भाग १ विधानसभेतील भाषणे-६६

अध्यक्ष महाराज, याचप्रमाणे माझे मित्र श्री. जोशी यांनीही आपल्या भाषणात असे म्हटलेले आहे की, या संघटनेची आता आवश्यकता नाही. परंतु मला निश्चित रीतीने असे वाटते की, या संघटनेची आवश्यकता पूर्वी होती आणि आज देखील आहे. ज्या दिवशी त्याची आवश्यकता नाहीशी होईल, त्याच दिवशी ती संघटना बंद करण्यात येईल, याची सन्माननीय सभासदांनी खात्री बाळगावी. आज १५ वर्षापासून ही संस्था काम करीत आहे, त्या संघटनेला विनाकारण एकदम काढून कसे काय टाकता येईल ? मला ही गोष्ट पसंत आहे की, त्या संघटनेच्या बाबतीत इव्हॅल्युएशन करावयाला काहीच हरकत नाही. तज्ञ माणसाकडून, माहीतगार माणसाकडून इव्हॅल्युएशन जरूर केले पाहिजे आणि तसे केले जाईल. प्रत्येक कामाचे इव्हॅल्युएशन केले जाईल. कामाचे इव्हॅल्युएशन केल्यानंतर कामाच्या बाबतीत किती प्रोग्रेस झालेला आहे हे आपणाला दिसून येईल. इव्हॅल्युएशन म्हणजे त्या संस्थेने काय केले आहे याची चौकशी होणार. अध्यक्ष महाराज, मी पुन्हा असे सांगतो की, जोपर्यंत ही संघटना चांगले काम करीत नाही, असे मला वाटत नाही, तोपर्यंत ही संघटना चालू राहावी, असेच मी म्हणणार आणि माझा तसा अनुभव आहे. मी प्रत्येक बाबतीत चौकशी करावयाला तयार आहे. जरूर एव्हॅल्युएशन केले पाहिजे असे मी म्हणेन. आम्हाला प्रत्येक खाते किंवा प्रत्येक संघटना काय काम करते याबद्दल जागरूक राहिले पाहिजे आणि तशी जागृती राहावी म्हणून एव्हॅल्युएशन करणे जरूरीचे आहे, असे मला वाटते.

परंतु अशा तर्‍हेची संघटना सर्वच जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांजवळ नाही. तेव्हा सामान्य माणसांनासुध्दा असे शिक्षण घेणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींच्या बाबतीत मला एवढेच म्हणावयाचे आहे की, होमगार्डसना ज्या तर्‍हेचे शिक्षण दिले जाते, त्यामुळे अत्यंत कुशल आणि अँलर्ट असे नागरिक निर्माण केले जातात. त्यांच्यामध्ये अँटी-सोशल एलिमेंट येऊ लागले आहे असे काही  सन्माननीय सभासद म्हणाले. परंतु अँटी-सोशल एलिमेंट हे कोठेही शिरू शकते. ते होमगार्ड्समध्येच शिरू शकते असे नाही. ते आपल्या पाटर्यांमध्येसुध्दा शिरू शकते. परंतु होमगार्डस् या संघटनेमध्ये शिरू नये म्हणून भरतीच्या वेळी खबरदारी घेतली जाते. या रिक्रुटमेंटसाठी एक अँडव्हायजरी कमिटी नेमलेली असून त्या कमिटीवर विरोधी पक्षाचे सन्माननीय सभासदसुध्दा घेतलेले आहेत. उदाहरणार्थ मुंबईतील अँडव्हायजरी कमिटीवर मला त्यांच्या या इव्हॅल्युएशनची कल्पना मंजूर आहे आणि ती ही एक्सपर्टस लोकांकडून आणि पोलिसांकडून नाही. पोलीस हे होमगार्डस्चे काम एक्झामिन करावयाला एक्सपर्ट होऊ शकणार नाहीत. त्यांच्यामध्ये एक प्रकारची जेलसी आहे, असे मला वाटते. मला असे वाटण्याचे कारण हे आहे की, या संघटनेमुळे पोलीस लोकांची महती किंवा महत्त्व थोडेसे कमी झालेले आहे; असे पोलिसांना वाटत असावे आणि तसे वाटणे स्वाभाविकही आहे. या संघटनेच्या कामाबद्दल एक रिपोर्ट प्रसिद्ध व्हावा आणि त्यावर या सभागृहामध्ये चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी यापुढे ही पद्धत सुरू करू इच्छित आहे. तो रिपोर्ट जर प्रसिद्ध झाला तर सभागृहाला त्यावर चर्चा करण्याला संधी मिळेल. २६५ लोकांच्या नजरेला त्या संघटनेत जे काही दोष असतील ते लक्षात येतील, प्रत्येक मेंबरला दोन कान असल्यामुळे ५३० कानांना ते दोष कळतील तर तो दोष खरा मानावयाला काहीच हरकत नाही. ते मी मानतो. पुढच्या वर्षापासून हा रिपोर्ट हमखास प्रसिद्ध करून त्यावर आपणाला चर्चा करता येईल.

अध्यक्ष महाराज, माझे मित्र श्री.जोशी यांनी आणखी एक मुद्दा असा मांडला आहे की, या संघटनेच्या लोकांना काहीतरी इतर विषयाचे शिक्षण दिले पाहिजे. त्यांनी जे काही सांगितले आहे ते बरोबर आहे असे मी म्हणतो. आम्ही देखील तेच करीत आहोत. त्यांना ट्रॅफिकचे शिक्षण दिले जात आहे. जवळ जवळ ७०० माणसे या ट्रॅफिकचे शिक्षण घेऊन तयार आहेत. निरनिराळया कामासाठी जेवढे ज्ञान आवश्यक आहे तेवढे आज त्यांच्याजवळ आहे आणि तरीसुध्दा त्यांना जर बोलवावयाचे म्हटले  तर आपल्या खर्चात अकारण भर पडेल. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org