व्याख्यानमाला-१९९५-९६-६५

२० नोव्हेंबर १९६२ रोजी यसवंतरावजींच्याबरोबर मीही दिल्लीला गेलो होतो. आम्ही विमानातून दिल्लीला उतरलो तेव्हा कळले की त्या दिवशी पंतप्रधानांनी नवीन सेनाप्रमुख, तसेच संरक्षण मंत्रालयाचा सचिव यांची नेमणूक केली आहे. अर्थातच यशवंतरावाजींना त्या विषयी काही माहिती दिली नव्हती. त्यामुळे दिल्लीला उतरल्यावर ते थोडेसे बेचैन झाले. त्याचे एक विशेष कारण होते. कारण संरक्षण पी. व्ही. आर राव आदल्या दिवसापर्यंत टी. टी. कृष्णामाचारीबरोबर काम करत होते. यशवंतरावांना माहीत होते की टीटीकेंनी संरक्षण मंत्रीपद मिळविण्यासाठी पंतप्रधानांवर बराच दबाब आणला होता. त्यांना असा संशय आली की आपल्याला ते पद मिळाले नाहीतरी कमीत कमी आपल्या खात्रीच्या मनुष्य संरक्षण मंत्रालयाचा सचिव असावा त्यामुळे पी. व्ही. आर. रावं संबंधी त्यांचे निष्ठेबद्दल यशवंतराव थोडेसे साशंक होते.

दुसरे दिवशी शपथविधीनंतर यशवंतराव समक्ष मंत्रालयात गेले. सर्व अधिका-यांबरोबर पी. व्ही. आर. राव सुद्धा त्यांना भेटले. ती पहिली सलामी झाल्यानंतर  सर्व अधिकारी आपापल्या कामांसाठी गेले. काही मिनीटांनी संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी पी. व्ही. आर. राव परत आले. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर होता. संरक्षण मंत्र्यांना भेटून पाच-सात मिनीटातच ते बाहेर आले तेव्हा त्यांचा चेहरा हास्याने व अभिमानाने फुललेला दिसला. मी खोलीत गेल्यावर यशवंतरावांना विचारले की, " आपले काय बोलणे झाले की त्यामुळे पी. व्ही. आर. रावांमध्ये असा फरक पडला."

यशवंतराव म्हणाले, खोलीत येताच राव म्हणाले, "मला माहीत आहे की माझी सचिव म्हणून नेमणूक आपल्याशी सल्लामसलत न करता केली आहे. अशा बिकट प्रसंगी आपल्या विश्वासातील व्यक्ती आपल्या मंत्रालयाचा सचिव असावा हे योग्य आहे. ते आपल्याला करता यावे यासाठी मी या क्षणी रजेवर जाण्यास तयार आहे."

यशवंतरावांनी त्यांना सांगितले, "तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण तुम्हीच संरक्षण मंत्रालयामध्ये सचिव रहावे अशी माझी इच्छा आहे."

ते एकच वाक्य, पण त्या एका वाक्याने पी. व्ही. आर. रावचा उत्साह व कार्यक्षमता कित्येक पटीने वाढली व पुढील पाच वर्षे ते यशवंतरावांच्या खांद्याला खांदा लावून संरक्षण सचिव म्हणून राहिले.

साधनांची ओळख व साधनाचा उपयोग करुन घेण्याची लकब यशवंतरावांना कशी होती त्यासाठी मी हे उदाहरण म्हणून सांगितले आहे. दुसरे एक उदाहरण : संरक्षण सचिव पी.व्ही.आर. राव अत्यंत विद्वान व शिस्तप्रिय आणि कडक. ते सैन्यातील वरिष्ठ अधिका-यांना सुद्धा कामामध्ये धारेवर धरत व त्यांच्या बोलण्याची पद्धत अशी काही होती की, कित्येक वेळा ती अपमानास्पद वाटे. एके दिवशी जनरल चौधरी ब-याच तक्रारी घेऊन रागारागात संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी आले व आपल्या तक्रारीचा पाढा त्यांनी सादर केला. त्यांची विशेष तक्रार होती ती, पी.व्ही.आर. रावांच्या बोलण्याच्या पद्धतीविषयी व थोड्याशा रागीट व उद्धट भाषेबद्दल व ते बोलताना त्यांच्या अविर्भावाविषयी. यशवंतरावांनी हे सर्व ऐकून घेतले आणि मध्येच जनरल चौधरींना विचारले, " आपली सैन्यात किती वर्षे नोकरी झाली?" जनरल म्हणाले, " जवळजवळ पस्तीस वर्षे." त्यावर यशवंतरावाजी जनरल चौधरींना म्हणाले की, "आता जर मी तुम्हाला सांगितले की तुमच्या बोलण्याची पद्धत व अविर्भाव बदला, तर आपल्याला कसे वाटेल?"

जनरल चौधरींना अर्धाएक मिनीट विचार केला, हसले व म्हणाले, "आपल्या बोलण्याचा मतितार्थ मला कळला." त्यावर यशवंतराव एवढेच म्हणाले की, "पी.व्ही.आर. च्या पद्धती विषयी थोडीशी नाराजी आहे याची मला जाणीव आहे, परंतु त्यांची कार्यक्षमता व कामाचा उरक ह्यांची आपल्याला आज जरुरी आहे आणि ते जास्त महत्वाचे आहे. कदाचित त्यांना त्यांचे बोलणे अविर्भाव बदलण्यास मी जर सांगितले, तर त्यांची उपयुक्तता कमी होईल आणि हे करणे बरोबर आहे का?" अर्थातच हे ऐकताच जनरल चौधरी चित्रपट झाले आणि मी हरलो या भावनेने खोलीतून बाहेर निघाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org