भाग १ विधानसभेतील भाषणे-११०

परंतु फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडून असे प्रकार होतात हे म्हणणे मात्र मला मान्य नाही. अर्थात या गोष्टी होऊ नयेत आणि त्याला आळा घातला पाहिजे याच्याशी मी सहमत आहे; परंतु माननीय सदस्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या ठिकाणी जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे गार्‍हाणे मांडतो तेव्हा त्याबाबतच्या सर्व बाजू मोकळया मनाने सभागृहासमोर मांडणे आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या बाबीसंबंधाने सत्ताधारी पक्षावर आपण आरोप करतो तेव्हा तशाच प्रकारच्या गोष्टी जर आपल्या पक्षाच्या लोकांकडून होत असल्या तर त्याही मोकळेपणाने या ठिकाणी नमूद करण्याचे धैर्य त्यांच्याजवळ असले पाहिजे. मी पुनः सांगू इच्छितो की, पोलिसांच्या यंत्रणेत कोणत्याही प्रकारचे दोष नाहीत अशा प्रकारचा दावा मी कधीही केलेला नाही; परंतु विरोधी पक्षाचे लोक ज्याप्रमाणे केवळ दोषच दाखवू शकतात त्याप्रमाणे करून मला चालावयाचे नाही. असलेले दोष दूर करण्याचा प्रयत्न प्रथम केला पाहिजे. म्हणून मी सभागृहाला विनंती करीन की पोलिसांच्या प्रश्नाकडे त्यांनी जरा वेगळया दृष्टीकोणातून पाहण्याची जरुरी आहे. पोलीस ही शक्ती अशी आहे की राज्याच्या प्रशासनात तिला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तेव्हा या शक्तीचे सामर्थ्य कोणत्याही प्रकारे कमी होणार नाही असेच प्रयत्न आपले असले पाहिजेत.

माननीय सदस्य श्री. पाटकर यांनी आपल्या भाषणात मुंबईच्या सामाजिक जीवनात अस्तित्वात असलेल्या अ‍ॅन्टी-सोशल लाइफचे वर्णन केले. मुंबईमध्ये अ‍ॅन्टी-सोशल लाइफ किंवा ज्याला आपण रेड-लाइटचे क्षेत्र म्हणतो, अस्तित्वात आहे, नाही असे नाही. आता ते किती प्रमाणात आहे याबद्दल मतभेद होण्याची शक्यता आहे. अर्थात त्याची जाणीव कमी प्रमाणावर होणे अथवा जास्त प्रमाणावर होणे ही गोष्ट प्रत्येकाच्या निरीक्षणावर आणि अनुभवावर अवलंबून आहे. परंतु असा एक एरिया मुंबईमध्ये आहे ही गोष्ट मी नाकारीत नाही. हा एक मोठा जबरदस्त प्रश्न आहे. सामाजिक प्रश्न आहे. या प्रश्नाचे ओझे किंवा त्याची  संपूर्ण जबाबदारी पोलिसांच्या शिरावर टाकून आम्हाला कधीच मोकळे होता यावयाचे नाही. या सामाजिक प्रश्नाची सोडवणूक कशा प्रकारे करता येईल याचा आम्हाला जरूर विचार करावा लागेल आणि थोडया वेळात समजावून सांगण्याइतका सोपा असा हा प्रश्न नाही. आपण सर्वजण मिळून या बाबतीत प्रयत्न केले पाहिजेत एवढेच मला या बाबतीत सध्या सांगावयाचे आहे. हा सामाजिक प्रश्न आहे हे श्री. पाटकर यांनीही कबूल केले आहे.

श्री. पाटकर यांनी अशा प्रकारची तक्रार केली की सामान्य मनुष्याची पोलीस स्टेशनवर दाद लागत नाही. त्यांनी असेही सांगितले की कोणता मनुष्य चांगला आहे, सभ्य आहे, शीलवान आहे आणि कोणता मनुष्य असभ्य आहे, वाईट आहे याचा निर्णय पोलीस अधिकार्‍याने तात्काळ केला पाहिजे आणि आलेला मनुष्य जर चांगला असेल, सभ्य असेल तर त्याला नीट वागणूक दिली पाहिजे. म्हणजे कोणता मनुष्य चांगला आहे हे ठरविण्याचे एक प्रकारे कॅरॅक्टर सर्टिफिकेट देण्याचे अधिकारच पोलिसांना द्यावे लागतील. ही गोष्ट जरी बाजूला ठेवली तरी मनुष्याची स्वाभाविक प्रवृत्ती अशी असते की, दोन माणसे वेगवेगळया कारणास्तव त्याला जर भेटावयास आली असली आणि त्यापैकी एका माणसाचे कपडे मळके असले, फाटके असले आणि दुसर्‍या माणसाचे कपडे नीटनेटके व भारी असले तर तो त्याच माणसाला पहिल्या माणसापेक्षा जास्त मान देईल, त्याचे म्हणणे जास्त सहानुभूतीने ऐकेल. श्री. पाटकरही याला अपवाद असतील असे मला वाटत नाही. एखादा पायी चालणारा मनुष्य श्री. पाटकर यांच्याकडे आला आणि त्याच वेळेस एखादा मनुष्य मोटारीत बसून त्यांना भेटावयास आला तर मोटारीत बसून आलेल्याचे म्हणणे ते प्रथम ऐकतील असे मला वाटते. अर्थात ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि पोलिसही याला अपवाद नाहीत. ही प्रवृत्ती फार चांगली आहे असे मी म्हणत नाही आणि पोलिसांनी अगदी निःपक्षपातीपणे आलेल्या मनुष्याचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे अशा सूचनाही त्यांना आहेत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org