व्याख्यानमाला-१९९५-९६-६९

आज त्या भेटीविषयी जेव्हा विचार करतो, तेव्हा त्या लोकशाहीचा खराखुरा प्रेमी, लोकराज्याचा पुजारी, जनतेचे राज्य आपण्यासाठी विकेंद्रीकरणाचा पुरस्कर्ता, यशवंतराव चव्हाण यांच्या त्यावेळच्या मानसिक स्थितीची आठवण होते. त्या नंतरचा १९७७ ते १९८० सालचा इतिहास अजून ताजा आहे. त्या विषयी आज काही बोलणे इष्ट नाही. कारण महाराष्ट्रात जे काही घडले त्यात खरोखरच यशवंतरावांचे सहकार्य होते. कै. वसंतरावदादा पाटील काय किंवा शरद पवार व इतर काँग्रेस पुढारी हे सर्व यशवंतरावांना श्रद्धास्थान मानणारे होते. पण जे काही झाले त्याचे परिणाम किवा दुष्परिणाम यशवंतरावांना भोगावे लागले, अशी माझी धारणा आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीवर जसा त्याचा परिणाम झाला तसाच कित्येक व्यक्तींशी वैयक्तिक संबंधात दुरावा आला, हे सत्य आहे. १९८० नंतर जवळ जवळ तीन वर्षे यशवंतरावांनी राजसंन्यासात घालविली. ज्या पक्षाला, लहानपणापासून तनाने व मनाने आपल्या सर्वस्वाचे अर्पण ज्यांनी केले होते ते, त्या पक्षाच्या बाहेर त्यांना रहावे लागले व त्या पक्षात परत जाण्याचे मनोर्धैर्य जव्हा त्यांनी दाखविले त्या नंतरही पक्षाच्या दाराच्या चौकटीत यशवंतरावांना ताटकळत उभे रहावे लागले. पण हे सर्व होत असताना त्यांनी आपल्या मनाचा तोल संतुलीतपणे कायम ठेवला. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या यातना दाखविल्या नाहीत. अशा यातना सहन करण्याची त्यांना सवय होती असे मला वाटते.

माझ्या 'वादळ माथा' पुस्तकात १९६२ साली दिल्लीत दाखल झाल्यानंतर पहिल्या सहा-आठ महिन्यात त्यांना किती प्रकारच्या मानसिक यातना सहन कराव्या लागल्या, या विषयी मी बरेच कांही लिहिले आहे. कारण तो आता इतिहासाचा एक भाग आहे आणि यशवंतरावांचे विषयी जेव्हा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सह्याद्री उभा राहतो. यशवंतरावांनी सह्याद्रीप्रत करणखर मनाने त्यावेळेला बरेच काही सहन केले.

शेवटी माणूस गेल्यानंतर त्या माणसाच्या विषयी काही ठोस चित्र पक्के मनात रहाते. माझ्या दृष्टीने विचाराल, तर माझ्यासाठी एक राष्ट्रवादी, महाराष्ट्र नेता व लोकशाहीवर नितांत श्रद्धा असलेला नेता, अशी आठवण सदैव राहील.

महाराष्ट्राविषयी बोलावयाचे तर, त्यांच्याच शब्दात "महाराष्ट्र राज्य मराठी जनतेच्या कल्याणाचे काम करण्यासाठी निर्माण झाले आहे. मराठी भाषिकांजवळ जे देण्यासारखे आहे, जीवनामध्ये चांगले आहे, उदात्त आहे, त्याच्यात देशासाठी त्याग करण्यासाठी हे राज्य निर्माण झालेले आहे. देशाचे आणि महाराष्ट्राचे हित जेव्हा एकरूप होते, तेव्हा देश मोठा होतो आणि महाराष्ट्रही मोठी होतो."

हा विचार चिरंतन स्वरुपाचा आहे. तसेच लोकशाही विषयी त्यांचे असलेले निस्सीम प्रेम व त्याचे उदाहरण द्यावयाचे झाले तर त्यांना जेव्हा राष्ट्रपती संजीव रेड्डीनी पंतप्रधान होण्यासाठी आमंत्रण दिले, त्या क्षणाची आठवण होते. आज भारतात जे होत आहे ते सत्तेवर येण्यासाठी जी सर्व नेतेमंडळी धडधड करत आहेत ते पाहिले तर विश्वास ठेवता येत नाही की यशवंतरावांना जेव्हा पंतप्रधान होण्यासाठी आमंत्रण आले, तेव्हा त्या परिस्थितीत मला सरकार बनविणे शक्य नाही हे त्यांनी राष्ट्रपतींना सांगितले. आज कोणी नेता असे वागू शकेल काय? हे स्वप्नातही येणे शक्य नाही.

त्या प्रसंगाविषयी यशवंतरावांचे काँग्रेसमधील सहकारी श्री. सी. सुब्रमण्यम जे त्यावेळी तामीळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष होते व काही वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्यात राज्यपाल म्हणून होते - त्यांनी म्हटले आहे की, "पक्षहितासांठी व देशहितासाठी यशवंतरावांनी स्वार्थ बाजूला ठेवला व पंतप्रधानकी मिळाली असता तिचा अव्हेर केला त्याबद्दल मी चव्हाणांचा गौरव करीन. लोकशाही समाजवादाच्या ध्येयासाठी पंतप्रधान पदाचे आमिष ठोकरून मनाचा मोठेपणा दाखविणारा हा भारताच्या इतिहासातील एकमेव नेता होय याची मूर्तिमंत साक्ष पटेत."

यशवंतरावांनी एक लोकशाहीचाच सेवक व भोक्ता म्हणून पंतप्रधानकी नाकारली. हे करताना माझ्या मते त्यांनी संसदीय लोकशाहीला आदराचा मुजरा केला.

त्या यशवंतरावांची आज आठवण करुन मी त्यांना भावपूर्ण अभिवादन करतो व आपले भाषण संपवितो.

- राम प्रधान (२५ नोव्हेंबर १९९५)

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org