भाग १ विधानसभेतील भाषणे-४३

अध्यक्ष महाराज, या बाबतीत माझे असे स्वच्छ मत आहे की, ऑक्ट्रॉय करामुळे अकोला येथील व्यापार्‍याच्या मनात जी नाराजी निर्माण झाली त्याचा आपल्या राजकीय हेतूसाठी काही लोकांनी गैरफायदा घेऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेची सभा झाली त्यापूर्वी पाच-सहा दिवस एकसारखे दंग्याधोप्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला आणि सातव्या दिवशी नगरपालिकेची मीटिंग बंद पाडण्याचे प्रयत्न चालू करण्यात आले. किंबहुना पोलीस फायरिंग कसे करीत नाहीत हे आम्ही पाहतो अशी भाषाही बोलली जात होती.

अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सत्याच्या नावाखाली असत्य सांगितले गेले. मी सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. हा सर्व प्रश्न राजकीय दृष्टिकोनातून हाताळण्याचा जो प्रयत्न होत आहे तो पाहून मला खेद होतो. नगरपालिका ही एक लोकशाही पद्धतीने आणि लोकमताने स्थापन झालेली संस्था आहे. निर्णय घेण्याचा अधिकार या संस्थेला आहे. अशा परिस्थितीत ऑक्ट्रॉय करासंबंधीचे आपले म्हणणे विशिष्ट पद्धतीने मांडावयाला हरकत नसावी. परंतु ते मांडल्यानंतर निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नगरपालिकेला असले पाहिजे. त्या संस्थेवर अशा रीतीने दडपण आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करणार असतील तर लोकशाहीचे संरक्षण कसे होईल हे कळत नाही. लोकशाहीविरोधी कृत्यांना आळा घालणे हे पोलिसांचे कामच आहे. परंतु लोकशाही विरोधी चळवळीचा बंदोबस्त करण्याची पोलिसांमधील हिम्मत कमी करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून होतो. लाठीमार झाला याबद्दल कोणालाही खेदच होईल. मला स्वतःलादेखील त्याचे दुःख होते.

जखमी झालेल्या माणसांची नावे मी आणलेली आहेत. त्यामध्ये पोलीस सोडून ५९ माणसांना जखमा झाल्या आहेत. एकूण ३६ पोलीस अधिकारी आणि पोलीस जखमी झाले. जखमी झालेल्या ५९ माणसांपैकी ५ माणसांना फॅ्रक्चर्स झाली आहेत. त्यातील चार फ्रॅक्चर्स हाताच्या बोटांची आहेत. एकाच्या बोटाचे फ्रॅक्चर लाठीमाराचे नसून पळण्याच्या धांदलीत जमिनीवर पडल्यामुळे ते मोडले असले पाहिजे असा अभिप्राय डॉक्टरनी दिला आहे. इन्डिस्क्रिमिनेट फायरिंग केले जाते असा आमच्यावर नेहमी आरोप केला जातो. याबाबतीत शक्य तितकी दक्षता घेतली जावी म्हणून १०० यार्डाच्या पलीकडे लोकांना उभे करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तथापि लोक गल्ल्यांमध्ये बसून राहत होते आंणि चढाई किंवा हल्ले करण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांना लाठीमार किंवा गोळीबार करावयाला भागच पाडावयाचे अशी काही लोकांची योजना होती. नगरपालिकेला वेढा देवून जी माणसे उभी होती त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांनी प्रथम टीअरगॅसचा उपयोग केला. गंभीर परिस्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीनेच टीअरगॅसचे साधन पोलिसांना देण्यात आले होते आणि परिस्थिती पाहून त्यांनी ते वापरले. टीअरगॅसचा उपयोगदेखील पनिशमेंट म्हणून करण्यात आला नाही. केवळ प्रिव्हेन्टिव्ह मेझर म्हणूनच करण्यात आला. तथापि या प्रिव्हेन्टिव्ह मेझरचा जेव्हा उपयोग होईना आणि लोक गल्ल्यागल्ल्यांतून गनिमी काव्यासारखे दगडफेक करून पोलिसांवर हल्ले करू लागले तेव्हा पोलिसांना लाठीमार करणे भाग पडले. ऑक्ट्रॉय कराचा विचार करण्यासाठी नगरपालिकेची सभा होणार होती त्या दिवसापूर्वीपासून पाच-सहा दिवस सभा भरवून, मिरवणुका काढून आणि घोषणा करून ऑक्ट्रॉय करविरोधी समितीने आपला निषेध व्यक्त केला होता. नगरपालिकेच्या सभासदांनी हा निषेध ऐकला होता, आणि तो विचारात घेऊन या कराबद्दलचा निर्णय ते घेणार होते.

अशा परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी नगरपालिकेचे लोकनियुक्त सभासद नगरपालिकेच्या सभागृहात जमले असताना आणि लोकशाही मार्गाने ते निर्णय घेणार असताना त्या ठिकाणी जमून सत्याग्रहाचे किंवा दगडफेकीचे वातावरण निर्माण करणे हे लोकशाहीला धरून आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांना तसे वाटो, परंतु हे सरकार या राज्यात अशी कृत्ये कधीही चालू देणार नाही हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. या राज्यात किंवा या देशात पोलिसांच्या हाती जे शस्त्र दिले आहे ते लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी दिले आहे आणि लोकशाहीविरोधी किंवा लोकशाहीचा खून करणारी कृत्ये जर या राज्यात होऊ लागली तर या शस्त्रांचा उपयोग करण्यास सरकार मागेपुढे पाहणार नाही. कोठेही आणि कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करण्याचे आणि कोठेही घुसण्याचे स्वातंत्र्य असावे हा लोकशाहीचा अर्थ असेल तर मग पोलिसांची आवश्यकता काय ? अकोल्यामध्ये परिस्थितीची दखल घेऊन पोलिसांनी जे केले ते केले नसते तर ते आपल्या कर्तव्याला चुकले असे झाले असते. त्या ठिकाणी पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे असे मला वाटते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org