व्याख्यानमाला-१९९२-२ (38)

समुचित तंत्रज्ञान हे उत्क्रांत करण्यासाठी सर्वात पहिली आवश्यक जर कुठली गोष्ट असेल तर ती ही आहे की “आर अँण्ड डी” रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट नावाचा जो विभाग असतो प्रत्येक कारखान्यामध्ये, त्याला पहिल्यांदा आपण अभिजनांच्या स्वार्थापासून सोडवला पाहिजे. आज आर. अँण्ड डी. मध्ये काय चालतं? मल्टिनॅशनल्सचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल? नफा जास्तीत जास्त कसा वाढविता येईल? जास्तीत जास्त श्रमिकांना कसं काढून टाकता येईल? अल्पावधीमध्ये व कमी कष्टानं आणि माणसांऐवजी यंत्रांच्या द्वारे जास्तीत जास्त माल कसा उत्पन्न केला जाईल? कार्यक्षमता कशी वाढविली जाईल? आर. अँण्ड डी. चे जे प्रयोजन आहे, संशोधन आणि विकास ह्या नावानं केलं जाणारं हे जे सबंध संशोधन आहे ते आपल्याला अभिजन स्वार्थापासून सोडवलं पाहिजे. विपुल लोकसंख्येच्या देशातील समुचित तंत्रज्ञान मजुरांची बचत करीत नसतं ही पहिली गोष्ट या देशाच्या संदर्भात महत्वाची आहे. इथे जर समुचित तंत्रज्ञानाचा विचार करायचा असेल तर मनुष्यबळ हे इथलं महत्वाचं संसाधन आहे. तेव्हा माणसांची बचन करणारे तंत्रज्ञान हे इथलं समुचित तंत्रज्ञान असू शकणार नाही, हे लक्षात घ्यावं लागेल. जास्तीत जास्त माणसांना रोजगार देणारं तंत्रज्ञान हेच इतलं समुचित तंत्रज्ञान असू शकेल. आणि तोसुद्धा पूर्ण रोजगार, आनंददायी रोजगार, मघाशी सांगितल्याप्रमाणे त्या रोजगारापासून निर्मितीचा आनंद मिळाला पाहिजे. काहीतरी करतोय याचा आनंद मिळाला पाहिजे, माणूस समाजाशी जोडला जायला पाहिजे. समुचित तंत्र५नाची ही पूर्वअट आहे की ते तंत्र५न प्रत्येकाला अवगत करता आलं पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यातू मागणी आणि पुरवठा यामध्ये एक संतुलन आपोआप निर्माण होईल. आज दुष्टचक्र असं झालंय की कारखान्यात जो माल होतो तो फक्त २० टक्के लोकांच्या गरजांच्या पूर्तीसाठी असतो. तो खपविण्यासाठी कृत्रिमरीत्या गरजा निर्माण कराव्या लागतात. त्यासाठी जाहिरातबाजी करावी लागते. मध्यस्था, दलाल, एजंट नेमावे लागतात. त्यामुले कितीतरी अनुत्पादक माणसं उत्पादक व उपभोक्ता यांच्यामध्ये येतात. अशा अनुत्पादक लोकांची फौजच्या फौज निर्माण होते. त्या सगळ्यांचा खर्च उपभोक्त्यांच्या डोक्यावर बसतो. मी जेव्हा एक ‘सेव्हन ओ क्लॉक’ ब्लेड विकत घेत असोत तेव्हा मी किती लोकांना पैसे देतो? डॉक्टरीणबाई इथं बसल्यात, त्या सांगतील की औषधांच्या किंमती भडकतात त्या कशामुळे भडकतात? आज उत्पादनमूल्याच्या दोनशे तीनशे पटींनी औषधांच्या किंमती वाढलेल्या आहेत हे असं का होतं? कारण तो एजंट आहे, त्या महागड्या जाहिराती आहेत,  अनुचित तंत्रज्ञान आहे, तो पोषाखी मॅनेजरवर्ग आहे. या सगळ्या अनुत्पादक वर्गाच्या पांढ-या हत्तीला सध्याच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये आम्ही पोसतो आहोत. या सगळ्यांचा खर्च तुमच्या आमच्या सर्व ग्राहकांच्या बोकांडी बसतो.अनुरूप तंत्रज्ञान ते या मधल्या अनुत्पादक घटकांना फाटा देतं. त्यांची तिथे काही गरजच नसते. लोकांची ज्या गोष्टींची मागणी आहे त्याच गोष्टी तिथं तयार होतील. म्हणजे मागणी आधीच असल्यामुळे त्या मालासाठी मागण्या निर्माण करीत फिरावं लागणार नाही. जाहिरातबाजीची गरज पडणारच नाही. मोठमोठाले होर्डर्स लावायची, मोठमोठ्या वर्तमानपत्रात पान – पानभर जाहिराती करायची गरज पडणारच नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org