भाग १ विधानसभेतील भाषणे-३४

१०

प्रतापगडावर जाणार्‍या संयुक्त महाराष्ट्र  समितीच्या सदस्यांबद्दल सरकारने दाखविलेल्या पक्षपाती धोरणासंबंधी चर्चा * (२३ डिसेंबर १९५७)
------------------------------------------------------------

वरील चर्चेत उद्भवलेल्या कांही गोष्टींचा मा. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात परामर्श घेतला.
-------------------------------------------------------------
*Bombay Legislative Assmbly Debates, Vol.4 Part II (Inside No. 19),  23rd December 1957, pp.1203 to 1210.

अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र समिती पक्षाने माझ्या मते दोन चुका केल्या.  एक चूक म्हणजे प्रतापगडावरील समारंभाच्या निषेधाची मोहीम उघडली आणि दुसरी चूक म्हणजे त्याबाबत या सभागृहात चर्चा सुरू केली. आज सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देण्यापूर्वी प्रतापगडावरील समारंभापूर्वीचा थोडासा इतिहास सांगणे मी आवश्यक समजतो. तेव्हा, अध्यक्ष महाराज, थोडेसे विषयांतर होण्याचा संभव आहे. विषयांतर करणे इष्ट नाही असे आपण सांगितल्यास हा मुद्दा मी त्याच ठिकाणी सोडून देईन. सरकार पक्षावर या ठिकाणी जे आरोप केले त्यामागे पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे. हा इतिहास सांगत असताना फार मागे, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जाण्याचे कारण नाही. काँग्रेस पक्षाला शिवाजी महाराजांची एकाएकी आठवण झाली यात द्विभाषिकाला बळकट करण्याचा त्या पक्षाचा हेतू आहे आणि म्हणून आपण प्रतापगडावरील समारंभाला विरोध केला पाहिजे अशी भूमिका प्रारंभी महाराष्ट्र समितीतर्फे घेण्यात आली. अध्यक्ष महाराज, प्रतापगडावर शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात आला त्या मागचा इतिहास अगदी ताजा आहे. सन्माननीय सभासद  श्री. दत्ता देशमुख यांना देखील तो माहीत आहे. श्री. मेहताब१४ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) आणि  श्री. नाईकनिंबाळकर१५ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांची एकदा भेट झाली असता प्रतापगडावर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी द्विभाषिकाचा प्रश्न मुळीच अस्तित्वात आलेला नव्हता. हा ऐतिहासिक सत्याचा प्रश्न आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची आम्हाला आताच का आठवण झाली ?

१९५४ साली आठवण न होता आताच आठवण का झाली ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, अध्यक्ष महाराज, मी अशोक वाटिका न्यायाचे उदाहरण सभागृहापुढे ठेवले तर ते अस्थानी होणार नाही. अशोक वाटिका न्यायाची जी कथा आहे ती अशी आहे की, रावणाने सीतेला हिरावून लंकेत नेले. तिला अशोक वृक्षाच्या झाडाखाली ठेवण्याऐवजी आंब्याच्या झाडाखाली का ठेवण्यात आले नाही ? तिला आंब्याच्या झाडाखाली ठेवण्यात आले असते तरी आंब्याच्याच झाडाखाली का ठेवण्यात आले असा त्या शंकेखोर माणसाकडून प्रश्न विचारला गेला असता.

आम्हाला १९५५ सालीच आठवण का झाली असा प्रश्न विचारणार्‍या लोकांच्या बाबतीत हे उदाहरण तंतोतंत लागू पडते. ह्यावर मी असे म्हणू शकेन की, १९५५ साली आम्हाला आठवण झाली म्हणून झाली. किंबहुना शहाण्या माणसाला शिवाजी महाराजांची आठवण झाली नाही ती त्यावेळी आम्हाला झाली. त्यांच्यापुढे असलेल्या अनेक कामांमुळे त्यांना ती आठवण झाली नसेल तर मी त्यांना दोष देत नाही. १९५५ साली मोठेपणाचा आव आणून जे लोक हिंडत होते त्यांना जे सुचले नाही, ते आम्हाला सुचले. चांगली गोष्ट घडायला चांगली वेळ यावी लागते आणि अशी वेळ आल्यानंतरच आम्हांला शिवाजी महाराजांची आठवण झाली. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती व लोकमान्य टिळक ह्यांच्या जयंतीनिमित्ताने सुट्टी का दिली नाही ह्या गोष्टीला मी जबाबदार नाही. त्यावेळी सन्माननीय सभासद श्री. दत्ता देशमुख हे सुध्दा विधानसभेत काँग्रेसपक्षाचे सदस्य म्हणून होते व तेही ह्या गोष्टीला थोडेफार जबाबदार आहेत.

मला ह्या निमित्ताने एवढेच सांगावयाचे आहे की, ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या उकरून काढण्यात काही अर्थ नाही, परंतु जी गोष्ट चुकली असेल ती मात्र आपण दुरुस्त करू शकतो व ज्या गोष्टी आपणास आवडत नसतील त्या आपण मनात ठेवू शकतो. ज्या गोष्टी चुकल्या असतील त्या आमच्या पद्धतीनुसार दुरुस्त करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो व तो आज आम्ही केलेला आहे.

शिवस्मारक समितीच्या बाबतीत सर्वांच्या विचारानेच गोष्टी झाल्या असत्या ही गोष्ट मी समजू शकतो, त्याप्रमाणे माझ्या खाजगी चर्चेच्या वेळी, प्रतापगडच्या समारंभासाठी पंडित नेहरूंना बोलावण्यात येणार आहे ही गोष्ट मी सन्माननीय सभासद श्री. दत्ता देशमुख ह्यांना सांगितली होती. हा समारंभ सर्वपक्षीय पातळीवरून व्हावा हे मात्र आम्हाला सुचले नाही. त्यानंतरच्या प्रयत्‍नामध्येही समितीला भाग घेण्याची इच्छा होती हे खरे आहे. परंतु त्या गोष्टीची त्यांनी आम्हाला कल्पना द्यावयास पाहिजे होती. कारण आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल जितका अभिमान आहे तितकाच हिंदुस्तानातील प्रत्येक जिवंत माणसाला असला पाहिजे ही गोष्ट मला मान्य आहे. परंतु अध्यक्ष महाराज, ह्या प्रश्नास जी सुरुवात झाली तीच मुळात विचित्र तर्‍हेने झाली. पंडित नेहरूंना प्रतापगडच्या समारंभास जावयाचे असेल तर आमची प्रेते पडतील अशी भाषा वापरण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org