भाग १ विधानसभेतील भाषणे-२७

कॉर्पोरेशनने जरी ह्या कामाला विरोध केला असला तरी सर्व जनतेच्या हितासाठी सरकारला ते करावे लागले असते. कॉर्पोरेशनने ठराव पास केला आहे ह्या गोष्टीवर जास्त भर देण्याचे कारण नाही. कॉर्पोरेशनने नको म्हटले आणि सरकारला जर ही गोष्ट करणे आवश्यक आहे असे वाटले तर सरकारला ती करावी लागेल.

यानंतर दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की, हे बिल आणण्यामागे काही राजकीय हेतू आहे की काय? वास्तविक, तसा कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू हे बिल आणण्यामागे असण्याची आवश्यकता नाही, पण ज्यांना प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टीकोनातून पाहाण्याची सवय झाली आहे त्यांना तसे दिसत असल्यास मला नवल वाटत नाही. एखादी गोष्ट चांगली असो, वाईट असो, त्यांना ही सवय जडलेली आहे त्यामुळे त्यांना ह्या बिलामागेही राजकीय हेतू दिसत असण्याचा संभव आहे. यानंतर, सन्माननीय सभासद श्री.दत्ता देशमुख जणू काही आपण मोठा पराक्रम करीत आहोत असा आविर्भाव आणून असे म्हणाले की, यशवंतराव आजपर्यंत यशवंतराव होते पण आता यशवंतभाई झाले आहेत. असे बोलून ते बोलणे माझ्या जिव्हारी लागावे असा त्यांचा हेतु असला आणि आपण मोठा पुरुषार्थ केला असे जरी त्यांना वाटत असले तरी त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला आहे असे त्यांनी समजू नये. ते जसे ह्या गोष्टी बोलू शकतात तशा मलाही काही गोष्टी त्यांना सांगता येतील, पण मला तशा कुरापती काढावयाच्या नाहीत. तसे माझ्या मनात असते तर त्यांनाही जिव्हारी लागतील अशी उत्तरे त्यांना मला देता येतील, पण तसे करण्याची ही जागाही नाही, आणि तसे करण्याची माझी इच्छाही नाही.

ह्या बिलावर अनेक राजकीय आणि तात्त्विक आक्षेप घेण्यात आले, पण तसा विचार करू लागलो तर आपण ज्या चांगल्या कामाला सुरुवात करू पाहात आहोत ते कधीच होणार नाही. येथे असे विचारण्यात आले की, अशी किती लोकसंख्या वाढणार आहे अशी सरकारची कल्पना आहे? अध्यक्ष महाराज, मुंबई शहरात द्विभाषिक सुरू झाल्यानंतर लोकसंख्या किती वाढेल यासाठी ह्या सभागृहाला किती माहिती पाहिजे आहे तेवढी माझ्याजवळ आहे. मुंबई शहर किती ओव्हरक्राउडेड झालेले आहे, येथे घरांची टंचाई किती आहे हे काही मी सांगण्याची आवश्यकता आहे असे नाही. सन्माननीय सभासद श्री. भरूचा हे माझ्यासमोर बसलेले आहेत तेच सांगू शकतील की, खरोखरी ह्या शहरात लोकसंख्या किती वाढलेली आहे व ह्या वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी काही नवीन योजना करण्याची आवश्यकता आहे की नाही? त्यांचा जो मतभेद असू शकेल तो पुढच्या प्रश्नाबाबत असू शकेल. ह्या वाढत्या लोकसंख्येची राहण्याची व्यवस्था करावयाची ती कशा प्रकारे करावी आणि किती प्रमाणात करावी ह्या बाबतीत त्यांचा मतभेद असू शकेल. ह्या दृष्टीने जर त्यांनी काही सूचना केल्या असत्या तर ते मी समजू शकलो असतो, पण मुद्दा सोडून त्यांनी हा नगररचना प्रश्न भाषिक प्रांतरचनेशी जो जोडला आहे त्याला माझा विरोध आहे. दुर्दैवाने आज अशी परिस्थिती झालेली आहे की, प्रत्येक प्रश्नाचा विचार करताना तो भाषिक राज्य रचनेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवरून करण्याची काही सन्माननीय सभासदांना सवय लागलेली आहे. ही जी सवय त्यांना लागलेली आहे त्यामुळे प्रत्येक विषयावरील चर्चेत ते नेहमी भाषिक राज्यरचनेचा प्रश्न आणतात. यावरून त्यांची ह्या प्रश्नावर किती निष्ठा आहे हे मात्र दिसून येते. याबद्दल त्यांना मी सर्टिफिकेट दिले पाहिजे असे नाही. ह्यावरून मला पुराणातील एका गोष्टीची आठवण येते. सीतेने हनुमंताला त्याने केलेल्या कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून आपला रत्नहार दिला, पण हनुमंत हा रामनिष्ठ होता, त्याला रत्नहाराचे विशेष काही वाटत नव्हते, म्हणून त्या रत्नहारात राम आहे की नाही हे पाहाण्यासाठी त्याने रत्नहारातील एक एक मणी फोडून पाहिला. हनुमंताने अशा प्रकारे जशी रामनिष्ठा दाखविली तशीच विरोधी पक्षातले काही सन्माननीय सभासद भाषिक प्रांतरचनेच्या प्रश्नावरील आपली निष्ठा दाखवीत आहेत असे म्हणावे लागते. पण प्रत्येक मण्यात राम आहे की नाही हे पाहाण्यासाठी हनुमंताने प्रत्येक मणी फोडून पाहिल्यामुळे रत्नहाराची जी अवस्था झाली ती अवस्था प्रत्येक प्रश्न भाषिक प्रांतरचनेच्या चष्म्यातून पाहिल्याने होईल. ज्या प्रश्नावर सन्माननीय सभासद त्यांची निष्ठा आहे असे दाखवीत आहेत ती निष्ठाही जावयाची आणि आपल्यापुढे जे काम आहे तेही व्हावयाचे नाही अशी परिस्थिती ओढवेल असे मला त्यांना सांगावयाचे आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org