व्याख्यानमाला-१९९५-९६-२७

रशियातील ७० वर्षीची साम्यवादी रचना का ढासळली हे समजून घ्यायला, रशियात जायला नको. आमच्या पब्लिक सेक्टरचा अभ्यास किंवा आमच्या सार्वजनिक सेवा क्षेत्राचा अभ्यास, त्यासाठी फारच उपयुक्त आहे. आमच्या संमिश्र अर्थव्यवस्थेचा तोल शेवटी भांडवलदारी बळकट करण्याकडेच झुकला. भांडवशाहीमध्ये जशा मक्तेदा-या निर्माण होतात. तशा मक्तेदा-या उभ्या राहिल्या. आणिबाणीनंतर हे परिणाम स्पष्ट होऊ लागले. तोंडाने लोकशाही समाजवाद म्हणत, संमिश्र अर्थव्यवस्थेची म्हैस आम्हाला भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या गोठ्यांत घेऊन आली. “अगं अगं म्हशी, मला कुठं नेश.” अशी वरकरणी ओरड आम्ही करत राहिलो. पण आता भांडवलशाहीचा गोठा बरा वाटू लागला आहे. लोकशाही समाजवादाचे तर आता कुंकूही पुसून टाकले आहे.

संमिश्र अर्थव्यवस्थेतून लोकशाही समाजवादाकडे जाण्याऐवजी युरोपीय भांडवलशाहीकडे जशी आम्ही उडी घेतली, त्याबरोबर यशवंतरावांनी मांडलेल्या सहकारी कृषी औद्योगिक समाजरचनेच्या उद्दीष्टांचीही आज वाट लावली आहे. सहकारी अर्थव्यवस्थेच्या रस्त्यावरून चालणारांनाही त्या उद्दीष्टांची पूर्ण जाण राहिली नाही.

यशवंतरावांचे भजन, पूजन करणारांनाही सहकारी चळवळीच्या वैचारिक भूमिकेचा विकास करता आला नाही. कित्ता गिरवावा तसे, जेवढी सुरुवात झाली तेवढ्याच तिवढ्याभोवती फिरत रहावे तसे फिरत राहिले. सहकारी अर्थव्यवस्था ही एक पर्यायी अर्थव्यवस्था होऊ शकते. लोकशाही समाजवादाची जोपासना सहकारी अर्थव्यवस्थाच करू शकते. भांडवलशाही व साम्यवाद या दोन्ही अर्थव्यवस्थेला पर्याय देणारी सर्वकष अर्थव्यवस्था म्हणून सहकारी चळवळ विराट रूप धारण करू शकते याचे दर्शन सहकारी कार्यकर्त्यांनीही घेतले नाही. आणि त्या अर्थाने सहकारी चळवळीची विकसित भूमिमका कुणी पुढे आणली नाही.

सहकारी चळवळीची सर्वकष भूमिका काय? यासंबंधी झालेली एक महत्वाची चर्चा मला आठवते. १९६-६८ साली सांगलीला, अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन होणार होते. त्या अदिवेशनाची पूर्वतयारी दोन तीन महिने अगोदरपासून चालली होती. वसंतरावदादा स्वागताध्यक्ष होते. त्यांचे स्वागताचे भाषण काय असावे अशी चर्चा सुरुवातीपासूनच चालू होती. अधिवेशनाच्या पूर्वतयारीत सारे असतानाच वसंतावदादांना शंकरराव देव यांचे एक पत्र आले. महाराष्ट्र काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये शंकरराव देवांचा मोठा ऐतिहासिक वाटा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते बाजूला पडले. सासवडच्या आश्रमातून त्यांचे पत्र आले होते. त्यांत त्यांनी म्हटले होते, “मला सांगलीला यावयाचे आहे. तुझे सहकारी चळवळीतले काम खूप नावारुपाला आलेले मी ऐकतो आहे. दोन तीन दिवस राहून मला तुझे काम पहायचे आहे. काम म्हणजे मला इमारती, कारखाने, शेती पहायाची नाहीत, तर सहकारी चळवळीचा तुमचा विचार मला समजून घ्यायचा आहे. तुम्हाला नेमके काय साधायचे आहे? आणि ते सहकारी चळवळीतून कसे साध्य होण्याची शक्यता आहे? ते मला तुमच्याकडून समजून घ्यायचे आहे.

शंकरराव देव वसंतदादांना एकेरी नावानेच बोलावीत. त्यांचे तितके जवळचे संबंध होते. शंकरराव देवांचा स्वभावही तसा कडक, त्यांच्याशी चर्चा करायची म्हणजे काहीतरी थातुर मातूर चालायचे नाही. आमि वसंतरावदादांची अडचण त्यावेळी वैचारिक चर्चा करण्याची. त्यांनी डोंगराएवढी कामे उभी केली पण त्या कामामागची वैचारिक भूमिका सांगायची, तीही शंकरराव देवा सारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या शंका निरसन होतील अशा पद्धतीने सांगायची म्हणजे मोठी पंचाईत होती. त्यावेळी अधिवेशासाठी काही साहित्य तयार करायला व इतर चर्चा करायला, मान. नरुभाऊ लिमये, द्वा. भ. कर्णिक, वि. स. पागे, गुलाबराव पाटील, तात्यासाहेब कोरे अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व कार्यकर्ते सांगलीत उतरत होती. रोज रात्री सांगली साखर कारखान्याच्या जुन्या गेस्ट हाऊसवर एकत्र जमत होती. शंकरराव देवांच्या पत्राची त्यात आम्ही चर्चा केली. सहकारी चळवळीची वैचारिक भूमिका सिद्धांताच्या स्वरूपात कशी मांडायची? पुष्कळ खल झाला. त्यात मी काही विशिष्ट मांडणी सर्वांपुढे ठेवली. त्यावर सर्वजण खुष झाले. शंकरराव देवाना बोलावले. ते तीन दिवस राहिले. तीन दिवस रोज आमच्या शांतिनिकेतनमध्येच बैठकी झाल्या. त्या सर्व मंथनातून सहकारी चळवळीची एक पर्यायी अर्थव्यवस्थी देणारी वैचारिक बैठक आकाराला आली. ती समजून घेऊन शंकरराव देवांनीही शेवटी सांगितले “हीच तुमची भूमिका असेल तर मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. माझा सर्वोदय आणि तुमचा सहकारी समाजवाद मी एकच समजतो. माझे पूर्ण समाधान झाले आहे.”

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org