१२
अकोला येथे झालेल्या लाठीमारावर चर्चा* (१० मार्च १९५८)
------------------------------------------------------
* चर्चेस मा. यशवंतराव चव्हाणांनी दिलेले उत्तर.
--------------------------------------------------------------------------
* Bombay Legislative Assmbly Debates, Vol. 5. Part II (Inside No. 16), February-March 1958, 10th March 1958, pp.781 to 786.
अध्यक्ष महाराज, सन्माननीय सभासद श्री. बर्धन यांनी अकोला येथे झालेल्या लाठीमारासंबंधी जी चर्चा सुरू केली त्या चर्चेतील सर्व भाषणे मी अतिशय काळजीपूर्वक ऐकली. सन्माननीय सभासद श्री बर्धन हे आपले भाषण करताना सारखे सांगत होते की, ते अत्यंत जबाबदारीने बोलत आहेत. तसे त्यांनी खरोखर केले असते तर बरे झाले असते, असे मला म्हणावयाचे आहे. कारण आपल्या भाषणात त्यांनी केलेली पुष्कळशी विधाने खरी आहेत असे मानावयाला मी तयार नाही. ज्या दिवशी लाठीमार झाला त्या दिवशी श्री.बर्धन आणि विरोधी पक्षाचे नेते श्री. उद्धवराव पाटील हे माझ्याकडे आले होते. अकोल्याला लाठीमार झाला असल्याचे त्यांनी मला सांगितले आणि त्याचबरोबर त्या लाठीमाराच्या चौकशीचीदेखील त्यांनी मागणी केली. अध्यक्ष महाराज, अकोल्याला लाठीहल्ला झाल्याची माहिती इतक्या तातडीने विरोधी पक्षाचे नेते श्री. उद्धवराव पाटील आणि सन्माननीय सभासद श्री बर्धन यांनाच प्रथम टेलिफोनने मिळते ही घटना लक्षात घेण्यासारखी आहे, असे मला नम्रपणे या सभागृहाला सांगावयाचे आहे.
अध्यक्ष महाराज, ऑक्ट्रॉय कराचा जो प्रश्न आहे त्यासंबंधीचा इतिहास लांबलचक आहे. हा कर आवश्यक आहे की अनावश्यक आहे या चर्चेत मी जाऊ इच्छित नाही पण या चर्चेच्या अनुषंगाने काही गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे म्हणून मी करणार आहे. ह्या प्रश्नासंबंधी विरोधी पक्षाची व ऑक्ट्रॉय कर विरोधी परिषदेची काही मंडळी मला भेटली होती. त्यावेळी त्यांच्यापुढे ही गोष्ट स्पष्टपणे मांडण्यात आली होती की, ह्या प्रश्नाचा निर्णय लोकमताने निवडलेल्या नगरपालिकेच्या संमतीने करावयाचा आहे. तथापि ऑक्ट्रॉय कराला आमचा विरोध नाही किंबहुना आमचा असा अनुभव आहे की, ह्या राज्यातील बहुतेक नगरपालिकांचे उत्पन्न जास्तीत जास्त ऑक्ट्रॉय कराचे असते. काही व्यापारी मंडळींना ही गोष्ट नापसंत होती. ३ तारखेला जी गोष्ट घडली तिच्यामागे थोडा इतिहास आहे. ही गोष्ट घडली त्यापूर्वी ८ दिवस जे प्रकार घडले ते लक्षात घेता पोलिसांना अन्याय करावयाचा होता किंवा भांडणे करावयाची होती तर ती पूर्वीच करता आली असती. सन्माननीय सभासद श्री. उद्धवराव पाटील आणि सन्माननीय सभासद श्री. बर्धन यांनी आपल्या भाषणामध्ये असे सांगितले की तेथे पाच-पाच हजार माणसांची या कराविरुद्ध मिरवणूक निघत होती व ते सभा घेत होते. तेथे बंदी हुकूम असताना परवानगी दिल्यामुळेच मिरवणुका निघत होत्या व सभा भरत होत्या तर मग ३ तारखेला हा प्रकार का घडला ? पहिले आठ दिवस जे प्रकार चालले होते ते ३ तारखेला काहीतरी विशिष्ट घडावे म्हणून चालले होते. ३ तारखेला काय घडले हे मी सन्माननीय सभागृहाला सांगू इच्छितो.
अध्यक्ष महाराज, ३ तारखेला सकाळी ह्या ऑक्ट्रॉय कराचे शेडयूल तयार करण्यासाठी नगरपालिकेची सभा भरली होती. ह्या वेळी ऑक्ट्रॉय कर विरोधी चळवळ करणारांची अशी अपेक्षा होती की, आपण बहिष्कार टाकून, हरताळ पाडून लोकांना त्रास दिलेला आहे तेव्हा त्याचा परिणाम काही लोकांवर होऊन हे शेडयूल मंजूर होणार नाही. अध्यक्ष महाराज, लोकमत व्यक्त करण्यासाठी आपल्या घटनेमध्ये तरतूद करून ठेवली आहे. त्याप्रमाणे लोकमत व्यक्त करण्याची योग्य पद्धत असताना लोकमताने नियुक्त झालेल्या म्युनिसिपालिटीच्या सभेत सर्व सभासद चर्चा करण्यासाठी बसले असताना सत्याग्रह करण्याकरिता एक गृहस्थ पूर्वीच तेथे येऊन बसतात आणि तेथे बसून आम्ही उपवास करणार असे जाहीर करून सांगतात. अध्यक्ष महाराज, आपल्या ह्या सभागृहामध्ये असे केले तर काय होईल ? मी असे म्हणतो की, एखादा निर्णय चुकीचा असला तर तो अमान्य आहे असे जाहीर करण्याचा हक्क सर्वांना आहे, पण त्यासाठी असे प्रकार करणे इष्ट नाही. सन्माननीय सभासद श्री.बर्धन यांनी सांगितले की त्या ठिकाणी २०० ते ३०० लोक होते व त्यांना हाकलण्यात आले. येथे जर असा प्रकार झाला तर गृहमंत्री या नात्याने पोलिसांना मी काय सांगणार ? जेथे लोकमताने निवडून आलेले सभासद निर्णय घेतात त्या ठिकाणी काही शहाण्या लोकांनी उपवास करावा आणि त्यांना निर्णय घेऊ नये व पोलिसांनी हे सर्व मुकाटयाने पाहावे ह्या म्हणण्यात काय अर्थ आहे ? २०० ते ३०० माणसे तेथे शिरत होती व म्हणून हा प्रकार घडला ही गोष्ट उघड झालेली आहे.