व्याख्यानमाला-१९९५-९६-३६

इंग्रजीत एक सुभाषित आहे “पॉलिटिक्स इज ए गेम ऑफ स्काऊंड्रल्स” “स्काऊंड्रल” या शब्दाचे भाषांतर बहुतेकजण बमाश असे करतात. मी आपला खेड्यातला माणूस. मी त्या शब्दाचं भाषांतर “भडवा” असं करतो. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या भाकिताप्रमाणे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २५-३० वर्षात, भारताच्या धर्मकारणांत बुडवे, अर्थकारणांत उचले आणि बुडवे आणि राजकारणांत भडवे यांचेच प्रस्थ आज फार वाढले आहे.

दुसरे महायुद्ध संपले. इंग्लंडमध्ये लगेच निवडणूका झाल्या. मजूर पक्षाचे अँटली पंतप्रधान झाले. युद्धा जिंकून देणा-या चर्चिलला सत्तेवरून उचलून विरोधी पक्षाच्या बाकावर इंग्लिश मतदारांनी बसविले. पंतप्रधान अँटली यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्य देण्याची घोषणा १९४५ साली केली. १९४२ ला, “चले जाव”. “इंग्रजांनो हिंदुस्थान सोडून चालते व्हा” अशी काँग्रेसने मागणी केली होती. आणि बरबोर तीन वर्षांनी ब्रिटीश पंतप्रधानांनी तिथल्या पार्लमेंटमध्ये जाहीर केले, “आम्ही हिंदुस्थान सोडून जातो. हिंदुस्थानाला स्वातंत्र्या देतो”.

या ऐतिहासिक घोषणेवर, विरोधी बाकावरील विन्स्टन चर्चिल यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. हिंदी लोकांच्याबद्दल चर्चिलने त्यावेळी काढलेले उद्गार मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो. तो म्हणाला, “पॉवर वुईल गो इन टू हॅण्डस ऑफ रास्कल्स, रोगझ अँण्ड फ्रीबूटर्स. नॉट बॉटल ऑफ वॉटर ऑर ए लोफ ऑफ ब्रेड शाल एस्केप टॅक्सेशन. ओन्ली द एअर वुईल बी फ्री अँण्ड द ब्लड ऑफ दीज हंग्री मिलियन्स वुईल बी ऑन द हेड ऑफ मि. क्लेमंट अँटली. दीज मेन ऑफ स्ट्रॉ ऑफ ह्यूम नो स्ट्रेस वुईल बी फाऊंड ऑफ्टर फ्यु इयर्स. दे वुईल फाईट अमंग देमसेल्वज् अँण्ड इंडिया वुईल बी लॉस्ट इन पोलीटिकल स्कॉबल्स.”

चर्चिलच्या तिरस्करानं भरलेल्या भाषणाचा अर्थ असा, “चोर, बदमाश आणि भुक्कड लोकांच्या हातात सत्ता जाईल. घोटभर पाण्यावर आणि भाकरीच्या तुकड्यावरही ते कर बसवतील. फक्त हवा मोकळी राहील. आणि या आधाशी, भुकेल्या कोट्यावधी लोकांचे पाप, मिस्टर क्लेमेंट अँटलीच्या माथ्यावर बसेल. हे इंडियन्स केरकच-याच्या लायकीचे असून, स्वातंत्र्यानंतर थोड्याच काळांत त्यांचे कस्पट सुद्धा दिसणार नाही. आपसांत झगडे, दंगली आणि कळवंडी करून, जो अराजकाचा भोवरा निर्माण करतील, त्यांत हिंदुस्थान बुडून होईल.”

आमच्याबद्दल, हिंदी लोकांबद्दल निदान हुजूर पक्षी इंग्लिश लोकांत किती तिरस्काराची, तुच्छतेची भावना होती, याचा हा एक नमुना आहे. आमच्यावर राज्य करताना ब्रिटीश अधिका-यांच्या मनांत मावरी, निग्रो अगर रेड इंडियन्स या आदीवासी लोकांच्यापेक्षा फार वेगळी भावना नव्हती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३०-४० वर्षात आमचे राज्यकर्ते, चर्चिलचे भाष्य खरे करून दाखवायला लागलेत काय? असं वाटतं आहे. स्वातंत्र्य मिळवणा-या पिढीनंतर जी दुसरी राज्यकर्त्यांची पिढी सर्वच राजकीय पक्षांतून पुढे येत आहे, त्यांच्या निष्ठा, विचार, तत्वे, ध्येयवाद यावर किती? आणि पदे, पैस, प्रसिद्धी यावर किती? याची प्रत्यक्ष चाललेल्या व्यवहारांत जी प्रचिती येते त्यातून चर्चिल खरा ठरेल काय? याची भीती वाटते.

तत्वांची, विचारांची निश्चित भूमिका घेऊन महाराष्ट्र चालविणारे राजकारणी यशवंतरावांच्या बरोबरच संपले असं दिसतं आहे. चव्हाणसाहेबांच्या बरोबर माझी झालेली पहिली मुलाखत मला आठवते. १९६१ चा डिसेंबर महिना होता. मी इंग्लंडहून बोटीने परत आलो होतो. लंडन युनिव्हर्सिटीत “समाजविकास” या विषयाचा अभ्यास मला आश्चर्य वाटले. मला घ्यायला आलेल्यामध्ये, आमच्या शिराळा तालुक्यातील चिखलीचे आनंदराव तात्या होते. सर्व सामान बॅगा घेत असतानाच तात्यांनी सांगितले “चव्हाणसाहेबांनी तुम्हाला बोलवले आहे. “मला मोठे आश्चर्य वाटले. “कधी? कुठे?” मी थोडे गोंधळूनच विचारले आणि अगदी तसेच बोटीवरून तात्या मला सचिवालयातील मुख्यमंत्र्या चंबरमध्ये घेऊन गेले. त्यापूर्वी माझी चव्हाणसाहेबांना थोडी माहिती होती. पण समोरासमोर चर्चा अशी ही पहिलीच वेळ होती. त्यांनी माझ्या प्रवासाची अभ्यासाची चौकशी केली. २०-२५ मिनीटे आम्ही बोलत होतो. पुढे काय करणार? या त्यांच्या प्रश्नातून चर्चा राजकारणाकडे वळली. खरं म्हणजे त्यावेळेपर्यंत मी काँग्रेसशी संबंधीत नव्हतो. मी विद्यार्थी दशेत राष्ट्रसेवादलात होतो. आचार्य जावडेकरांच्या सान्निध्यात होतो. भूदान चळवळीतही भाग घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १९५७ च्या निवडणुकात काँग्रेसच्या विरोधी काम करून, शिरोळ तालूक्यातून श्री. सा. रे. उर्फ आप्पासाहेब पाटील यांना दे. भ. रत्नाप्पा आण्णाच्या विरोधी निवडून आणण्यात सहभागी झालो होतो. त्यामुळे आणि सत्यशोधक चळवळीपासून चालत आलेल्या “शेडजी, भटजी” च्या वर्चस्वाबद्दल मनांत राग आणि अविश्वास असल्यामुले, काँग्रेसबद्दल मनांत दुरावाच होता. परंतु म. गांधींचे आकर्षण, शेडजी, भटजींचे वर्चस्व मोडून महाराष्ट्रातील सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल चव्हाणसाहेब यांच्याबद्दलही फार आदर वाटत होता.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org