व्याख्यानमाला-१९९५-९६-१७

विकासाच्या प्रश्नातील असमतोल आणि मागासपण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने हाताळल्या पाहिजेत याचेही भान आम्हाला राहिले नाही. मागासपण हे केवळ आर्थिक नाही,ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि मानसिकही आहे. त्याची मुळे हजारो वर्षाच्या खोल रूढी, प्रथा परंपरा मध्ये आहे. जन्माधिष्टीत उच्चनीचतेच्या मांडणीपासून आणि विद्या, सत्ता, संपत्तीच्या जन्मजात मक्तेदा-या निर्माण केल्यापासून विकासांतील असमतोल व मागासपण परिदृढ करून ठेवले आहे. आदिवसींचे मागासपण, दलित अस्पृश्य यांचे मागासपण, महिलांचे मागासपणे, भूमिहीन शेतमजूरांचे वा निमबेकारांचे मागासपण यांतील भेद नीट आकलन झाले पाहिजे. त्याशिवाय मागासपण निश्चित झाले पाहिजे. विकसित व्हाचे म्हणजे नेमके काय व्हायचे विकसित व्यक्ती, विकसित समाज याची नेमकी रूपरेखा न ठरवताच आम्ही विकास योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहांत काय, याचा जरा शांतपणे आढावा घेतला पाहिजे.

मागासपण आणि विकासातील असमतोल हा प्रचलित समाजव्यवस्थेचा अटळ आणि परिदृढ झालेला परिणाम आहे. ती व्यवस्था तशीच पुढे चालू ठेवण्याची परंपरागत मनःस्थिती यांत त्यांची मुळे खोल रुजली आहेत. त्या मनःस्थितीचे प्रथम आणि त्यानंतर परिस्थितीचे अमूलाग्र परिवर्तन करण्याचा मूलगामी आणि दूरगामी कार्यक्रा निर्धाराने हाती घेतल्याशिवाय केवळ शासकीय अंदाजपत्रकांतले आकडे मागेपुढे करून सुटणारे ते प्रश्न नाहीत. आम्ही मागासपण आणि असमतोल विकास याचा निचरा करणारी मूलगामी उपाययोजना हाती घेत नाही. या प्रश्नांची केवळ बौद्धीक जाणीव पुरेशी नाही. सवयीच्या आणि हितसंबंधाच्या विळख्यातून सारा व्यवहार बाहेर काढल्याशिवाय बौद्धीक जाणिवेतील आणि हितसंबंधाच्या विळख्यातून सारा व्यवहार बाहेर काढल्याशिवाय बौद्धीक जाणिवेतील व भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात रेखाटलेला, नवा भारत उभारता येणार नाही. तोंडाने मार्क्स आणि महात्मा गांधी यांचा कितीही आम्ही पुरस्कार करीत राहिलो असलो तरी आमचा प्रत्यक्ष आचार आणि व्यवहार मनु आणि मेकॉले यांच्या पट्टशिष्यांचाच राहिला आहे. केवळ बौद्धीक जाणिवेने आमचा सवयीचा आणि हितसंबंधाचा व्यवहार बदलत नाही.

जन्माधिष्ठीत उच्चनीचता आणि काम, दाम व आराम यांची चुकीची मांडणी यातून असमतोल जोपासला जातो. गुणकर्तृत्वाप्रमाणे स्थान, मान, दाम आणि आराम देणारा समाजच तोल सांभाळून प्रगत होत असतो. प्रादेशिक निसर्ग साधनसंपत्तीची उपलब्धता, त्यांचे सम्यक संरक्षण करणा-या उचित उपयुक्त सुलभ अशा तंत्रज्ञानाची उपलब्धता आवश्यक त्या भांडवलाची उपलब्धता आणि मुख्यतः सुधारणा, विकास, परिवर्तन यासाठी आसुसलेली त्या त्या विभागातील लोकांची मानसिकता यावरच कोणत्याही देशाचा वा प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. लोकांची जागृती, लोकांचे संघटन, स्वयंशिस्त व कार्यक्षमता याशिवाय बाहेरून येऊन कोणी स्थानिक विकासाला कायमची गती देवू शकत नाही. विकास हा केवळ परिस्थितीचा होऊन चालत नाही. परिस्थितीच्या अगोदर मनःस्थितीचा विकास आवश्यक आहे. सरकारी पैसा समान रीतीने वाटणे म्हणजे समतोल विकास साधणे एवढाच अर्थ घेतला जातो. सार्वजनिक सोयी सुविधा समान पातळीवर आणणे म्हणजे विकास असा दुसरा एक अर्थ रूढ केला जाता आहे. यातून विकासाचा असमतोल निर्माण करणारी जी मानसिक, नैसर्गिक संघटनात्मक अशी मूलभूत कारणे आहेत ती तशीच रहातात. आणि भौतिक सुविधा वाढवीत जाऊन, जीवन गुंतागुंतीचे, परावलंबी व अतृप्त ठेवणारा विकासाचा ढाचा लोकांवर लादला जातो.

व्यक्ती, समाज व सृष्टी या तिघानाही विकसित करीत, त्यांचे परस्परपूरक व परस्परपोषक असे नाते बळकट करणारा, निसर्गसुंदर सहज सुलभ असा व सर्वांच्या आनंददायी गरजा सहजरीतीने भागविणारा विकासाचा ढाचा, गाववार मांडून लोकांनीच तो अंमलात आणण्याची चळवळ, गटतट पक्षजातीचे राजकारण टाळून सुरू करावी लागेल.

महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, विचारवंतांनी, साहित्यिक संपादकांनी, इतकेच काय, शिक्षक प्राध्यापकांनीही, प्रशासन अधिका-यांच्याप्रमाणे, सारा महाराष्ट्र समजून घ्यावा. महाराष्ट्राच्या अविकसित, मागास भागांत जाऊन संधी मिलेल तेव्हा रहावे, तिथे बदल्या करुन काम करावे, मानामनांतील दुःखे, संशय, गैरसमज प्रत्यक्ष संपर्कातून दूर करावेत. अटकेपार झेंडे फडकवून पुन्हा संध्याकाळी घराकडे, ही वृत्ती टाकून द्यीवी. सा-या मराठी माणसांत विशेषतः कैक पिढ्यांनंतर एकत्र आलेल्या मराठी लोकांत, “सहनाववतु सहनौभुनक्तु सहवीर्य करवावहै” असे कार्यक्रम जाणीवपूर्वक पार पाडावेत, रोटी बेटी व्यवहारांना उत्तेजन द्यावे, संकुचित, आत्मकेंद्रीत, पायापुरते पहाण्याची वृत्ती सोडावी. मराठी माणसांत भावनिक एकात्मता परिदृढ करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही, सर्वांची आहे, हे समजून अंमलांत आणण्याची तयारी केली पाहिजे. सरकारने यासाठी सोयी सुविधा देण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. आपल्याच गावांत, भागांत, आयुष्यभर राहून तिथे गटबाज्या, भाऊबंदक्या माजवीत रहाण्यापेक्षा, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी महाराष्ट्रात बंधुभाव वाढवीत राहिले पाहिजे. कारण मराठी भाषिकांतील मानसिक एकात्मता ही महाराष्ट्राच्या जडणघडणीची आधारशीला आहे.

- प्राचार्य पी. बी. पाटील
१२ मार्च १९९५

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org