इंग्रजांपूर्वी प्राचीन काली मुंबईत काय परिस्थिती होती हे पाहिले तर मुंबई व दमणपर्यंतच्या समुद्र किनार्यावरील पट्टीला अपरांत म्हणत असत. वसईजवळ सोपारा हे त्या वेळी त्या प्रांताचे राजधानीचे नगर होते आणि शिलाहार या प्रांतावर राज्य करीत होते. आणखीही बरीच माहिती देण्यासारखी आहे आणि आजकाल होणार्या ऐतिहासिक उल्लेखामुळे या राजांची नामावळी पुष्कळांच्या तोंडपाठ झाली असेल. या नामावळीसाठी वेळ न दवडता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्राचीन कालापासून मुंबईत राहाणार्या समाजात महाराष्ट्रीय बहुसंख्य होते. मुंबईमध्ये पाठारे प्रभु, यजुर्वेदी ब्राह्मण किंवा कोळी हे मराठी भाषिकच होते. मुंबईमध्ये असलेली जुनी मंदिरे पाहिली तर वाळकेश्वरचे मंदिर हे मराठी भाषिकांनी बांधले होते. मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीवरून आले आहे ती मराठी भाषिक कोळयांची देवता आहे एवढे सांगितले म्हणजे मुंबईत मराठी भाषिक लोक पूर्वापार आहेत हे सिद्ध होते.
मुंबईवर कोणाचा हक्क असावा हा प्रश्न निर्माण झाला याचे कारण हल्लीच्या नव्या इतिहासात सापडते. मुंबईच्या नव्या इतिहासाची आणि हिंदुस्थानच्या नव्या इतिहासाची सांगड झाली आहे. मुंबईच्या वाढीचे कारण काय आहे हे चिकित्सक बुध्दीने तपासून कारणांचे पृथक्करण केले तर मुंबईच्या वाढीस ब्रिटिश राजवट कारणीभूत आहे असे दिसून येते. ब्रिटीश सत्ता आली याचा अर्थ असा आहे की, आमच्यावर एक व्यापारी पद्धतीचे राज्य आले. मुंबईत ब्रिटिशांना पाय रोवता आले नसते आणि मुंबईमध्ये प्रबळ देशी आरमारी सत्ता असती तर हिंदुस्थान परतंत्र झाला नसता. मुंबईमध्ये देशी सागरी सत्ता असती तर परदेशाशी व्यापार करून त्यांनी हिंदुस्थानचे स्वातंत्र्य राखले असते. मुंबईची एकंदर मोक्याची जागा असल्यामुळे मुंबईची वाढ होणे अपरिहार्य होते आणि तशी ती झालीही, पण तिला पारतंत्र्याची जबर किंमत द्यावी लागली. मुंबईमध्ये ब्रिटिश सत्ता आल्यानंतरच्या इतिहासाचा आधार घेऊन चुकीचे निष्कर्ष काढण्यात येत आहेत अशी मला शंका येते. मुंबई कोणाची हा प्रश्न भौगोलिक कसोटीवर सोडवावा लागेल आणि त्या कसोटीने मुंबई ही महाराष्ट्राची आहे हे सत्य आतापर्यंत कोणीही नाकारलेले नाही. महाराष्ट्राबाहेरच्या काही समाजांनी मुंबईच्या बांधणीसाठी व वाढीसाठी जे प्रयत्न केले आहेत, त्यांचे आम्ही ऋणी आहोत. मुंबईचाच व्यापार महाराष्ट्रीयेतरांनी वाढविला आहे असे नसून महाराष्ट्राच्या निरनिराळया भागात महाराष्ट्राबाहेरच्या मंडळींनी आपला व्यापार चालविला आहे. छत्रपति शिवाजी महाराजांनी इतर राज्यातील व्यापारी वर्गाला आग्रहाने निमंत्रण पाठवून महाराष्ट्रात व्यापार सुरू करण्याला सवलती दिल्या. महाराष्ट्रात व्यापारउदीम वाढला पाहिजे अशी आमची दृष्टी भूतकाळी होती आणि आताही तीच राहील. मुंबईच्या वाढीस पुष्कळांची मदत झाली हे आम्ही नाकारीत नाही. किंबहुना अशा तर्हेच्या विकासासाठी देशव्यापी सहकार्याची गरज आहे असे माझे मत आहे. परंतु मराठी भाषिकांना दुःख एवढेच आहे की कोणतेही सयुक्तिक कारण नसताना मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे ठरविण्यात आले आहे, याबद्दल कोणत्या तत्त्वावर मुंबईचा अंतर्भाव महाराष्ट्रात करण्यात आला नाही हे मराठी भाषिकांना न कळल्याने त्यांना दुःख झाले आहे. मुंबई महाराष्ट्रात का असावी याची कारणमालिका मी एक, दोन, तीन एवढेच काय अशा तर्हेने एकशेपाच कारणेही मी सांगू शकेन. तथापि हातच्या काकणाला आरसा कशाला अशी जी मराठीत म्हण आहे, त्या म्हणीला अनुसरून मुंबई महाराष्ट्रात आहे ही उघड गोष्ट असल्यामुळे सर्व कारणे मी येथे मांडत नाही.
मुंबई महाराष्ट्राला का दिली गेली नाही हेच समजत नाही. मुंबईला महाराष्ट्रापासून बाजूला काढल्यामुळे कोणाचे कल्याण झाले आहे हे सांगण्यात आले असते तर बरे झाले असते. मुंबई महाराष्ट्राला मिळाली नाही म्हणून अमुक एका समाजाचे कल्याण झाले आहे असे सांगण्यात आले असते तर महाराष्ट्रात त्यागी वृत्ती असल्यामुळे कदाचित् महाराष्ट्राने या गोष्टीचा विचार केला असता. तथापि तसे काही सांगण्यात येत नाही. मुंबई महाराष्ट्रात न टाकल्यामुळे महाराष्ट्राचेच मात्र अकल्याण झाले आहे असे म्हटल्याखेरीज मला राहावत नाही. अध्यक्ष महाराज, मी येथे माझे म्हणणे मांडत आहे, त्याचा उद्देश असा आहे की, आपल्यामार्फत आमचे म्हणणे भारताच्या लोकसभेपुढे जावे आणि तेथील प्रतिनिधींनी याचा विचार करावा. मी बोलत आहे ते जनतेमध्ये सध्या चाललेल्या आंदोलनाला प्रोत्साहन देण्यासाठी मी बोलत नाही. आंदोलन मार्गासंबंधीची माझी मते मशहूर असून त्याची पुनरुक्ती मी करीत नाही. मुंबईचा प्रश्न कोणत्याही तर्हेच्या असंतोषाची चळवळ पेटविणार्या मार्गाने सोडविला जाऊ नये असे माझे मत आहे. दुसर्याना आपले म्हणणे पटवून मतपरिवर्तनाच्या मार्गाने हा प्रश्न सोडविला पाहिजे असे माझे मत आहे. मुंबईच्या प्रश्नासंबंधी माझ्या अंतःकरणातील विचार हिंदुस्थानच्या लोकसभेपुढे जावेत म्हणून मी हे विचार येथे मांडत आहे. महाराष्ट्रात मुंबई घातली नाही तर महाराष्ट्राचे अकल्याण होईल असे जर मी सिद्ध केले तर मुंबई महाराष्ट्राला द्याल? राष्ट्रनेत्यांना माझी प्रार्थना आहे की त्यांनी मुंबई बाजूला करून महाराष्ट्राचे अकल्याण करू नये.