडणाचा प्रश्न नाही. बेळगावातील जनतेच्या भावना मी समजू शकतो. त्यांच्या चळवळीवर मला टीका करावयाची नाही. परंतु या सभागृहात बसलेल्या तुम्ही आम्ही काय केले पाहिजे हे मला सांगितले पाहिजे. राजीनाम्याच्या गोष्टी करणार्‍यानी नीट विचार केलेला नाही असे मी म्हणतो. राजीनाम्याचा मार्ग आपला आहे, तो आपण जरूर स्वीकारावा. मला राजीनामा द्यावयाचा असेल त्यावेळी मी इतरांचा सल्ला घेणार नाही. महाराष्ट्र राज्याचा कारभार आम्ही अंगावर घेतला आहे तो राज्य चालविण्यासाठी घेतला आहे, पळून जाण्यासाठी नाही. बेळगावचा एक प्रश्न सोडविण्यासाठी बाकीचे प्रश्न सोडून देवून चालणार नाही. तुम्ही सल्ला दिला आणि मी तो ऐकला तर त्यामध्ये शहाणपणा कोठेच दिसणार नाही. अध्यक्ष महाराज, या राजीनाम्याच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आता जुन्या झाल्या आहेत. या सर्वांतून तुम्ही आम्ही चांगले तावून सुलाखून बाहेर पडलो आहोत. आमचे जे विचार आहेत ते प्रामाणिकपणे जनतेसमोर ठेवले पाहिजेत. जी गोष्ट या सरकारला झेपणार नाही, जी गोष्ट करणे सरकारला शक्य नाही त्या गोष्टीबद्दल खोटी आशा या सरकारने दिलेली नाही. जनतेचा जो कौल येईल तो कौल स्वीकारावा अशी नम्र भूमिका या राज्य सरकारची आहे. जनतेचा येणारा निर्णय आनंदाने स्वीकारण्याची या सरकारची तयारी आहे. त्याबाबतीत कोणतीही खळबळ आम्ही करणार नाही. परंतु आमच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा ओळखून काय करता येईल ते जनतेसमोर स्पष्टपणे ठेवण्याची आमची भूमिका आहे. मी असा सेनापती नाही की आपल्या मर्यादा न ओळखता सैन्याला भलत्या ठिकाणी घेऊन जाईन. मी मागे एक व्यंगचित्र पाहिले होते. युध्दाच्या काळातील ते व्यंगचित्र होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org