भाग १ विधानसभेतील भाषणे-२२

सरकारविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव * (१६ ऑक्टोबर १९५६)
-----------------------------------------------------
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील गोळीबारात १०० व्यक्ती मृत्युमुखी पडल्याच्या निषेधार्थ हा प्रस्ताव विरोधी सदस्यांनी मांडला असता मा. यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेले विचार.
------------------------------------------------------
* Bombay Legislative Assmbly Debates, Vol.32, Part II (Inside No. 12, October 1956. 16th October 1956, pp. 477 to 482.

अध्यक्ष महाराज, सन्माननीय सभागृहापुढे विरोधी पक्षाचे सन्माननीय सभासद श्री. भरूचा यांनी सरकारविरुद्ध जो अविश्वासाचा ठराव आणला आहे त्यासंबंधी माझे विचार मांडणे आवश्यक वाटले म्हणून मी बोलावयास उभा राहिलो आहे. विशेषतः मी सन्माननीय सभासद श्री. भरूचा, श्री.एस्.एम्.जोशी व श्री. दत्ता देशमुख यांची भाषणे काळजीपूर्वक ऐकली आहेत, आणि त्यासंबंधी दुसरी एक बाजू आहे ती त्यांच्यापुढे, जनतेपुढे आणि सभागृहापुढे ठेवणे आवश्यक आहे म्हणून मी ह्या चर्चेत भाग घेत आहे. सन्माननीय सभासद श्री.एस्.एम्.जोशी यांनी आपल्या भाषणाला सुरवात करताना एक प्रकारचे औदार्य दाखविले आहे त्याबद्दल आदराची भावना ठेवून उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

अध्यक्ष महाराज, येथे जो प्रश्न निर्माण होतो तो माझ्या मताप्रमाणे दोन तीन तर्‍हेचा प्रश्न निर्माण होतो. पहिली गोष्ट अशी की, ज्या प्रश्नासंबंधी गेले वर्षभर जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण होते त्या प्रश्नासंबंधी काय काय घडत गेले आणि त्याच्या अनुरोधाने सरकारला काय काय करावे लागले, कोणत्या गोष्टींची उपाययोजना करावी लागली याबाबत विचार करण्याची आवश्यकता स्वाभाविक निर्माण होते. विशेषतः माझे मित्र सन्माननीय सभासद श्री.एस्.एम्.जोशी यांनी आग्रहाने महाराष्ट्रीय मंत्र्यांचा उल्लेख केला आणि साधना वृत्तपत्राचा उल्लेख करून त्या पत्राने त्यांना व पुढार्‍याना प्रायश्चित्त देण्याचा सल्ला दिला असल्याचे निदर्शनास आणले. महाराष्ट्रीय मंत्री म्हणून नव्हे पण मी एक मंत्री आहे, महाराष्ट्रीय आहे आणि वैयक्तिक रीत्या माझा यात संबंध येत असल्यामुळे मला ह्या गोष्टीचा उल्लेख करावा लागतो.

राज्यपुनर्रचनेच्या प्रश्नासंबंधी त्यांनी असा उल्लेख केला की, महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीने काही एका प्रकारची आश्वासने दिली होती व त्या आश्वासनांचा उघड उघड विश्वासघात केलेला आहे. त्यांचे निश्चित शब्द काय आहेत हे माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी असे सांगितले की लोकांची तुम्ही फसवणूक केली आहे व त्यातून हा असंतोष निर्माण झालेला आहे. म्हणून हे प्रायश्चित्त तुम्ही घेतले पाहिजे. अध्यक्ष महाराज, या संबंधाने वारंवार बोलल्या जाणार्‍या गोष्टींची पुनरावृत्ती करावी लागते याबद्दल क्षमा मागून मी असे म्हणतो की विरोधी पक्षातील सभासद आणि विशेषतः सन्माननीय सभासद श्री.एस्.एम्.जोशी यांनी ह्या प्रश्नाचा शांतपणे विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी हा जो ठराव सभागृहापुढे आणला आहे तो पास होणार नाही याची त्यांना खात्री आहे पण दुसरी एक बाजू लोकांच्या पुढे असावी म्हणून हा प्रश्न त्यांनी येथे आणला आहे. मी समजू शकतो की विरोधी पक्षाचे हे काम आहे पण ही दुसरी बाजू लोकांच्या पुढे ठेवताना आज ते कोणत्या मार्गाने जात आहेत याचाही विचार करावा लागेल. विशेषतः श्री.एस्.एम्.जोशी यांच्याबाबतीत मी असे म्हणेन की, राष्ट्रप्रेमाचे धडे गेली २०-२५ वर्षे महाराष्ट्रात ते ज्या एका पिढीला देत आले आहेत त्या पिढीतील मी एक आहे. पुष्कळ मंडळी पुरोगामी राष्ट्रवादाचा विचार त्यांच्यापासून शिकली आहेत. म्हणून कृतज्ञतेची भावना ठेवून असे सांगू इच्छितो की, आज तुम्ही लोकांच्या मनातील असंतोषाच्या भावना तीव्र ठेवण्याच्या हेतूने चर्चा करीत असून राष्ट्राची सेवा करीत नाही. एकभाषिक राज्यासंबंधी जनतेची मागणी होती याचा ते वारंवार उल्लेख करीत होते. मी आपणास सांगू इच्छितो की, एकभाषिक राज्याचा मी देखील पुरस्कार केलेला होता, परंतु हा पुरस्कार कोणत्या टोकापर्यंत करावयाचा याला काही मर्यादा आहेत. लोकशाही पद्धतीमध्ये एकदा लोकसभेने एखाद्या प्रश्नासंबंधी निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच प्रश्नाबाबत शेंडी तुटो अगर पारंबी तुटो आमचे म्हणणे मान्य झाले पाहिजे असा आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. विरोधी पक्षाच्या मंडळींचा तसा आग्रह दिसत असून त्या मागणीच्या मागचा शहाणपणाचा मक्ता ते आपल्याकडे घेऊ इच्छितात. एका विशिष्ट दृष्टीकोनातून ते ह्या प्रश्नाचा विचार करीत आहेत. एकभाषिक राज्य निर्माण व्हावे ह्या दृष्टीने जी मागणी करावयाची होती ती आपण केलेली आहे. देशामध्ये अशा अनेक तर्‍हेच्या मागण्या होणार आहेत आणि ही मागणी संपली म्हणजे सर्व प्रश्न संपले असे होत नाही, तर अनेक मूलभूत मागण्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा ह्या मूलभूत मागण्या मान्य करून घेताना कोणते संकेत पाळावयाचे यासंबंधी लोकशाही राज्यात काही नियम आहेत की नाहीत ? आम्ही मागणी करतो ती प्रत्यक्षात येईपर्यंत तिच्यासाठी शवेटपर्यंत आग्रह धरणारे काही लोक लोकशाहीत असतात आणि ह्या बाबतीत केवळ पक्षीय भूमिका आम्ही घेतल्याचे सन्माननीय सभासद श्री.देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितल्याचे दिसून येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org