व्याख्यानमाला-१९९२-२ (36)

आज माणसाचं अस्तित्व त्याच्या विकासक्रमामुळे धोक्यात आलेलं आहे ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही. आपण कितीही तिच्याकडे दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी करू शकणार नाही अशी आजची परिस्थिती आहे. तेव्हा विकासाचा पर्यायी नमुना निवडत असताना याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. स्वामित्वाच्या आधारे निसर्गाकडे पाहणं माणसाला सोडून द्यावं लागेल. काल मी असं म्हणालो की नाही आणि निसर्ग यांच्याकडे स्वामित्वाच्या भावनेतून पाहिल्यामुळे ही अराजकी संस्कृती इथे निर्माण झालेली आहे. उन्मत्त माणसाला वाटतं दूरचा विचार आपण कशाला करायचा? काय करायचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होतय आणि काय नाही या गोष्टीशी? आज आपण खावं प्यावं मजा करावी. ही जी चंगळवादी व आप्पलपोटी संस्कृती आहे ही आपल्याला पहिल्यांदा सोडून द्यावी लागेल. समग्र सृष्टीच्या अस्तित्वाच्या संदर्भात या सगळ्या गोष्टींचा विचार कराव लागेल. मग आपल्याला असं दिसेल की ज्याला आपण अनुरूप तंत्रज्ञान म्हणतो ते त्या अनुरूप तंत्रज्ञानाचा अंगीकार आपल्याला करावाच लागेल. अनुरूप तंत्रज्ञान हा शब्द आज मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. अनुरूप तंत्रज्ञान या शब्दाचं साहचर्य हे गांधींच्या विचारांशी आहे. या देशामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये महात्मा गांधी या व्यक्तीने जेवढा विकासाचा समग्रपणे विचार केलेला आहे. तेवढा दुस-या कोणीही केलेला नाही. आणि अनुरूप तंत्रज्ञानाबद्दल त्यांच्या एका शिष्याने जे. सी. कुमारप्पा यांनी – जशी स्पष्ट मांडणी केली आहे तशीही अन्यत्र कुठे आढळत नाही. जे. सी. कुमारप्पा या माणसाची या वर्षी जन्मशताब्दी आहे हेसुद्धा आपल्यापैकी काही जणांना कादाचित माहीत नसेल. जे. सी. कुमारप्पा हे गांधीवादी अर्थशास्त्रज्ञ होते. या माणसाने अर्थशास्त्राव २५ पुस्तकं लिहिली आहेत. आणि ती आजच्या काळात अत्यंत प्रस्तुत आहेत, अभ्यसनीय आहेत. पण दुदैवाने ती सगळी आज उपलब्ध नाहीत, जी उपलब्ध आहेत. तीही वाचली जात नाहीत. जी वाचली जातात त्यांची कोणी दखल घेत नाहीत. खरं तर गांधीवादालाच मुळात आपण आश्रमवासी करून टाकलं असल्यामुळे जे. सी. कुमारप्पा सुद्धा आश्रमवासी झालेले आहेत. आश्रमवासी असलेले गांधीवादी काही कामाचे नसतात हे उघडच आहे.

तेव्हा जे. सी. कुमारप्पा यांचं ‘व्हाय व्हिलेज मुव्हमेंट’ नांवाचं एक पुस्तक आहे. ज्यांनी ते वाचलं नसेल त्यांना ते वाचायची मी खरोखरच विनंती करेन. व्हाय व्हिलेज मुव्हमेंट या पुस्तकाला गांधीजींनी प्रस्तावना लिहिली आहे. आणि गांधीजींनी प्रस्तावना लिहीत असताना असं लिहीलय की हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी जे. सी. कुमारप्पा यांना डॉक्टर ऑफ व्हिलेजेस् अशी पदवी दिलेली आहे. खेड्यात जायची गरज काय आहे, यांची मांडणी करताना जे. सी. कुमारप्पा यांनी अत्यंत सविस्तर, प्रयोगांवर आधारित उपाय सांगितले. केवळ काल्पनिक कथा किंवा केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष प्रयोग केले आणि प्रयोगांतून काही निष्कर्ष काढले, त्या निष्कर्षाच्या आधाराने त्यांनी अनुरूप तंत्रज्ञानाची मांडणी केलेली आहे. ती अत्यंत महत्वाची आहे. हे अनुरूप तंत्रज्ञान काय आहे? काहींना असं वाटतं की अनुरूप तंत्रज्ञान म्हणजे साधं सोपं परंपरेनं चालत आलेलं कालबाह्य तंत्रज्ञान. टवाळीसाठी म्हणून काही लोक चरख्याचा उल्लेख करतात, की गांधी आम्हाला पुन्हा मध्ययुगात न्यायला पाहताहेत. ते मध्ययुगीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार करताहेत. नाही. अनुरूप तंत्रज्ञानाचा तो अर्थ नाही. अनुरूप तंत्रज्ञान म्हणजे आधुनिकता व पारंपरिकता यांचा योग्य समन्वय घालणारं तंत्रज्ञान ते इथल्या पर्यावराणाशी जुळणारं असलं पाहिजे ते स्वस्त असलं पाहिजे, ते सुलभ असलं पाहिजे. ते शिकणं प्रत्येकाला सहजशक्य असलं पाहिजे. काल मी आपल्याला असं म्हणालो, जे तंत्रज्ञान सर्वांना सहज अवगत होऊ शकतं ते तंत्रज्ञान समताकारी असतं, जे तंत्रज्ञान विशेषतज्ञाना फ्कत उपलब्ध होत असतं किंवा धनिकांनाच फक्त उपलब्ध असतं ते विषमताकारी असतं. कॉम्प्यूटर खरेदी करणं किंवा वापरणं ही फक्त या समाजातल्या जेमतेम १० टक्के लोकांची मिरासदारी असू शकते. असं तंत्रज्ञान सामान्यांसाठी काही कामाचं नसतं. सामान्य माणसांना निरक्षर करणारं ते तंत्रज्ञान आहे. माझ्यासारखा दोन पदव्या धारण करणारा मामूससुद्धा कॉम्प्यूटरपुढे निरक्षर असतो, म्हणजे आधीच या देशातली निरक्षरता ७० टक्के आहे. त्यामध्ये ही नवीन निरक्षरणा जर मोजली तर किती प्रमाण होईल? तुमच्यापैकी अनेकजण कॉम्प्यूटरसमोर निरक्षर असतली. तंत्रज्ञानामुळे अशी नवी निरक्षरता निर्माण होता कामा नये. तंत्रज्ञान असं असलं पाहिजे की ज्यांच प्रशिक्षण, ज्याच्यामधला सहभाग आणि ज्याचा वापर हा समाजातल्या जास्तीत जास्त माणसांना सहज करता आला पाहिजे. अनुरूप तंत्रज्ञान म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान नको असा अर्थ नाही. अनुरूप तंत्रज्ञान हे अत्यंत आधुनिक असू शकतं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org