व्याख्यानमाला-१९९२-२ (44)

विकेंद्रीत व्यवस्थेमध्ये प्रत्येक आयुष्य सारख्याच मोलाचं मानलं गेल्यामुळे ख-या अर्थाने माणसाला चेहरा असतो. बिनचेह-या माणूस निर्माण होणं हे समाजाच्या विकासाचं नव्हे तर अधःपतनाचं लक्षण आहे. आणि आज फार मोठ्या प्रमाणावरती बिनचेह-यांच्या माणसांची पैदास सुरू झालेली आहे. बिनचेह-याचा माणूस म्हणजे ज्याला ओळख नसते, ज्याला नाव नसतं, ज्याला गांव नसतं, ज्याला काही अस्तित्व नसतं, ज्याला काही अस्मिता नसते. तो एक फक्त युनिट असतो रेशनकार्डावरचा, तेवढंच फक्त त्याचं अस्तित्व असतं. राष्ट्रीय स्टॅटिस्टिक्समध्ये दर माणसीच्य हिशेबामध्ये तो एक माणूस असतो. त्याच्या पलिकडं त्याला चेहरा नसतो. आणि अशाप्रकारचा बिनचेह-याचा माणूस हा गुन्हेगार सहज होऊ शकतो, कारण त्याला कोणी ओळखतच नाही. खेड्यामध्ये मी परवा सांगितल्याप्रमाणे बुटपॉलिश करायला कोणी धजत नाही, कारण त्याला घरंदाजपणा असतो. आईबाप असतात, भाऊबंद असतात. त्याला लोक ओळखतात आणि तो अमक्याचा मुलगा असं करतो असं त्याला कुणीतरी म्हणणारं असतं, हटकणारं असतं. तो गुन्हेगारी करू शकत नाही, किंवा असं कुठलंही कुळाला बट्टा लावणारं कृत्य करू शकत नाही. शहरामध्ये आल्यानंतर यापैकी काहीच नाही. तो खिसे कापत जरी फिरला तरी त्याला कोणी ओळखत नसतं. माणसाला माणसानं न ओळखणं, माणसाची ओळख नष्ट होणं, अस्मिताच नष्ट होमं आणि माणूस हा फक्त एक भौतिक गरजांमागे धावणारा यंत्रमानव होणं असं ख-या विकेंद्रित व्यवस्थेत होत नाही. तळपातळीवर माणसं एकमेकांना ओळखतात, माणसं एकमेकांना जगवतात, एकमेकांना मदत करीत असतात आणि ‘सिम्पथी’ ने सहानुकंपेने सारा समाज बांधला जातो. त्यामुळेच हा समाज माणसांचा समाज असतो. त्यांच्यामध्ये सौहार्द असतं, सुसंवाद असतो. त्यांच्यामध्ये भांडणं होणारच नाहीत अशातला भाग नाही. हे काय मी अगदी नंदवनातलं वगैरे वर्णन करीत नाही. तर माणसं भांडतीलसुद्धा पण एकूण जनजीवनात प्राधान्येकरू सुसंवाद असेल, म्हणजे विसंवाद असला तरी तो मिटवण्याची परिणामकारक यंत्रणा असेल, त्यामुळे माणसं ही माणसासारखी असतील.

माणसाची प्रगती ही केवळ भौतिक प्रगतीच्या मोजमापाने मोजता येत नाही. दर हजारी किती शाळा आहेत? दर हजारी किती दवाखाने आहेत? दर हजारी किती इंजिनियर झालेत? दर हजारी किती प्राध्यापक झालेत? अशा भौतिक प्रगतीच्या मापाने विकास मोजलाच जाऊ शकत नाही. सुखी समाजाचं चित्र हे आपल्याला भौतिक मोजमापांनी काढताच येणार नाही. कारण सुख ही गोष्टच मुळात सापेक्ष आहे. सुख कशावर अवलंबून आहे? आजची व्यवस्था असं मानते  गरजा अमर्याद वाढवत नेण्यावर सुख अवलंबून आहे, स्वामित्व व संग्रह अमर्याद वाढवत जाण्यावर सुख अवलंबून आहे. माझ्या संग्रही किती गोष्टी आहेत याच्यावरून माझी प्रतिष्ठा अवलंबून आहे. माझ्या किती इमारती आहेत, माझे किती प्लॉटस् आहेत, माझे किती दागदागिने व पैसे बँकेत आहेत, किती शेअर्स आहेत? यावरून माझं सुख ठरतं. हे खरं आहे का पण? माझं सुख, माझी प्रतिष्ठा हे माझ्या भौतिक स्वामित्वावर आधारित आहे की माझ्या अर्थपूर्ण अस्तित्वावर आधारित आहे? मला तरी असं वाटतं की माणसाचं मोठेपण हे त्याच्या अर्थपूर्ण जगण्यावर अवलंबून आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org