भाग १ विधानसभेतील भाषणे-२१

मुंबई महानगरपालिक मुदतवाढ देणारे विधेयक * (१२ ऑक्टोबर १९५६)
-------------------------------------------------
परिस्थितीत होणार्‍या बदलामुळे सरकारने हा निर्णय घेतला असे स्पष्टीकरण मा.यशवंतराव चव्हाण यांनी केले.
------------------------------------------------------------
(*
*Bombay Legislative Assembly Debates, Vol. 32, Part II (Inside No.9), October 1956. 12th October. 1965, pp. 368-369.

अध्यक्ष महाराज, सन्माननीय सभासद श्री.साने११ (टिप पाहण्यासाठी येथे क्लिक करा) यांना परिस्थिती बदलण्याचे गमक काय आहे व या बाबतीत सरकारचा सल्लागार कोणी आहे काय याची माहिती पाहिजे आहे. त्यांच्या माहितीसाठी मी असे सांगू इच्छितो की, लोकशाही सरकारला ह्या प्रश्नाबाबत सल्ला देण्याची काही मूलभूत परिस्थितीत योजना आहे. उदाहरणार्थ विरोधी पक्षाचे सन्माननीय सभासद परिस्थितीनुसार सूचना करीत असतात. तसेच आपल्या देशातील स्वतंत्र अशा तर्‍हेची जी वृत्तपत्र सृष्टी आहे त्यातून सरकारला सल्ला मिळतो. तेव्हा सल्लागार म्हटले तर लोकशाहीमध्ये अस्तित्वात असलेल्या ज्या स्वतंत्र विचारांच्या योजना आहेत त्यामध्ये मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, हे येते व त्यातून ह्या प्रश्नावर वारंवार सल्ला मिळतो. तसा ह्या प्रश्नाबाबत सल्ला मिळत गेला परंतु ह्या प्रश्नावर निर्णय घेण्याचे गमक परिस्थितीतील होणारे बदल हे आहे एवढे मी सन्माननीय सभासदांनी विचारलेल्या माहितीसंबंधी सांगू इच्छितो.

सरकारला नेहमी निरनिराळे सल्ले देण्यात येत असतात, आणि त्यांचे सरकार स्वागतच करते. अमुक एका गृहस्थाने सल्ला दिल्यास तो स्वीकारावयाचा आणि दुसर्‍या कोणी दिल्यास तो नाकारावयाचा अशी सत्यस्थिती नाही. कोणता सल्ला योग्य आहे यासंबंधीचा अखेरचा निर्णय घेण्याची शक्ती सरकारला असली पाहिजे. विशिष्ट परिस्थितीचे कोणते स्वरूप आहे याचा अखेरचा निर्णय सरकार घेत असते आणि योग्य तो सल्ला मानत असते. एका सन्माननीय सभासदाला अशी भीती पडली आहे की त्याचा सल्ला मानला जात नाही. एखाद्या विशिष्ट पक्षाच्या हिताच्या दृष्टीने सरकार सल्ला स्वीकारते ही त्यांची कल्पना बरोबर नसून त्यांनी या बाबतीतील आपल्या मनातील संशय दूर ठेवला पाहिजे. त्यांच्या मनातील संशयाचे हे पटल दूर होताच जेथे अंधार नाही तेथे त्यांना तो भासणार नाही. एखाद्या विशिष्ट पक्षाच्या हितसंबंधाच्या सुरक्षिततेसाठी सरकार निर्णय घेत नाही अशी मी त्या सन्माननीय सभासदांची खात्री, ते या बाबतीत माझ्याकडे चर्चेस आल्यास, करून देईन आणि या दृष्टीने यासंबंधी मी सभागृहाचा जास्त वेळ घेऊ इच्छित नाही.
------------------------------------------------------------------------
*On 12th  October 1956, Shri Y.B.Chavan, Minister for Local Self-Government, moved in the Legislative Assembly, Bill (No.XLV of 1956) to amend the Bombay Municipal Corporation (Extension of Term Act, 1956), enabling bye-elections to be held by the Bombay Municipal Corporation. In his speech he gave information to the House as required by some Members.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org