या बायोगॅसच्या सहाय्याने घराघरात स्वयंपाकासाठी आवश्यक तो गॅस देता येईल आणि काही प्रमाणात गावाला वीजही मिळू शकेल. जी जनावरे आपण भाकड समजून कसायाकडे पाठवितो त्यांचे मलमूत्र हे जैविक खत म्हणून वापरल्यास अशी जनावरे पाळणे उत्पादक ठरू शकेल. वनीकरणाने अनेक गरजा भागविणे शक्य होईल. त्याचप्रमाणे सौर ऊर्जेचा वापर भारतात ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणावर करावा लागेल. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात अंकली येथे श्री. अरुण देशपांडे यांनी उत्पादन तंत्रात केलेला प्रयोग, श्री.अ. दाभोळकर यांचे शेतीतील प्रयोग, औरंगाबाद जिल्ह्यातील आरगाव व पुणे जिल्ह्यात विलासराव साळुंखे यांचे प्रयोग, तसेच नगर जिल्ह्यात अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उभे केलेले आदर्श गाव, यांच्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. अरूण देशपांडे यांच्या प्रयोगाप्रमाणे दहा-बारा इंच पाऊस पडणा-या भागात दहा गुंठे जमिनीत पाणी अडवून, पाणी जिरवून आणि सौर ऊर्जेचा योग्य वापर करुन माणसांच्या कुटुंबास चांगले मध्यमवर्गीय जीवन जगता येईल. अशी रीतीने आधुनिक तंत्र विज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागात कल्पकतेने करणे आणि उत्पादन वाढविमे या मार्गाने आपल्याला एकविसाव्या शतकातील आपल्यापुढील समस्यांना सामोरे जाता येईल. या समस्यांवर मात केली तरच भारतीय लोकशाहीची वाटचाल चालू राहील.
आजच्या काळातील आणखी एक समस्येचे विवेचन 'ग्लोबल पॅरॅडॉक्स' ( जागतिक विसंवाद ) या ग्रंथात मोठ्या मार्मिकपणे केल्याचे मला आढळून आले. या ग्रंथकाराचे म्हणणे असे आहे की, एका बाजूला आधुनिक तंत्रविज्ञानामुळे जग झपाट्याने जवळ येत चालले आहे. राष्ट्राच्या सीमांना आज फारसा अर्थ उरलेला नाही. त्यामुळे मानवी मनाला एकीकडे विशालतेचा स्पर्श होत आहे. यापुढे संकुचित वृत्ती ठेवून चालणार नाही याची जाणीव एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवाला झाली आहे. परंतु तंत्रविज्ञानात प्रचंड प्रगती झाली तरी मानवाच्या मूलभूत प्रेरणांमध्ये, त्याच्यातील अंगबूत दोषांत बदल झालेला नाही. आजही माणसांमधील स्वार्थी, स्वयंकेंद्रीत वृत्ती कमी झालेली नाही आणि या वृत्तीतून निर्माण होणारे संघर्षही चालूच आहेत. म्हणजे जग एकीकडे काही बाबतीत एक होत आहे आणि त्याच जगात त्याचवेळी वंश, धर्म, पंथ, जात, भाषा आणि प्रदेश यांच्या दुराभिमानामुळे रक्तपात सुरुच आहेत. सोमालियात दोन टोळ्यांतील लोक एकमेकांचा सहार करीत आहेत, नागा आणि कुकी क्रूरपणे एकमेकांच्या कत्तली करीत आहेत, श्रीलंकेतील तामिळ आणि सिंहली लोकांतील युद्ध वर्षानुवर्षे चालू असून त्यात हजारो लोक मारले गेले आहेत.बॉस्निया आणि सर्बियातील भीषण हत्याकांडाला जगातील सुधारलेली राष्ट्रे आळा घालू शकली नाहीत. अफगाणीस्तानमध्ये यादवी युद्ध वर्षानुवर्षे चालूच आहे. या विसंवादातून मार्ग निघावयाचा असेल तर ममतेतून समतेकडे जाणे आणि सहिष्णुवृत्तीने वागून अहिंसक समाज निर्माम करण्याचा प्रयत्न करणे हा एकच मार्ग आहे. आपण गेल्या काही वर्षामध्ये काश्मीर व पंजाबमध्ये किती मोठी प्राणहानी झाली हे पाहिले आहे. अनुभविले आहे. या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती भारतातील अन्य भागात झाली तर भारतीय लोकशाही टिकू शकणार नाही. विविधतेत एकात्मता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय टिकवून आपण परस्परांशी सहिष्णुतेने वागलो तरच भारतीय लोकशाहीची वाटचाल पुढे चालू राहील.
आता शेवटी सध्या भारतात लोकशाहीला ज्या संकटाने ग्रासले आहे. त्या संकटासंबंधी मी थोडेसे बोलू इच्छितो. हे संकट म्हणजे भ्रष्टाचार आपण कितीही निर्दोष राज्यपद्धती स्वीकारली तरी समाज जर भ्रष्टाचाराने पोखरलेला असेल तर समाजाची प्रगतीच होऊ शकणार नाही. आपल्याला भारतात आज तोच अनुभव येत आहे. आपण लोकशाही पद्धती स्वीकारली आहे. अनेक चांगले कायदे केले आहेत. समाजकल्याणाच्या अनेक योजना आहेत. परंतु तरीही आपल्याकडे गरिबांना न्याय मिळत नाही. मूठभरांची श्रीमंती वाढत चालली आहे. याचे मुख्य कारण भ्रष्टाचार हे आहे. सत्ता आणि संपत्ती यांची अनिष्ट युती झाली आहे. सत्ता मिळविण्यासाठी अमाप खर्च केला जातो. सत्ता हाती आली की, अमाप संपत्ती गैरमार्गाने मिळविली जाते. याचे एक प्रमुख कारण आपली आजची निवडणूक पद्धती हे आहे. निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च केला जातो. गुन्हेगारांची मदत घेतली जाते व सर्व त-हेचा भ्रष्टाचार केला जातो. या दुष्ट चक्रातून अलीकडे राजकारणाचे झपाट्याने गुन्हेगारीकरण होत चालले आहे. पप्पु कलानी, हितेंद्र ठाकूर यांच्यासारखे गुन्हेगार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात हा आपल्या लोकशाहीला लागलेला काळिमा आहे. झुंडशाही, दहशतवाद, खंडणी गोळा करणे हे राजकारणातील गैरप्रकार वाढत गेले तर भारतातील लोकशाही लवकरच संपुष्टात येईल. हे घडू नये यासाठी प्रथम निवडणूक कायद्यात सुधारणा करुन, निवडणूक खर्चावर बंधन आणले पाहिजे. शेषन यांनी आचारसंहिता कठोरपणे लागू करुन उमेदरवांच्या खर्चाचे नियंत्रण केले, ही स्वागतार्ह घटना आहे. ही प्रक्रिया अधिक गतिमान आणि अधिक प्रभावी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे व्यक्तीगत संपत्तीवरही काही निर्बंध असले पाहिजेत. आपल्याकडे ज्याप्रमाणे दारिद्रयरेषा म्हणजे काय हेतज्ज्ञांनी ठरविले आहे, त्याप्रमाणेच श्रीमंतीची रेषा ठेरवून त्यापेक्षा अधिक संपत्ती कोणी जमा केली तर ती शासनाने जप्त केली पाहिजे. अशा कायद्यापेक्षाही समाजाचे शिक्षण करणे, तरुण पिढीवर सुसंस्कार करणे हे प्रबोधन कार्य समाजसेवी संस्थांनी सतत चालू ठेवले पाहिजे. आज आपल्या समाजातील भ्रष्ट वातावरणामुळे आणि भ्रष्टाचाराच्या साखळीमुळे, प्रामाणिकपणे जगणे अशक्यप्राय होऊन बसले आहे.