भाग १ विधानसभेतील भाषणे-६८

२०

पाकिस्तान व चीनधार्जिणे पक्ष व व्यक्ती यांच्या कृत्यांना आळा घालण्याची कपात सूचना* (१६ मार्च १९६१)
-----------------------------------------------------

कोणाच्याही राष्ट्रविरोधी कृत्यांपुढे सरकार नमणार नाही असे आत्मविश्वासपूर्वक उद्‍गार मा. चव्हाण यांनी या कपात सूचनेवर बोलताना काढले.
--------------------------------------------------------------------
*Maharashtra Legislative Assmbly Debates, Vol. III, Part II (Inside No. 30), 16th March 1961, pp. to 1538.

अध्यक्ष महाराज, या कपात सूचनेच्या निमित्ताने एका महत्त्वाच्या प्रश्नावर या सभागृहात चर्चा झाली आणि पोलिसांविषयक चर्चा मात्र बाजूला पडली, हा यातील मुख्य मुद्दा. या चर्चेमुळे म्हटला तर फायदा झाला, म्हटला तर तोटा झाला असे म्हणता येईल. या चर्चेमुळे एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले गेले, सर्व पक्षांना आपला दृष्टीकोन सभागृहासमोर मांडण्याची संधी मिळाली, सरकारलाही आपली भूमिका सभागृहासमोर ठेवण्याची संधी मिळाली, ही एक चांगली गोष्ट आहे.

अध्यक्ष महाराज, या देशात, या राज्यात काही तरी घडत आहे अशा प्रकारची भावना काही सन्माननीय सभासदांनी करून घेतलेली आहे. असे काही घडावे असे कोणाच्या मनात नसेलही. काही घडत नसताना काही तरी घडत आहे, अशा प्रकारची भावना निर्माण करून घेणे अनाठायी आहे. काही तरी घडत आहे, घडत आहे असे सारखे म्हणत राहिल्यानेच भीती भाव निर्माण होत आहे आणि तोच देशाच्या हिताला जास्त मारक आहे असे मला वाटते. अँन्टि-नॅशनल चळवळींबाबत जागृत असले पाहिजे, जागृत असण्याची आवश्यकता आहे, हे मी कबूल करतो पण सरकार जागृत आहेच असे मी म्हटले तर सभागृह ते मान्य करील असे मला खात्रीपूर्वक वाटते. श्री. म्हाळगी यांना मी स्पष्टपणे असे सांगू इच्छितो की प्रत्येक ठिकाणी काहीतरी घडत आहे असा ज्यांना सारखा संशय येतो ते देशाचे संरक्षण करू शकणार नाहीत, स्वतःचे संरक्षण करू शकणार नाहीत आणि कोणाचेच संरक्षण करू शकणार नाहीत. असे काही घडत आहे किंवा घडावे असे श्री. वर्टी यांच्या मनात आहे असे मला मुळीच सुचवावयाचे नाही. परंतु मला एवढेच वाटते की लोकात अशी भावना निर्माण होण्याचा संभव आहे की, ज्या अर्थी महाराष्ट्राच्या विधानसभेने दोन तास खर्च करून जातीयतेवर आणि अराष्ट्रीयतेवर चर्चा केली त्याअर्थी या राज्यात काही तरी घडत आहे एवढे खास. आमची राष्ट्रीयता काही अलिप्तवादाच्या भूमिकेवर आधारलेली नाही. राष्ट्रीयतेला धोका निर्माण झाला आहे असे समजण्याचे कारण नाही. डोळयात तेल घालून आम्ही जागृत आहोत आणि या प्रश्नाकडे पाहत आहोत. पण जागृतता आणि भीतीभाव यात फरक आहे. आमचा हा भीतीभाव आहे तो कशासाठी आहे हे मी समजू शकत नाही. केवळ वाद घालण्याच्या भूमिकेवरून नाही तर प्रासंगिक म्हणून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावयाची आहे.

निसर्ग सौंदर्याची मजा घेण्यासाठी, आनंद लुटण्यासाठी दोघे मित्र शोकाने चांदण्यात फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले. थोडा वेळ गेल्यानंतर त्यातील एकजण म्हणाला की चांदण्यात फिरावयास जावयास नको. आकाशातील एखादा तारा निखळून पडला आणि नेमका तो आपल्याच डोक्यावर येऊन पडला तर काय करावयाचे ? अशी ही गोष्ट आहे. मला मान्य आहे की तारा निखळून डोक्यावर पडला तर अवस्था फार कठीण होणार आहे. बारकाईनेच पाहावयाचे झाल्यास असे घडण्याची शक्यता नाहीच असे काही सांगता येणार नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org