व्याख्यानमाला-१९९५-९६-३२

काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियातील दोन मुली आमच्याकडे आल्या होत्या. १६-१७ वर्षाच्या तरुण मुली जग पहायला एकट्या-दुकट्या हिंडत होत्या. त्या जेवायला माझ्याकडे आल्या असतांना मी त्यांना आपल्या पद्धतीने विचारले “वडील काय करतात?” त्या म्हणाल्या “शेतकरी आहेत” पुन्हा विचारले “किती जमीन आहे?” एकजण म्हणाली “१० हजार एकर.” दुसरी म्हणाली “१५ हजार एकर.” आम्ही पहातच राहिलो. आमच्या ४-५ गांवाजवळ जेवढी जमीन नाही तेवढी तिथे एकेका शेतक-याजवळ आहे. असे कसे? तर ३-४ पिढ्यापूर्वी त्या मुलीचे आजोबा, पणजोबा युरोपातून तिथे वसाहत करावयाला गेले. आणि तिथले आदिवासी मारून तिथे अशा प्रचंड जमिनी ताब्यात घेऊन राहिले. आज तिथे इमीग्रेशनचे कायदे करून इतरांना देशांत वस्ती करून देत नाहीत. ते सर्व शेती यंत्राने करतात. शेळ्या, मेंढ्या, गाई, घोड्यांचे प्रचंड कळप पाळतात. शेतात मध्यवर्ती त्याचे घर, सर्व यंत्र सामुग्री, ३०-४० मैलावर एक बाजारपेठ, तिथे मोटारीने किंवा हेलिकॅप्टरने बाजारहाट करायला जातात. अशा कुटुंबियातील त्या मुली आता संसार करताना मुलेही कमी जन्माला घालतात. युरोपात तर एक दोन मुले. गेल्या तीन-चारशे वर्षात ही युरोपियन मंडळी असा संसार करतात. आम्ही कसा संसार करीत आहोत. पहिला आमचा पक्का समज ब्राह्मण धर्माने करून दिला आहे की हे जग मायाजाल आहे. हा जन्म क्षणभंगुर आहे. इथे काही मिळवायचे नाही. जे मिळवायचे ते वर गेल्यावर. मेल्यावर. आपण करतो म्हणून इथे काही मिळत नसते. नशिबात असेल तर मिळते. देवाच्या मनात असेल तर मिळते. म्हणून देवाचे भजन, पूजंन करीत बसावे. उगीच मृगजळाच्या मागे धावू नये. “असेल हरी तर देईल खाटल्यावरी” म्हणून खाटले सोडू नये. खाटल्यावरचा उद्योग मात्र चालूच ठेवला. किती मुले जन्माला घालावीत  हे आपल्या हातात थोडेच असेत? तो वर बसला आहे. त्याच्या मनात असेल तर खंडीवर पेंढी सुद्धा देईल. म्हणजे २० वर एक २१ पोरेही जन्माला येतील “अष्टपुत्रा सौभाग्यवती भव” हा तर देवा-ब्राह्मणांचा आशिर्वादच होता. देवाची करणी नारळांत पाणी. भरमसाट प्रजा जन्माला घातली. कुठला नवीन प्रदेश जिंकला नाही. हजारो वर्षात हिंदुस्थानचा मनुष्य दुस-याच्या भूमीवर त्याने पाय ठेवला नाही. नवा उद्योग शोधला नाही. ब्रह्मानंदी टाळी लावून मुक्तीची वाट पहात मरून जायचे, खंडीवर पेंडी किंवा अष्टपुत्री जन्माला घालून जायचे.

युरोपीय लोक आमच्या दारातील व्यापारी होते. ते जागाचे मालक, सावकार झाले. आम्ही तीन-चारशे वर्षांपासून सावकार होतो. ते आज भिकारी झालो. हे का? व कसे? हे समजून घेतले तर नव महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी काय केले पाहिजे हे वेगळे सांगायची गरज पडणार नाही. महाराष्ट्रातील मराठी मनाची “अटकेपार झेंडे नेले तरी संध्याकाळी घराकडे” ही पेशवाई मनोवृत्ती सोडली पाहिजे. हा हातातला एकच जन्म आहे. स्वर्ग किंवा नरक इथेच जन्मातच भोगायचा आहे. तो आपल्या गुण कर्तृत्वावर अवलंबून आहे. लाथ मारीन तेथे पाणी काढीन, अशा इर्षेने समर्थ संसार करण्याचा आत्मविश्वास वाढवून संसार केला तर आपणही या महाराष्ट्राचे आनंदवन करू शकतो.

मनुष्य शक्ती, अश्व किंवा बैल शक्ती या बरोबर वाफ, वीज, पवन, सूर्यशक्ती आणि अलीकडील अणुशक्ती ही सामर्थ्य पाश्च्यात्यानी शोधून कामाला लागवली आहेत. सूर्यशक्तीतील अजून अनेक किरणांची शक्ती पूर्णतः कब्जात आलेली नाही. परलोक वादाच्या भ्रमातून जागे होऊन आपणही इहवादात आपले लक्ष केंद्रीत केले. भौतिक जागातील सृष्टीतील सत्य शोधायला लागलो, तर प्राचीन ऋषीमुनींनी ज्या अनेक निसर्ग शक्तीची दर्शने घेतली होती. त्या सा-या शक्तींचा साक्षात्कार आपणांसही झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात शोधापेक्षा शोधक इहलोकातच घट्ट् पाय रोवून राहिला पाहिजे. खेर सुख, खरा आनंद कशात आहे हे त्याला मनोमन समजले असले पाहिजे. आत्मज्ञानाच्या भक्कम बैठकीवर दृढ उभे राहूनच त्याला विज्ञान तंत्रज्ञानाची “अस्त्रे” कौशल्याने हाताळता आली पाहिजे.

अज्ञान, आळस, अहंकार, भेदाभेद, रूढी ग्रस्तता, यातून आपल्या भोवतीचे जग, समाज, निसर्ग आणि आपण स्वतः यांचे वास्तव दर्शन आपल्याला होत नाही. आत्मज्ञान, दृष्टीज्ञान याचे वास्तव भान आपण ठेवीत नाही. ब्राह्मण धर्माची मानसिक गुलामगिरी, मुस्लीम व ब्रिटीश राजवटीतून वाढलेली सत्वहीन राजकीय गुलामगिरी यामुळे दुस-याच्य आधाराशिवाय आमचे मन उभेच राहात नाही. लाचारी, अनुकरण प्रियता आणि जनावरी सुखलोलुपता यामुळे आम्ही अस्मिता घालवून असलो आहो. स्वातंत्र्यानंतर या सर्व दोषापासून मुक्त झालेला मानसिक षडरिपूवरही विजय मिळविणारा, सत्यशोधक, सत्याग्रही, कर्तृत्ववान मराठा कसा तयार करावयाचा याचा ध्यास महाराष्ट्राने घेतला पाहिजे. महाराष्ट्राची या पुढची, जडणघडण ही मराठी मनाच्या अशा जडणघणडीवरच अवलंबून आहे. आजचे भाषण थांबवितो. मा. अध्यक्ष व आपण सर्वांचे आभार.

- प्राचार्य पी. बी. पाटील, सांगली
दि. १३ मार्च १९९५

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org