व्याख्यानमाला-१९९५-९६-६३

यशवंतरावांचा दुसरा वैचारिक आधारस्तंभ म्हणजे ‘समाजवाद’. काँग्रेसमध्ये समाजवादी समाजरचनेचा संकल्प पक्षाने जाहीर केला पाहिजे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. तसेच महाराष्ट्रात सामाजिक समता व न्याय कसा मिळू शकेल यावर त्यांचा भर होता. ते करताना त्यांचे लक्ष ग्रामीण जनता व त्या जनतेतही गरीब व खालच्या थरातील लोकांपर्यंत निरनिराळ्या योजना व त्याचे फायदे कसे मिळू शकतील याकडे होते. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या मनामध्ये महाराष्ट्राच्या बांधणीचा चार सूत्री कार्यक्रम परिपक्व केला होता. एक शेती, दुसरा उद्योगधंदे, तिसरा मनुष्यबळ आमि चौथा शिक्षण.

शेतीमध्ये त्यांचे लक्ष दुष्काळी भागाचा प्रश्न व त्याचा विकास याकडे विशेष होते. कारण ते स्वतः त्या भागातून आलेले होते. त्या भागातील लोकांचे हाल व त्रास यांचे त्यांना आकलन होते. त्याचबरोबर शेती-उद्योग म्हणून जोपर्यंत प्रगत होत नाही तोपर्यंत ग्रामीण विभागाचा खरा विकास होणार नाही व त्या दृष्टीने कृषिचे औद्योगिकरण व कृषिसंबंधी औद्योगिकरण लवकरात लवकर झाले पाहिजे यावर त्यांनी भर दिला व आज महाराष्ट्रात आणि विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात शेतीसंबंधी किंवा शेतीवर आधारितच जे उद्योधंदे प्रस्थापित झालेले आहेत व ज्यामुळे झपाट्याने ग्रामीण विबागाची प्रगती झालेली आहे याचे सर्व श्रेय यशवंतरावांना आहे.

याचबरोबर महाराष्ट्रात उद्योगधंदे निरनिराळ्या विभागात स्थापन करण्यासाठी ज्या संस्था यशवंतरावांच्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत स्थापन झाल्या त्या आपल्याला सर्व परिचित आहेतच. त्यामध्ये सिकॉम(Sicom), एम. आय. डी. सी. (MIDC), एम. एस. एफ. सी. (MSFC) आहेत. या संस्थांचे जाळे आज सर्वत्र पसरलेले दिसत आहे. या विषयी आणखीन काही बोलण्याची आवस्यकता आहे असे मला वाटत नाही.

आपल्या समाजवादी विचारामध्ये मनुष्यबळाचा उपयोग आणि विकास करण्यासाठी सहकार व सहकारी संस्था याचे गणित यशवंतरावांनी आपल्या मनात पक्के मांडले होते. महाराष्ट्र निर्माण व्हायच्या अगोदरच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये काही सहकारी साखर कारखानदारी सुरू झाली. त्यामध्ये त्या त्या भागातील ग्रामीण नेतृत्वाचा उपयोग चव्हाणांनी केला. वारणामध्ये तात्यासाहेब कोरे, पंचगंगेत रत्नाप्पा कुंभार, सांगलीत वसंतदादा पाटील असे प्रत्येक ठिकाणी ग्रामीण औद्योगिक नेतृत्व निर्माण झाले व ग्रामीण जनता संघटित झाली. या कार्यात यशवंतरावांचे काय योगदान होते त्याविषयी आपल्याला आज काही सांगण्याची मला तरी आवश्यकता वाटत नाही.

त्यांनी निवडलेले तिसरे क्षेत्र म्हणजे शिक्षण, महाराष्ट्र स्थापन झाल्यावर पहिली जर काही घोषणा त्यांनी केली असेल तर ती गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व त्याचबरोबर ग्रामीण विभागात शिक्षण संस्था, ग्रामीण विद्यालये व महाविद्यालये प्रस्थापित करण्यासाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या. त्यावेळी ज्या झपाट्याने ग्रामीण विभागात कॉलेजेस निर्माण होत आहेत त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावेल व त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाचे शिक्षण मिळेल अशी बरीच टीका झाली. मला आठवतंय या विषयावर एकदा चर्चा चालू असताना काही विद्वान लोकांनी अशा उथळ शिक्षणाविषयी टीका केली. ती यशवंतरावांनी मान्य केली. पण ते म्हणाले की, ‘मी ज्या भागात राहतो तेथे कृष्णेचे पात्र उथळ आहे, परंतु जशी कृष्णा पूर्वेकडे वाहते तसतसे तिचे पात्र खोल होत जाते. आज जे शिक्षण आपल्याला कदाचित उथळ वाटत असेल, त्या शिक्षणाचा दर्जा काही वर्षांनी खोलावेल यात माझ्या मनात शंका नाही.’ आज आपण ग्रामीण क्षेत्रातील क्षेत्रातील पसरलेले शिक्षणाचे जाळे बघितले तर त्या म्हणण्यात बरेच तथ्य होते असे दिसून येते. अलिकडे कित्येक वर्षे एस. एस. सी. व हायर सेकंडरीमध्ये जी मुले येतात त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुले जास्त प्रमाणात दिसून येतात. पूर्वी एक काळ असा ता की जेव्हा दादर आणि पुणेकडील मुलेच पहिल्या दहा-वीस नंबरामध्ये येत ते चित्र आज बदलले आहे. आपल्या शेजारील सातारामधील सैनिक स्कूलमध्ये काही वर्षापूर्वी मी आलो होते, तेव्हा मला सांगण्यात आले की जवळ जवळ पंधरा ते वीस टक्के मुले लातूरमधील एका शाळेतून गेल्या तीन वर्षात दाखल झालेली आहेत. तेव्हा मला थोडेसे आश्चर्य वाटले, पण आज आश्चर्य वाटत नाही. कारण आता ‘लातूर पॅटर्न’ म्हणजे काय, हे सर्व परिचित आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org