व्याख्यानमाला-१९९२-२ (33)

तंत्रज्ञानाची निवड करताना माणसाला निर्मितीचा आनंद होईल असेच तंत्रज्ञान निवडले पाहिजे. आपण काहीतरी वेगळं नवीन करतोय. मडकं घडवणा-या कुंभारालासुद्धा प्रत्येक मडकं वेगळ्या आकारचं करायचा आनंद मिळाला पाहिजे. त्याच्यवर डिझाईन करण्याचा आनंद मिळाला पाहिजे. ठोकळेबाजपणा जेव्हा निर्मितीमध्ये येतो तेव्हा ही सर्जनशीलता संपते, एकाच छापाचे गणपती जेव्हा एखादा कुंभार तयार करतो तेव्हा त्याची कला संपते, आणि व्यवसाय सुरू होतो. तेव्हा त्याला कलेचा आनंद मिळू शकत नाही. निर्मितीचा आनंद मिळू शकत नाही. कारण छापाचे गणपती फक्त यांत्रिक पद्धतीनं तयार करायचे असतात. वेगाने तयार करायचे असतात. आय़ुष्याचं यांत्रिकीकरण करणारं तंत्रज्ञान हे माणसाला शोभेसं तंत्रज्ञान नाही असं थोडक्यात सांगता येईल. कुठलंही आणि ते जर जबरदस्तीने लादलं जात असेल तर ते अधिकच त्याज्य ठरतं.

माणसाचं माणूसपण अशाप्रकारे त्याला जाणीवपूर्वक निर्मिती करता येण्यात आहे. दुसरं असं आहे की ते त्याला इतर माणसांच्याबद्दल वाटणा-या सौहार्दामध्ये आहे. माणसाला माणसाविषयी सौहार्य वाटणं, माणसाला माणसाविषयी ज्याला इंग्रजीमध्ये ‘एम्पथी’ असे म्हणतात ती वाटणं, जवळीक वाटणं, जिव्हाळा वाटणं, एक नातेसंबंध वाटणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जे तंत्रज्ञान माणसा माणसातील या जिव्हाळ्याचा ओलावा नष्ट करतं, ज्या तंत्रज्ञानामधून माणसा माणसांचे संबंध कोरडे होत जातात. ते मुळीच ग्राह्य म्हणता येणार नाही. आपल्या विकासातून निष्पन्न झालेल्या संस्कृतीचे चित्र शहरीजीवनात स्पष्टपणे दिसू लागले आहे. तिला फ्लॅट संस्कृती असे आपण म्हणतो. शेजारी राहतोय कोण? करतोय काय? मेला की जिवंत आहे काही कोणाला माहीत नसतं. माणूस माणसाला ओळखत नाही. माणसं बिनचेह-याची होतात, माणसं बिनचेह-याची जिथं होतात तिथे ते तंत्रज्ञान आणि तो विकास हा ख-या अर्थाने मानवी चेह-याचा विकास राहात नाही, तर तो यंत्रमानव निर्माण करण्याचा कारखाना होऊन बसतो. आपण आपल्या आजच्या विकासाच्या क्रमात यंत्रमानव निर्माण करतो. समजातल्या काही लोकांना असं वाटतं की आपल्या ठिकाणी प्रतिभा आहे. कारण आपल्या हाती पैसा आहे. पैसेवाले स्वतःला प्रतिभावंत समजतात आणि ज्यांच्याजवळ पैसे नाहीत, ज्यांना त्यांच्यावरती अवलंबून रहावं लागतं त्यांना मात्र ते फक्त जेवणारे – खाणारे आणि पोरावळा निर्माण करणारे यंत्रमानव एवढाच फक्त दर्जा देतात. अशा पद्धतीने माणसा-माणसातला जिव्हाळा नष्ट करणारे तंत्रज्ञान त्याज्य ठरते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org