भाग १ विधानसभेतील भाषणे-४५

१३

येवले येथील दंगलीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारावरील चर्चा* (१० मार्च १९५८)
------------------------------------------------------------

चर्चेनंतर केलेल्या निवेदनात मा. चव्हाण यांनी सरकारच्या कृतीचे केलेले जोरदार समर्थन.
--------------------------------------------------------------------------
*Bombay Legislative Assmbly Debates, Vol. 6 Part II(Inside No. 26), 15th October 1958, pp. 1505 to 1508.

माननीय अध्यक्ष महाराज, नाशिक जिल्ह्यातील येवले गावी झालेल्या दंगलीसंबंधी आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारासंबंधी येथे जी चर्चा झाली ती मी लक्षपूर्वक ऐकली आहे. या प्रश्नाबद्दलची समग्र तपशीलवार माहिती जरी सध्या मजजवळ उपलब्ध नसली तरी येवले गावात ज्या दिवशी प्रत्यक्ष दंगा झाला त्या दिवशीची आणि त्यानंतरच्या एक-दोन दिवसांची माझ्याजवळ उपलब्ध असलेली हकीकत मी सभागृहाला सांगण्याचा प्रयत्न करीन.

अध्यक्ष महाराज, झालेल्या चर्चेतून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले असे सारांशाने म्हणता येईल. एक प्रश्न असा उपस्थित केला गेला की येवले येथील पोलिस अधिकार्‍याना अशा तर्‍हेची दंगल होणार आहे अशी पूर्वसूचना काही घटनांच्या रूपाने मिळाली असतानाही, दंगलीची थोडीशी कुणकुण लागली असतानाही, त्यांनी दंगल होऊ नये याकरिता आवश्यक ते संरक्षक उपाय योजिले नाहीत. अध्यक्ष महाराज, एका बाबतीत मी माननीय सदस्यांशी सहमत होईन की पोलिसांना दंगल होणार अशी कुणकुण लागली असल्यास त्यांनी आगाऊ बंदोबस्त करावयास हवा होता. अध्यक्ष महाराज, या बाबतीतील चौकशी अजूनही संपलेली नाही. परंतु आजपर्यंत माझ्याजवळ या दंगलीसंबंधी जी जी माहिती उपलब्ध झालेली आहे तीवरून, स्थानिक पोलिसांना या दंगलीला अनपेक्षितरीत्या तोंड द्यावे लागले असाच निष्कर्ष निघतो. अशा प्रकारची दंगल होणार आहे अशा तर्‍हेची पूर्वकल्पना त्यांना नव्हती असे मला मिळालेल्या माहितीवरून दिसून येते. अध्यक्ष महाराज, येवले गावी १९४९-५० च्या सुमारास जातीय तेढीचे काही वातावरण निर्माण झाले होते ही गोष्ट खरी आहे, परंतु ही गोष्ट सात-आठ वर्षांपूर्वीची आहे. अनेक शहरे अशी आहेत की जेथे गणपती उत्सवाच्या निमित्ताने, मोहरमच्या निमित्ताने जातीय तेढीचे वातावरण, अथवा त्या वातावरणाला पोषक परिस्थिती निर्माण होते. सरकारने सर्वच शहरांच्या बाबतीत आगाऊ काळजी का घेतली नाही असे विचारले जाते, परंतु मी या सभागृहाला विश्वासात घेऊन सांगू इच्छितो की, अशा परिस्थितीची अंधुकशी कल्पना आल्यानंतर सरकारने मे महिन्याच्या सुमारास राज्यातील सर्व जिल्हा अधिकार्‍याचे लक्ष या प्रश्नाकडे हेतुपूर्वक वेधले होते आणि आपापल्या जिल्ह्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा व कोणत्याही तर्‍हेची अशांतता निर्माण झाल्यास तिला संघटित रीतीने तोंड देण्याची तयारी ठेवा अशा तर्‍हेच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. अशा प्रकारे धोरण ठरविण्याच्या प्रश्नाबाबत सरकारने वैचारिकदृष्टया आवश्यक ती खबरदारी घेतलेली होती. दुर्दैवाने धुळे, येवले आदि ठिकाणी या दंगलींचा अनपेक्षित रीतीने स्फोट झाला. माननीय सदस्य श्री. हांडे २३ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांनी आपल्या भाषणात येवले येथे अस्तित्वात असलेल्या काही सामाजिक वादांचा उल्लेख केला.

अध्यक्ष महाराज, सामाजिक वादांची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिस सावध का राहिले नाहीत हा वादाचा आणि चौकशीचा प्रश्न आहे. या बाबतीत मी अधिक चौकशी करणार आहे. अध्यक्ष महाराज, ज्या दिवशी दंगल झाली त्या दिवशी सकाळी येवले येथील एका रस्त्यावरच्या मशिदीवरून काही लोकांनी वाद्ये वाजवीत एक मिरवणूक नेली आणि त्यामुळेच वादाला सुरवात झाली. येथे ही गोष्ट सांगणे अनुचित होणार नाही की नगरच्या कोर्टाने वाद्ये वाजवीत जाण्याचा अधिकार आहे असा एक निर्णय दिलेला आहे. या निर्णयाचा कायदेशीर अर्थ काय, त्याच्या मर्यादा किती हा कायद्याचा प्रश्न आहे. परंतु कोर्टाने अशा प्रकारचा निर्णय दिल्यामुळे सर्वांना वाद्ये वाजवीत मिरवणुका नेण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचे एक वातावरण येवले येथे निर्माण झाले असण्याचा संभव आहे. त्या रस्त्यावरील मशिदीवरून काही लोकांनी वाद्ये वाजवीत एक मिरवणूक गेल्यानंतर काही वेळाने दुसरीही मिरवणूक त्या रस्त्याने जावयास लागली तेव्हा या गोष्टीचा तेथील मुसलमानांवर परिणाम झाला व आपले म्हणणे त्यांनी तेव्हा पोलिसांच्या कानावर घातले. परिस्थितीच्या बदलत्या गांभिर्याची पोलिसांना किंचितशी कल्पना आली व त्यांनी दुसर्‍या मिरवणुकीला परत पाठविण्याचा प्रयत्न केला. मिरवणुकीला परत पाठविण्याची एक साधी घटना घडल्यानंतर सर्व शहरात दंगलीचे वातावरण निर्माण झाले. यावरून या वातावरणाला जास्त विस्तृत पार्श्वभूमी असावी असा एक तर्क निघू शकतो हे मला मान्य आहे. पोलिसांनी याचवेळी ताबडतोब बंदोबस्त करावयास हवा होता परंतु तो त्यांनी केला नाही असे म्हणून माननीय सदस्यांनी या बाबतीत एरर ऑफ् जज्मेंट हा शब्द वापरला. त्यांच्या या शब्द योजनेशी मी सहमत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org