भाग १ विधानसभेतील भाषणे-८७

हे कसे शक्य झाले असते आणि लोकांनी ते कितपत मानले असते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अशा वेळी सरकारने आपले काही मत याबाबतीत मांडणे योग्य झाले नसते. ह्या प्रश्नाच्या तांत्रिक बाजूसंबंधी मी आपले मत देऊ शकत नाही. कारण मी तंत्रज्ञ नाही. मी ह्या राज्याचा मुख्यमंत्री झालो असलो तरी पानशेत धरणाचे किंवा अन्य कोणत्याही धरणाचे काम बरोबर झाले आहे किंवा नाही हे सांगण्याचे ज्ञान माझ्याजवळ नाही. माझ्यापेक्षा कदाचित् श्री. देशमुख यांना ते जास्त असेल. परंतु आज त्या क्षेत्रात जे लोक प्रत्यक्ष काम करीत आहेत त्यांना श्री. देशमुखांच्यापेक्षाही ह्याबाबतीत जास्त ज्ञान असेल हे श्री.देशमुखही मान्य करतील, आणि धरणाचे काम बरोबर झाले होते की नाही हे तेच तंत्रज्ञ जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आता ह्या सर्व बाबतीत सरकारचे काय मत आहे हे मांडणे मला योग्य वाटत नाही, आणि ते मला शक्यही नाही.

ह्या सर्व बाबतीत निःपक्षपाती चौकशी व्हावी असे माझ्या मनात होते कारण त्याशिवाय लोकांच्या मनात निर्माण झालेला संशय दूर होणार नाही आणि म्हणूनच गेल्या नागपूरच्या अधिवेशनात मी एक सेवानिवृत्त न्यायाधीश श्री.बावडेकर५० ह्यांच्याकडे हे चौकशीचे काम सोपवून त्यांच्या मदतीला आणखी दोन अधिकारी दिल्याचे जाहीर केले होते.

दुसरी जी अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे ज्यांच्या हातात ह्या चौकशीचे सर्व काम दिलेले होते त्या श्री.बावडेकर यांचा मृत्यू. मी जेव्हा ही हकीगत ऐकली तेव्हा माझ्या मनाला धक्का बसला. पानशेतपेक्षाही जास्त दुर्दैवी ही घटना घडली. निःसंशय ही अत्यंत दुर्दैवी घटना होय. आणि ह्याबाबत कोणाचेही दुमत होऊ शकणार नाही.

अध्यक्ष महाराज, न्यायमूर्ती बावडेकरांच्यासंबंधी माझ्या मनात पूर्वीपासूनच फार आदरभाव होता आणि पूर्वीपासूनच मी त्यांच्यासंबंधी आदरभावाने बोलत होतो. आज निदान विधानसभेत बोलताना तरी त्यांच्या मृत्यूनंतर बर्‍याच लोकांनी त्यांचे गुण स्वीकारलेले आहेत ही विशेष गोष्ट आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, हे सर्व गुण त्यांच्या मृत्यूनंतर स्वीकारण्यात येत आहेत. एखादा मनुष्य जिवंत असताना त्याच्यावर अनेक प्रकारचे आरोप करावेत आणि त्याच्या मृत्युनंतर मग त्या न्यायदेवतेची पूजा करावी हीच जर त्या बाजूच्या लोकांची पद्धत असेल तर मग आमच्यातील गुण त्यांना दिसण्यासाठी आम्हाला मृत्यूच यायला पाहिजे असा त्याचा अर्थ होईल.

मला वारंवार एक गोष्ट प्रामुख्याने विचारण्यात आली की, बावडेकरांचा राजीनामा माझ्याजवळ आल्यावर मी तो प्रसिद्ध का केला नाही? श्री. भंडारे यांनीही हा प्रश्न त्यांच्या भाषणात विचारला की, श्री.बावडेकरांच्या मृत्यूनंतर तरी हा त्यांचा राजीनामा प्रसिद्ध का करण्यात आला नाही? अध्यक्ष महाराज, मला ह्याबाबतीत जी माहिती आहे ती मी आज सभागृहासमोर सांगणार आहे. १३ तारखेला रात्री ११ - ११.३० च्या दरम्यान चीफ सेक्रेटरी माझ्याकडे आले. मी दिवसभर काम करून थकून गेलो होतो. तरी इतक्या रात्री मुख्य सचिव येतात त्याअर्थी काही तरी महत्त्वाचे काम असले पाहिजे असे मला वाटले. आणि मी त्यांना भेटलो. त्यांनी मला त्या दिवशी श्री.बावडेकरांनी राजीनामा दिला असे सांगितले आणि त्यांचे राजिनाम्याचे पत्रही दाखविले. मुख्य सचिवांचे त्यांच्याशी यासंबंधी जे बोलणे झाले त्याविषयीसुध्दा मला त्यांनी माहिती दिली. आमदार श्री.भंडारे यांनी असे विचारले आहे की, चीफ सेक्रेटरींशी आपले बोलणे झाले त्यात ज्या डॉक्युमेंटचा संबंध आला होता व ज्यांचा राजिनाम्यात उल्लेख होता, असे आपले म्हणणे आहे त्याची आपण चौकशी का केली नाही किंवा त्या अधिकार्‍याला त्या जागेवरून का काढले नाही? अध्यक्ष महाराज, ज्या कागदपत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे ते कोठे मिस्प्लेस झाले असतील किंवा कोठे पडले असतील. ते गहाळ झाले असा त्यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यात जे शब्द आहेत ते ''आय् बिलिव्ह'' असे आहेत. साधारणपणे कमिशनच्या ऑफिस प्रमुखाबद्दल त्यांना संशय आला पण त्याबद्दल त्यांनी राजीनामा का द्यावा? आणि सरकारने त्याला चौकशी वगैरे न करता काढून का टाकावे? त्यांनी नुसता संशय व्यक्त केला होता. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सभासद श्री.भंडारे ही गोष्ट मान्य करतील की, कोणावरही संशय आला तर त्याला आपण एकदम शिक्षा देत नाही. त्याच्यावर प्रथम प्रायमाफेसी केस आहे किंवा नाही ही गोष्ट पाहावी लागते आणि त्यात जर असे दिसून आले की संशयाला बळकटी येण्यास जागा आहे तर त्याची इन्क्वायरी करावी लागते. आणि अशी प्रायमाफेसी केस आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता आणि त्यानंतर इन्क्वायरी करण्यासाठी त्यांनी काम चालू ठेवले पाहिजे होते. त्यांनी आपले काम चालू ठेवण्यासंबंधी मंजुरी दिली होती ही गोष्ट मी सांगू इच्छितो. तेव्हा असे म्हणणे की, बावडेकरांना आपल्या कमिशनचे कार्य चालविण्याकरिता साधने दिली गेली नाहीत हे कितपत योग्य आहे?

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org