भाग १ विधानसभेतील भाषणे-१००

त्याचप्रमाणे त्यांच्या विवाहासंबंधीसुध्दा चर्चा झाली. तो सर्वच तपशील येथे सांगणे बरोबर होणार नाही. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती अशी की त्यावेळी त्यांचे लग्नच झाले नव्हते आणि त्यामुळे त्यांच्या मुलाला दत्तक घेण्याचा प्रश्नच उपस्थित होणे शक्य नव्हते. तेव्हा अमक्याला दत्तक घ्या असा सल्ला देण्याचा प्रश्नच उदभवणे शक्य नव्हते. परंतु याबाबतीत माझे मत असे आहे की, दत्तक विधानाच्या बाबतीत दत्तक घेणारा आणि दत्तक घेऊ इच्छिणारा यांच्या इच्छेशिवाय दुसरे काय महत्त्वाचे आहे? अर्थात महाराजांनी लोकमताचासुध्दा विचार केला तर ते जास्त बरे होईल. परंतु हा प्रश्न म्हणजे त्यांचे मन वळविण्याचा प्रश्न आहे.

हा त्यांच्यावर दडपण आणण्याचा प्रश्न नाही. त्याचप्रमाणे मी त्यांच्याशी काय बोललो आहे किंवा काय बोलू इच्छितो हा निराळा प्रश्न आहे. मी माझी या प्रश्नाच्या बाबतीत काय मनःस्थिती आहे ते सांगत आहे. याबाबतीत माझे मत असे आहे की, एखाद्या राजघराण्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यापैकी एक बाजू घेऊन वितंडवाद वाढविणे बरोबर होणार नाही. या घराण्यासंबंधी मला आदर आहे. लोकांनासुध्दा त्या घराण्यासंबंधी आदर असल्यामुळे लोकांच्या याबाबतीत काही भावना असणे स्वाभाविक आहे. या भावनांची तीव्रता किती आहे हे मला माहीत आहे. परंतु या राजघराण्याची महाराष्ट्रात प्रतिष्ठा राहील अशा पद्धतीने हा प्रश्न सुटला पाहिजे. तो एकमेकांचे मन वळवून सोडविला पाहिजे. एकमेकांवर दडपण आणण्याचा प्रयत्न करून तो सोडविण्याचा प्रयत्न होता कामा नये. याबाबतीत आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे असे मला वाटते. सौ. पद्मा राजे यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना असे वाटले की त्यांना आता आर्थिक साहाय्य मिळणार नाही. त्या वेळी पुढाकार घेऊन व हिंदुस्थान सरकारशी पत्रव्यवहार करून व सरकारतर्फे काही आर्थिक जबाबदारी  स्वीकारून त्यांना त्यांच्या लाइफ टाइमपर्यंत दरमहा काही तरी आर्थिक साहाय्य देण्याची व्यवस्था करण्याचे श्रेय माझ्याकडे येते. यावरून सौ. पद्मा राजे यांच्याबद्दल माझ्या स्वतःच्या भावना काय आहेत हे आपल्या लक्षात येईल. या दत्तक प्रकरणामध्ये कोल्हापूर शहरात आणि महाराष्ट्रात ज्या भावना व्यक्त झाल्या त्या लक्षात घेतल्यानंतर महाराजे साहेबांनी दत्तक घेण्याची घाई करू नये असे माझे स्पष्ट मत झाले आहे आणि मी ते हिंदुस्थान सरकारला कळविलेले आहे. हिंदुस्थान सरकारला मी अशी विनंती केलेली आहे की त्यांनी महाराजे साहेबांना असा सल्ला द्यावा की अशा तंग वातावरणात दत्तक विधान करून लोकांच्या भावना अधिक तीव्र करण्याने त्यांच्या दृष्टीने, राजघराण्याच्या दृष्टीने आणि आमच्या राज्याच्या दृष्टीनेही अकारण प्रश्न निर्माण होत आहे, लोकांच्या आज ज्या भावना आहेत त्यांच्याविरुद्ध जाऊन दत्तक विधान करण्याचा प्रयत्न करणे बरोबर नाही. अशा प्रकारचे यासंबंधीचे मत आजच महाराष्ट्र सरकारने हिंदुस्थान सरकारला कळविलेले आहे. सध्या दत्तक विधान स्थगित झाले तर ते योग्य होईल अशी यासंबंधीची या राज्य सरकारची भूमिका हिंदुस्थान सरकारला कळविण्यात आलेली आहे. यापेक्षा जास्त मी काय सांगू शकणार? कोल्हापूरच्या जनतेला मी विनंती करीन की कोणाच्याही संबंधाने संशय किंवा राग तिने मनात धरू नये आणि आजचे आंदोलनाचे जे स्वरूप आहे ते तसे ठेवू नये. कोणाच्या तरी राजकीय रागालोभाचा फायदा याप्रसंगी घेतला जाऊ नये. सन्माननीय सभासद श्री.कारखानीस हे कोल्हापूरच्या जनतेचे प्रतिनिधी आहेत. तेव्हा मी त्यांना विनंती करीन की त्यांनी माझ्या या भावना कोल्हापूरच्या जनतेपर्यंत पोहोचवाव्यात. या प्रश्नाचे स्वरूप लक्षात घेऊन अशा प्रकारचा आंदोलनाचा मार्ग जनतेने स्वीकारू नये, कोणावर अकारण संशय किंवा राग धरू नये. यातून आपल्याला काही तरी मार्ग काढला पाहिजे. राजघराण्यातील एकी कायम राहिली पाहिजे, प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे या दृष्टीने यातून मार्ग काढला पाहिजे असे माझे मत आहे. या छोटया प्रश्नाला वादंगाचे रूप देऊन संकट ओढवून घेणे योग्य नाही. हा काय प्रकार आहे हे बाहेरच्या माणसांना समजत नाही. त्यांना वाटते हे काय चालले आहे? हे काय चालले आहे हे मी समजू शकतो, पण बाहेरचा माणूस समजू शकत नाही. सौ. पद्मा राजे यांच्यासंबंधी जनतेच्या काही भावना आहेत. राजाराम महाराजांच्या या महान कन्येविषयी स्त्रियांच्या भावना फार प्रखर आहेत. मुंबईतील आणि कोल्हापुरातील स्त्रियांच्या ज्या भावना आहेत त्या मी समजू शकतो. घरोघरच्या स्त्रियांत त्यांच्याविषयी काही भावना असणे शक्य आहे, माझ्याही घरी त्या भावना आहेत. या भावना मी समजू शकतो. सन्माननीय सभासद श्री.कारखानीस हे कोल्हापूरचे प्रतिनिधी आहेत, तेव्हा मी त्यांना पुनः एकदा विनंती करीन की, मी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या माझ्यातर्फे कोल्हापूरच्या जनतेला जाऊन सांगाव्यात.

दुसरा जो एक मुद्दा या चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आला त्याविषयी थोडासा खुलासा करून मी आपले भाषण संपविणार आहे. हा मुद्दा जाहिरातीसंबंधी होता. सन्माननीय सभासद श्री. अत्रे यांनी या मुद्याचा या ठिकाणी उल्लेख केला. याबाबतीत या सभागृहात मागेही चर्चा झालेली होती आणि जाहिराती देताना कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात, कोणती कसोटी याबाबतीत ठरविण्यात आलेली आहे अशी विचारणाही करण्यात आलेली होती. जाहिराती देण्याच्या बाबतीत एक अ‍ॅप्रुव्हड् लिस्ट आहे यात काही शंका नाही. ही लिस्ट तयार करताना कोणत्या कसोटया लावल्या जातात हा एक प्रश्न आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org