दारिद्र्य निर्मूलनाच्या दृष्टीने अनुरूप तंत्रज्ञानाशिवाय दुसरा कुठलाही मार्गा अवलंबात येणार नाही. आणि हे जे अनुरूप तंत्रज्ञान आहे त्याच्यामधून तीन गोष्टी प्रामुख्याने साध्य होतील. जसं गरजांची उत्तमप्रकारे परिपूर्ती होणं, दुसरी गोष्ट माणसाच्या ठिकाणी असलेल्या गुणांना जास्तीत जास्त वाव मिळणं, जे आपण मघाशी पाहिलं, की जाणीवपूर्वक निर्मितीतूनच माणसाच्या गुणांचा विकास होऊ शकेल. यंत्राचा एक भाग यादृष्टीने जेव्हा माणूस का करतो तेव्हा त्याच्या गुणांचा विकास होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. यंत्राचा निर्जीव भाग, बदलता येण्यासारखा, एवढंच महत्व माणसाला उरतं. तो अनस्किल्ड लेबर होतो. खरंतर आपण सगळेच आता अनस्किल्ड लेबर बनत चाललो आहोत. कारखानदाराला वाटलं तर हाताखालची १०० ची १०० माणसं एकावेळी टर्मिनेट करून दुसरी भरता येतात, हजारो माणसं काढता येतात पुन्हा भरता येतात. काही फरकच पडत नाही. कारण कामात फारसं कौशल्य लागतच नाही. अशी अवस्था त्या सामान्य श्रमिकांची झालेली आहे. म्हणजेच कष्टकरी माणूस हा यंत्राचा सुटा भाग झालेला आहे. त्याची निर्मितीक्षमता संपलेली आहे. हे जर टाळायचं असेल, त्याच्या गुणांचा विकास जर व्हायचा असेल, तर ते केवळ अनुरूप तंत्रज्ञानानेच होऊ शकतं.
सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या मते माणसाला माणसांशी जोडणं ही असते. आज मानवी संबंधामद्ये एक कोरडेपणा येत चाललेला आहे. परात्मभाव येत चाललेला आहे. परात्मभाव ‘अँलीनीएशन’ असा शब्द मार्क्स वापरतो. त्याचा अर्थ माणसापासून, समाजापासून, कामापासून तुटून पडणे. मुलं आईबापापासून तुटतात, भाऊ भावांपासून तुटतो, स्पर्धा, मुक्तस्पर्धा, फक्त स्पर्धा हेच मानवी प्रयत्नांचं प्रेरक ठरतं, सर्वस्व ठरतं. दिवसेंदिवस आपण अधिकाधिक मुक्त स्पर्धेकडं चाललो आहोत. मुक्त स्पर्धेकडं जाण्याचा अपरिहार्य परिणाम माणूस माणसापासून तोडण्यात होतो. माणूस माणसाच्या गळ्याचा घोट घेण्याकडे प्रवृत्त होण्याकडे होतो. ही गोष्ट आपल्याला वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. यशस्वी होण्याकरता वाटेल त्या मर्गाचा वापर करायचा म्हटल्यावर बुडणारी बकरी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पिलाला खाली दाबून वर उभी राहते तसे सर्वत्र होणार हे अगदी उघड आहे. इथं माणसाचं माणूसपण संपतं. माणसाच्या कल्पकतेला वाव मिळणं, गुणाच्या वाढीला वाव मिळणं, माणूस माणसाशी जोडला जाणं हे ज्या तंत्रज्ञानातून साध्य होतं अशा अनरूप तंत्रज्ञानाचीच निवड त्यामुळे आपल्याला करावी लागेल.