व्याख्यानमाला-१९९२-२ (43)

आजच्या आपल्या विकास प्रतिमानाच्या मुळाशी जिला इंग्रजीमध्ये आम्ही थिअरी ऑफ डिसपेन्सिबिलिटी असं म्हणतो ती आहे. थोडासा स्पष्ट करण्याचा मुद्दा आहे. डिसपेन्सिबिलिटी म्हणजे असं की काही माणसं ही नगण्य असतात, डिसपेन्सिबल असतात. त्यांच्यावाचून काही अडत नाही. राजीव गांधींच्या काळामध्ये जेव्हा २१ व्या शतकाची भाषा फार जोरात चालली होती तेव्हा विशेषतः हा दृष्टिकोण झपाट्याने पुढे आला. राजीव गांधी असं म्हणाले होते की “द एक्सलन्स शुड नॉट बी सॅक्रिफाईसड् फॉर दे सेक ऑफ युनिव्हर्स्यालिटी.” एखादी गोष्ट सार्वत्रिक करण्याच्या अट्टाहासापायी काही लोकांच्या विशेष गुणवत्तांचा बळी पडता कामा नये. “एक्सलन्स मस्ट बी एनकरेजड्.” आपण शिक्षणाचं उदाहरण घेऊ. सगळ्यांना शिक्षण देण्यासाठी जर आपणाला काही लोकांना आवर घालावा लागला किंवा अडवून ठेवावं लागलं किंवा जर त्यांना विशेष संधी नाकाराव्या लागल्या तर ते योग्य होणार नाही असी त्यांची भूमिकाच होती. त्यामुले न का शिकेनात लोक, ८० टक्के लोक असेनात का निरक्षर, आपल्याला काय करायचंय? ९० टक्के बायका निरक्षर आहेत, असेनात का? काही जे शिकू शकतात त्यांना मात्र हवं ते प्रगत व उच्च शिक्षण मिळालंच पाहिजे! त्यांना “हाय टेक्नॉलॉजी” चं शिक्षण मिळालं पाहिजे! त्यांना परदेशात जाऊन शिकता आलं पाहिजे! इथे निर्माण झालेले सर्व इंजिनिअर्स परदेशात गेले तरी चालेल पण उच्च शिक्षण त्यांना उपलब्ध झालं पाहिजे. कारण ती माणसं “इनडिस्पेन्सिबल” आहेत. ती माणसंच विचारात घेण्यासारखी आहेत. कारण फक्त तीच २१ व्या शतकात जाण्याची आकांक्षा बाळगतात, सामर्थ्य बाळगतात आणि ज्यांच्या ठिकाणी हे सामर्थ्य नाही, ही कुवत नाही त्यांना मरु देत, त्यांना राहू हेत मागे. ते अगदी १७ व्या शतकात राहिलेत तरी चालेल. आपण आपलं २१ व्या शतकात जायचं. २१ व्या शतकात जाणा-यांची संख्या १० टक्के असली तरी असेना का, मग बाकीचे सगळे डिस्पेन्सिबल आहेत. बाकीचे सगळे डिस्पेन्सिबल आहेत. बाकीचे सगळे नगण्य आहेत. त्यांचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही, त्यांच्यासाठी खोळंबून बसण्यात काही मतलब नाही. युद्धाच्या किंवा आकस्मिक संकटाच्या काळात जीव घेऊन पळून जाता लोक लंगडे, म्हातारे, पांगळे, लुळे असलेल्यांचा विचार करीत नाहीत, सोडून देतात त्यांना तिथे. तसा हा विचार आहे. ही आजची आपली विदारक वस्तुस्थिती आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org