व्याख्यानमाला-१९९२-२ (46)

मी म्हणतो, साध्या आदिवासींचं जीवन जर आपण उदाहरणार्थ घेतलं तर असं दिसेल की त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संयम आहे. तुम्हाला सांगतो अनेक टोळ्याचं अभ्यास झालेले आहेत. आणि त्या टोळ्यांच्या अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की ती माणसं वाटेल ते नाही खात, ते शिकारी असतात आमि जंगलामध्ये अनेक प्राणी असतात. पण काही प्राणी ते अवध्य व अभक्षच मानतात. त्यांची काही कुलचिन्हं असतात. एखाद्या टोळीचं कूलचिन्ह जर सर्प हा प्राणी असेल तर त्या टोळीची माणसं साप खात नाहीत. सर्पाची पूजा करतात. का करतात? कारण त्यांचं माणूसपण यात सामावलेलं असतं की मला हे सहज उपलब्ध आहे तरी मी खात नाही. मला हे सहज उपलब्ध असूनही मी खात नाही कारण मी संयम पाळतो, कारण मी माणूस आहे. आपल्या जगात मात्र आपण असं पाहतो की आपली भूक या विज्ञानाच्या स्वीकारामुळे आणि या व्यक्तिवादी विकासाच्या स्पर्धात्मक-प्रतिमानाच्या स्वीकारामुळं इतकी वाढलेली आहे की प्राण्यांपेक्षासुद्धा आपली भूक जास्त आहे. प्राणी विवेक करतात, विधिनिषेध पाळतात, प्राणी पोटापेक्षा जास्त खात नाहीत, प्राणी प्रजोत्पादनाखेरीज केवळ सुखभोगासाठी शरीरसंबंध करीत नाहीत, प्राणी बलात्कार करीत नाहीत, आम्ही माणसं मात्र करतो, कारण सुखोपभोगाची आमची व्याख्याच मुळात स्वामित्वावर आधारलेली आहे, अर्थपूर्ण जीवनावर नाही. अनेक बलात्कारांच्या मागे स्त्रीवरती आपला अधिकार गाजवणं, स्त्री ही आम्ही मालमत्ता मानतो हे सिद्ध करणं हाच हेतू असतो. तेव्हा या समाजरचनेच्या सगळ्य व्याधींच्या मुळाशी हीजी पश्चिमी मूल्यव्यवस्था आहे, ही जी चंगळवादी मूल्यव्यवस्था आहे तीच नाकराली पाहिजे.

“हिंदस्वराज” ची मूळ भूमिका नेमकी हीच होती की आम्हाला नैसर्गिकपणे जगता आलं पाहिजे. निसर्गाशी आम्हाला सतत संवाद करता आला पाहिजे. निसर्गाचे आम्ही एक घटक म्हणून जगलं पाहिजे. माणूस हा या सबंध चराचर सृष्टीचा एक भाग आहे आणि विनम्रपणे त्यानं सृष्टीच्या इतर भागांबरोबर स्वतःला घेवून राहिले पाहिजे आणि यातच त्याचं आणि सबंध सृष्टीचं कल्याण आहे. तथाकथित विकासाच्य राक्षसी महत्वाकांक्षी, अहंकारी आणि स्वार्थप्रेरित विकासाच्या मागे लागून माणसानं स्वतःचंच नव्हे तर सृष्टीचंही अस्तित्व धोक्यात आणलेलं आहे.

ज्याला आपण विकास मानतो तो विकास तर नाहीच परंतु तो या सुंदर ग्रहाला भकास करण्याचा एक उपद्व्याप आहे. मानवी सभ्यतेचा इतिहास असं सांगतो की जिथे जिथे माणूस कधीकाळी राहिला तिथे तिथे आज वाळवंट आहे. याचं कारण त्यानं निसर्गात उपलब्ध संसाधनाचा अत्यंत बेसुमार गैरवापर केलेला आहे. याचं कारण त्यानं जंगलं तोडून टाकली, स्वार्थासाठी निसर्ग हवा तसा वापरला. आज “टाइम्स ऑफ इंडिया” चा रोजचा अंक २०-२५ पानी असतो आणि अशी डझनोगणती विविध भाषेतील दैनिके देशात निघतात. तेव्हा रोज किती बांबू संपलेले असतात हे आपल्या मनात कधीच येत नाही. कारण आम्हाला वर्तमानपत्र हवं असतं. विचार करायचा नाही. जंगलापाठोपाठ जंगलं नष्ट होतात आणि कुणाच्या स्वार्थासाठी नष्ट होतात? एकूण आपल्याच सर्व भाईबंदांच्या स्वार्थासाठी नष्ट होतात. वाळवंटीकरण होणार आहे या संपूर्ण पृथ्वी नावाच्या ग्रहाचं, ओझोनचा थर फुटला तर आपण कुणीच शिल्लक राहणार नाही हे कालच मी आपणास सांगितलं, तेव्हा या सगळ्या विकासक्रमाचा आपल्याला विचार केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org