व्याख्यानमाला-१९९५-९६-७

महाराणी ताराबाईने औरंगजेबाचा पराभव केल्यानंतर खरे तर सारा हिंदुस्थान मराठ्यांना, हिंदवी स्वराज्यासाठी मोकळा झाला होता. परंतु हिंदवी स्वराज्याचा ध्येयवाद फेकून देवून ब्राह्मणी राज्याच्या डबक्यात उड्या मारीत बसलेल्या बेडकांना, शेजारचा द. हिंदुस्थानही निष्कंटक करता आला नाही. छत्रपतींच्या घरात भाऊबंदकी पेटवून पेशवाई निर्माण केली, पेशवाईतही भाऊबंदकी वाढवून शनिवारवाड्यात खुनाखुनी केली, आणि शेवटी शत्रूलाच फितूर होऊन, ब्रह्मावर्ताचे पेन्शन आणि पुण्यातील चौदा हजार बाह्मणांना भोजन, एवढ्या मोबदल्यात सारे मराठी राज्यच इंग्रजांना देऊन मोकळे झाले.

महाराष्ट्रीयांची मने जुळवून दिव्य इतिहास घडविणारे हिंदवी स्वराज्य, पेशवाईने मोडीत काढले आणि संशकल्लोळ, विश्वासघात, फसवणूक, भाऊबंदकी, फंदफितुरी, जातीभेद असा रोगजंतूची कायमस्वरूपी पेरणी, मराठई मनातं करून पेशवाई संपली. इंग्रजी गुलामीचे दावे मराठी माणसाच्याही गळ्यात घट्ट बसले. परंपरागत ब्राह्मणी गळफास तर मूळचाच आवळला गेला होता. या दुहेरी गळचेपीतून सामान्य जनगणाला श्वास घेणेही अवघड झाले होते. गव्हर्नर जनरल एल्फिन्स्टंन कडून पेशवाई श्राद्धाचे ब्राह्मण भोजन उरकून सारा पुणेरी ब्रह्मवृंद पगड्या फिरवून इंग्रजी नोकरीत शिरला आणि वेदमंत्राप्रमाणे “भो पंचम जॉर्ज” ही प्रार्थना म्हणीत, इंग्रजांचे हस्तक म्हणून पुन्हा इथल्या आपल्याच लोकांवर “राज्य” करू लागला. हे जीवघेणे गुलामीचे फास ढिले करायला जोतीबा फुल्यांच्या रूपाने एक महात्मा पुढे सरसावला, तर या ब्रह्मवृंदानी शिव्याशाप, दगडधोंडे, शेणघाण यांचा वर्षाव त्याच्यावर केला. त्याला तोंड देवून त्या धैर्यधर महात्म्याने, ब्राह्मणी वर्चस्वाचा गळफास ढिला केला. त्याचवेळी विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांनी इंग्रजी गुलामीचे दावे ढिले करताना, ब्राह्मणी गळफास मात्र अधिक आवळला आणि म. फुले यांची टिंगळ टवाळी केली. त्यामुळेच बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांची वेदोक्स प्रकरणे पेटवली गेली. क्रांतदर्शी सत्यशोधक चळवळीला त्यामुळेच ब्राह्णणेतर चळवळीचे प्रतिक्रियात्मक स्वरूप आले. राज्रषी शाहू महाराजांनी, ब्राह्मण धर्माने उतरंडीप्रमाणे रचलेल्या एकाच्या तोंडावर दुसरा आशा, जाती व्यवस्थेंलाच आव्हान दिले. सर्वच जातीजमातीच्या गळ्याभोवतीचे गळफास ढिले केले. आपल्या हातातली मांडलिक राजाची एवढीशी सत्ता, शक्ती, साधने यांचा पुरेपूर उपयोग ही जातीपातीची मानसिक गुलामी तोडण्यासाठी केला. एवढेच नाहीतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा तळागाळातील अस्पृश्यांचा नेता उभा करून, मानव मुक्तीचा वारसा पुढच्या पिढीच्या समर्थ हातात दिला.

इंग्रजांची गुलामी केवळ राजकीय नव्हती ती एक महाभयानक वसाहतवादी अर्थव्यवस्थेची गुलामी होती हे लक्षांत यायला पेशवाई बुडाल्यापासून दोन पिढ्यांचा काळ गेला. इंग्रजांच्या राजवटीच्या आडून पाश्चात्य सांस्कृतिक गुलामीचे दावे हिंदुस्थानी जनगणमनावर हळू हळू पण बळकटपणे अडकू लागले. परंपरागत ब्राह्मणी संस्कृतीची मानसिक गुलामी आणि इंग्रजांनी गळ्यात अडकवलेली विलायती संस्कृतीची गुलामी, यांतही मोठा विसंवाद होता. इंग्रजी आचार-विचार प्रचाराच्या संपर्कात येणारी मने, ब्राह्मणधर्माने उभा केलेला मानसिक गुलामीचा आणि भ्रमिष्ट तत्वज्ञानाचा पिंजरा समजून घेऊ लागली. त्यातील अंधश्रद्धा, अमानुष विषमता, शोषण उघडे पडू लागले. लोकहितवादी, म. फुले आणि त्यांच्याही पूर्वी राजा राममोहन रॉय यांच्या वस्तुनिष्ठ आणि सत्यशोधक वृत्तीने जनगणमनावरची, ब्राह्मणी शिकवणुकीमुळे चढलेली नशा उतरू लागली.

आणि अशा ब्राह्मणी विलायती गुलामीच्या जंजाळातून बाहेर पडून मानवतावादी सत्याग्रही जीवनाचा रस्ता दाखवणारा दुसरा महात्मा पुढे आला. सा-या राष्ट्राला त्याने मंत्रगुग्ध केले. माणसाते सत्व जागवल. प्राचीन भारतीय संस्कृतीमधील, अहिंसा सत्य अस्तेय, विविधतेतील एकता, विश्वकुटुंब ही अमृततत्वे, जी ब्राह्मणधर्माने मायावादांत आणि कर्मकांडात बुडवून टाकली होती, ती पुन्हा जागापुढे ठेवली. म. गांधींच्या रूपाने प्राचीन भारतीय संस्कृतीचा आत्माच जणू अवतार धारण करून बोलू लागला. हिंदी जनगणमनाला, म. गांधी थेट जाऊन भिडले. हिंसा, विषमता, स्वार्थ, भोग, स्पर्धा, संघर्ष यांतून रखडत चाललेला मानवी व्यवहार, सा-या मानवजातीलाच अस्वस्थ, असहाय्य करीत होता. त्यांना म. गांधींचे विचार आणि आचार संजीवक वाटू लागले. मानवमुक्ता एक न भूतो असा मार्ग दिसू लागला. बलाढ्य इंग्रजी सत्तेला आव्हान देणारी, आत्मबलावर चालणारी लोकचळवळ उभी राहिली. हीन दीन अवस्थेला जाऊन पोहचलेल्या लोकमानसांतील ईश्वरी शक्तीला आवाज देणारी लोकजागृती, लोकसंघटन करून अन्यायाविरोधी प्रखर आंदोलन करणारी लोकचळवळ उभी राहिली. इंग्रजी राजकीय गुलामीचे दावे तर तोडलेच पण पाश्चात्य संस्कृतीच्या लोंढ्यातून वाहून न जाता, स्वतंत्र स्वयंपूर्ण सत्याग्रही सर्वोदय जीवनपद्धतीचा, नवा मार्ग मानव जातीपुढे उघडून दिला. परलोकवाद मायावाद यातून भारतीय मने मुक्त केली आणि इहवादाची अत्युच्च आनंद देणारी मांडणी करण्याला, नवा समाजधारक विचार आणि आचारही, त्याच्यापुढे ठेवला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org