भाग १ विधानसभेतील भाषणे-६९

अशाच प्रकारची अवस्था आज मला दिसत आहे. परंतु अशा प्रकारची भावना निर्माण होऊ देऊन चालणार नाही. राष्ट्रावर काही संकट येत आहे, संकट येत आहे असे सारखे म्हटल्याने देशाचे संरक्षण होण्याऐवजी देशाचा तोटाच होतो. अशा प्रकारचा भीतीभाव निर्माण करून संकट ओढवून घेण्याचे काही कारण नाही.

एकाची भीती कम्युनिझमची आहे तर दुसर्‍याची भीती मुस्लिमांसंबंधी आहे. कम्युनिस्टांना घाबरण्याचे काही कारण नाही, मुस्लिमांच्या जातीयवादाला घाबरावे असे म्हणणाराही मी नाही. कम्युनिस्टांना घाबरायचे म्हणजे देशात प्रतिगामी वृत्ती निर्माण होण्याची भीती आहे. मुस्लिमांची भीती बाळगल्याने आपल्या मनातील जातीयवाद जागा होण्याचा संभव आहे. या दोन वाईट गोष्टींना टाळून राजकारण आणि समाजकारण आपण पुढे नेले पाहिजे. जातीयवाद निर्माण होत आहे असे म्हणणारेच जातीयवाद आज निर्माण करीत आहेत असे मी म्हणेन. मी जातीयवादी नाही असे छातीवर हात ठेवून कोणालाही सांगता यावयाचे नाही. पाकिस्तान झिंदाबाद, हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा झाल्या नाहीत असे पुनः पुनः सांगून देखील अशा घोषणा झाल्याच होत्या असे सांगण्यात सन्माननीय सभासद श्री. म्हाळगी काय साधणार आहेत हे मला समजत नाही. अशा घोषणा झाल्या नाहीत असे सरकारी अधिकार्‍यानी सांगितलेले आहे. एक सन्माननीय सभासद त्या वेळी स्टेशनवर उपस्थित होते असे श्री. म्हाळगी यांनी सांगितले, पण त्या सन्माननीय सभासदांनी उठून सांगितले की मी असे काही ऐकले नाही, मी ठिकाणी त्या दिवशी नव्हतो; पण ती गोष्ट मान्य करण्यास श्री. म्हाळगी ४२ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा)  हे तयार नाहीत. आपण म्हणता तर अशा घोषणा झाल्या नसतील असे म्हणण्याचा खेळकरपणा दाखवितील अशी अपेक्षा मी केली होती. पण मी म्हणतो तेच खरे, या भूमिकेतून त्यांनी आपले भाषण केले. सरकारमध्ये, सरकारी अधिकार्‍यांमध्ये काही दोष असतील हे मी मान्य करतो. सरकार हे माणसांचेच बनलेले आहे, सरकारी अधिकारी हे देखील माणसेच आहेत. माणसात जे दोष आहेत ते यांच्या ठिकाणी असण्याचीही शक्यता आहे. पण अशा प्रकारची संशयी वृत्ती असेल तर आपण देशाचे संरक्षण करू शकणार नाही, आपल्या स्वतःचेही संरक्षण करू शकणार नाही. पाकिस्तानविषयी सदभावना बाळगणारे लोक हिंदुस्थानात नसतील असे मी म्हणत नाही, बरेचसे असतीलही. सरकारच्या मनातही पाकिस्तानबद्दल सदभावना आहे. इतर देशांप्रमाणे पाकिस्तानबद्दलही सरकारच्या मनात सदभावना आहे. माझे मित्र श्री. म्हाळगी यांच्या मनातसुध्दा आहे असे मी म्हणेन.

असे असताना जर पाकिस्तानच्या लोकांच्या मनातदेखील अशाच प्रकारची एकत्र होण्याची भावना येत असेल तर आम्ही त्यांना दोष का द्यावा ? कदाचित त्यांची ती एकत्र होण्याची भावना वेगळया प्रकारची असू शकेल. या बाबतीत मला असे म्हणावयाचे आहे की, फक्त मुसलमानांनाच दोष देण्यात काहीच अर्थ नाही. मुसलमान लोक अराष्ट्रीय भावनेचे आहेत, असे म्हणून कसे चालेल ? यामुळे दुसरे तिसरे काही होणार नसून आपसात द्वेषभावना मात्र वाढत जाईल, आणि जे मुसलमान अराष्ट्रीय नसतील, त्यांच्या मनामध्ये देखील अशी शंका येण्याचा संभव आहे. म्हणून कोणताही आरोप करताना सारासार विचार करून तसा आरोप करावयाला पाहिजे. हिंदुस्तानात काही लोक तशा प्रकारचे असतील, परंतु एकंदर रीतीने सर्वांनाच त्यामध्ये गोवणे बरोबर होणार नाही. अशाने पाकिस्तानच्या मुसलमानी धोरणाला पाठिंबा देण्यासारखे होईल. मी असे सांगू इच्छितो की, जिनांच्या पद्धतीचा विचार करणारे मुसलमान या राष्ट्रवादी हिंदुस्तानात आम्ही निर्माण होऊ देणार नाही. जिनांच्या वेळी मुसलमानांनी जे काही केले आहे, ते सर्वांना माहीतच आहे. त्याकरिता १०-५ माणसांनी पत्रक काढले म्हणून आम्ही आता घाबरून जाणार नाही. ४० कोटी लोकांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. मुसलमान जर म्हणत असतील की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, तर मी त्याची चिंता करीत नाही. मला असे विचारण्यात आले की त्यांचे भाषण प्रसिद्ध का केले नाही ? मला येथे असेही सांगावयाचे आहे की, त्यांचे भाषण मलाही पसंत नाही. मी असे म्हटले की हे त्यांनी म्हटलेले नाही. त्यांच्या भाषणाची प्रसिध्दी मी काय म्हणून करावी ? मला ही गोष्ट मंजूर नाही. ते भाषण मी का प्रसिद्ध करू नये असे मला विचारण्यात आले. मी ज्यावेळी असे म्हटले की त्यांनी तसे म्हटलेले नाही, या माझ्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवावयास हवा. तेव्हा प्रश्न असा आहे की, देशात अशा तर्‍हेची माणसे असण्याचा संभव आहे. याची तुम्हाला आणि आम्हाला चिंता करावयाला पाहिजे. मुसलमान लोकांच्या मनात एक प्रकारची शंका उत्पन्न करण्याची भावना माझ्या मनामध्ये नाही. माणसाच्या मनामध्ये विचार करण्याची जी प्रवृत्ती असते त्याला आपण आपल्याकडे वळवून घ्यायला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org