व्याख्यानमाला-१९९२-२ (47)

केवळ आपल्याला भयग्रस्त करणं, केवळ आपल्याला कुठल्यातरी दूरस्थ अशा संकटाचा इशारा देऊन अस्वस्थ करणं हा माझ्या बोलण्याचा हेतू नाही. परंतु ही जी वस्तुस्थिती आहे ती फक्त आपल्यासमोर आणायची आहे. आम्ही ज्याला विकास म्हणतो तो विकास नाही, ती आत्मवंचना आहे ही अमानुष व्यवस्था आहे. आणि या अमानुष व्यवस्थेत आम्ही मूठभर लोक या देशाच्या कोट्यावधीं लोकांच्या हिताचा बळी देऊन आमचं उखळ पांढरं करीत आहोत. आपण निगरगट्ट झालो आहोत. लोकांना गोळ्या घालून ठार केल्याबद्दल आम्हाला वाईट वाटतच नाही. स्वतःच्या हक्कांसाठी भांडणा-या लोकांच्या लढ्यांबद्दल आम्हाला आपुलकी वाटतच नाही. आपला मध्यमवर्ग गेंड्याच्या कातडीचा झालेला आहे असं मला वाटतं. त्या कातडीवरती ओरखडा काढण्याचा अल्पसा प्रयत्न करावा एवढाच फक्त हेतू माझ्या मनात हे सारं सांगताना होता.

आपण जर काही केले नाही तर आपला विनाश अटळ आहे. हे मी काही ज्योतिषशास्त्राच्या वगैरे आधारावर म्हणत नाही. मी म्हणतोय ते जगभर आजपर्यंत माणसाचं झालं, त्याच्या दुष्कृत्याचे जे दुष्परिणाम त्याला भोगावे लागले आहेत, त्याच्या आधारे मी बोलतोय. विकासाचा आताचाच नमुना पुढे चालू राहिला तर भोपाळसारखी गॅसकांडं वारंवार होणारच आणि हेच अँसिड रेन किंवा विषारी वायू पाणी... हे सगळे दुष्परिणाम अटळ ठरणार आहेत. स्वार्थी व मतलबी धनवंतांच्या हितासाठी निरागस अशा बहुसंख्य गरीब लोकांना आणि आजच्य पिढीच्या स्वार्थासाठी पुढच्या सर्व पिढ्यांनासुद्धा हे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. या भयंकर भवितव्याचा एक गंभीर इशारा करणं एवढचं फक्त माझ्या सबंध मांडणीचं प्रयोजन होतं.

तीन दिवस, तीन वेगवेगळ्या शीर्षकांतर्गत पण एकाच विषयाच्या अनुषंगाने ही मांडणी करण्याचा प्रयत्न मी केला. तो कितपत सफल झाला हे आपण ठरवायचं आहे. परंतु प्रबोधनाच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मला ज्या चार गोष्टी वाचून, ऐकून, पाहून कळल्या त्या आपल्यासारख्या विचार करणा-या लोकांच्या समोर ठेवणं मला अगत्याचं वाटलं. माझा हा हेतू काही प्रमाणात तरी माध्यझाला असावा असं मी समजतो. संयोजकांनी या तीन व्याख्यानांच्या निमित्ताने हे माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे आणि आपण तिन्ही दिवस येऊन अत्यंत शांतपणे, सगळे विक्षेप, विषयांतरं आणि फापटपसारा सहन केला आणि या व्याख्यानांना चांगला प्रतिसाध दिला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org