व्याख्यानमाला-१९९५-९६-२९

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सहकारी चळवळीत लोकशाही कार्यपद्धती बळकट करण्याची शक्यता आहे. समान न्याय मिळविण्याची शक्यता आहे आणि विकेंद्रीत पद्धतीने उत्पादन व्यवहार होण्याचे आणि मुख्यतः अर्थ व्यवस्थेत प्राथमिक क्षेत्रांची गतिमान फेरमांडणी करण्याची शक्यता अधिक आहे.

परंपरागत उत्पादनाच्या चार मूलभूत घटकामध्ये आज विज्ञान तंत्रज्ञान हा पाचवा घटक म्हणून उत्पादनांत क्रांती करून राहिला आहे. त्यामुळे तर भांडवलशाही आणि साम्यवाद यांचा मूळ पायाच फसला आहे. आता तंत्रज्ञानाला भांडवलाच्या कब्जात घेण्याचा त्यांचा प्रयत्न असला तरी ते संघर्षाशिवाय शक्य होईल असे वाटत नाही. आमचा संघर्ष म्हणजे सर्वनाश हे विज्ञान तंत्रज्ञानानेच दाखवून दिले आहे.व्यक्ती, समाज व निसर्ग यांच्यातील परस्पर पूरक व पोषक नाते जोपासून सर्वांना सुखमय मानवी संस्कृती शोधायचा मार्ग सहकार हाच आहे, संघर्ष नाही, असा विश्वास अव अशी जाणीव सहकारी नेत्यामध्ये दृढमूल झाली पाहिजे.

लोकशाही समाजवाद मानणारे देशाचे शासनही या सहकारी अर्थव्यवस्थेची कुवत जाणणारे असेल तर सहकाही अर्थव्यवस्थेला एक पर्यायी अर्थव्यवस्था उभी करता येणे अधिक सुलभ होणार आहे.

सहकारी चळवळ इंग्लंडमध्ये रॉबर्ट ओव्हेन याने सुरू केलेली चळवळ असे पुस्तकी शिक्षणांतून शिकवले जाते. इंग्लंडमध्ये कारखानदारीला प्रारंभ झाला त्यावेळी तिथले कारखानदार ज्या अमानुषपणे कामगारांना वागवीत, त्यातून दया येऊन अशा समान पीडितासाठी ओव्होन यांनी काही उपक्रम सुरू केले. नफा, स्वार्थ, चढाओढ यांसाठी चाललेल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ज्या लढाया चालतात, त्या लढाईत जे जखमी होवून व्हिवळत पडतात त्यांच्या जखमांना मलमपट्टी करण्यासाठी नर्सिंग करण्यासाठी, सहकारी चळवळ आहे असे शिकविले जाते. हे रेडक्रासचे काम म्हणजे सहकारी चळवळ हा अर्थ अत्यंत अपूरा आहे. या नर्सिंगमुळे लढाई थांबत नाही. लढाई, संघर्ष, ज्या भांडवलशाही व्यवस्थांमुळे निर्माण होतात. तो व्यवहार बदलणारी लढाई संघर्ष, संपवणारी पर्यायी व्यवस्था म्हणजे सहकार असा अर्थ यांत अभिप्रेत नाही. समाजहितसंबंधांच्या लोकांनी एकत्र येवून एकमेकांच्या सहकार्याने आपल्या हितसंबंधांचे रक्षण करावे ही सहकाराची रूढ व्याख्या पुरेशी नाही. साम्यवादांत वर्ग संघर्ष आहे. त्यातील वर्ग या संज्ञेची व्याख्याही समानहितसंबंधाचे लोक अशीच आहे त्यामुळे पर्यायी अर्थव्यवस्था देणारी सहकारी चळवळ असा विकसित अर्थ सहकारी चळवळीत अधी येऊच शकत नाही. पण जे जे विलायती ते वेदवाक्य म्हणून डोळे झाकून स्वीकारायचे ही वृत्ती, शिक्षणक्षेत्रांतून तर जाता जात नाही. शंकराव देव यांचेशी झालेल्या चर्चेतून सहकारी चळवळीची एक पर्यायी अर्थव्यवस्था म्हणून विकसित होवू शकणारी वैचारिक भूमिका स्पष्ट झाली ती भूमिका स्वतंत्र भारताच्या उभारणीसाठी महाराष्ट्राला काय म्हणायचे आहे याचे प्रतिक म्हणून अ. भा. काँग्रेस अधिवेशनांत स्वागताध्यक्ष वसंतराव दादांच्या भाणांतून मांडायची असे ठरले. त्या दृष्टीने ते भाषण तयार करण्याच्या कामाला आम्ही लागलो. दुर्दैवाने त्याचवेळी कोयनेचा प्रचंड भूकंप झाला आणि ते काँग्रेस अधिवेशन सांगलीस होऊ शकले नाही. सर्व तयारी व्यर्थ गेली. स्वागताध्यक्षांचे भाषणही राष्ट्रापुढे जावू शकले नाही. परंतु पुढे वर्षभरांत राहुरीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनातील भाषणांत भूमिका मांडली, परंतु पक्षांत त्या विचारांचा पाठपुरावा पुढे झाला नाही. सहकारी चळवळीचे सरकारीकरण करण्यातच काँग्रेसच्या सत्ताधा-यांनी रस घेतला. सत्तेचे राजकारण वैचारिक विकासाला बाधक ठरले.

श्री. शंकरराव देव यांच्याशी चर्चा करताना आम्ही अशीच भूमिका मांडली की, आमच्या विचारातला सहकार आम्हाला व्यवहारांत अजून आणता आलेला नाही. आता जे सहकारात काम चालले आहे. ती फक्त सुरुवात आहे. पहिली पावलं आहेत. आम्हाला कुठं जायचं आहे हे आमच्या विचारांत निश्चित आहे. दिशा नक्की आहे. आम्हांला सर्वांच्या हितसंबंधाची काळजी करणारी, संघर्षानंतर नव्हे तर पूर्ण समजून उमजून सर्वांचे हित जपणारी, को-ऑपरेटिव्ह इकॉनॉमी उभी करायची आहे. आणि ती गोवोगावात भागाभागांत उभी करायची आहे. केंद्रीयकरण टाळून आम्हाला विकेंद्रीत अर्थव्यवस्था मांडायची आहे. गावागावातील सारे उत्पादन सहकारी पद्धतीने कसे करता येईल? उत्पादकाला लागणा-या सर्व सोईसुविधा पुरवठा, तरी सहकारी पद्धतीने वेळच्यावेळी, खात्रीलायक पद्धतीने कसा करता येईल? पाणीपुरवठा, पतपुरवठा, खते बियाणे पुरवठा, कारागीरांना कच्चा माल, औजारे इ. चा पुरवठा हा सर्व वेळच्यावेळी माफक खर्चात उत्पादकांना पुरविणा-या विविध कार्यकारी सोसायट्या आम्हाला गावोगांव बळकट करायच्या आहेत. गावात चालणारे सर्व आर्थिकव्यवहार, उत्पादन, वितरण, खरेदीविक्री, सर्व काही सहकारी पद्धतीने करत आले पाहिजे. अगदी आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाचाही पुरवठा सहकारी पद्धतीने प्रत्येक कुटुंबाला व प्रत्येक उद्योग व्यवसायाला करता आला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org