व्याख्यानमाला-१९९२-२ (32)

तंत्रज्ञानाची निवड करताना आपल्याला हाही नैतिक निकष लावावा लागेल की या तंत्रज्ञानातून मानवी जीवन समृद्ध होतं, उन्नत होतं, की अधोगतीला लागतं. माणसाचं माणूसपण टिकवणारं तंत्रज्ञान असावं असं म्हणत असताना माणूसपणा कशात आहे? आहार-निद्रा-भाय-मैथून यात माणूसपणा आहे का? केवळ प्रजोत्पादनामद्ये माणूसपणा आहे का? किडामुंगीसुद्धा प्रजोत्पादन करतात. प्राणीसुद्धा कळपाने राहतात. माणसाचं माणूसपण कशात आहे? जाणीवपूर्वक निर्मितीक्षमता अंगी बाळगणे यातच माणसाचं माणूसपण आहे. माणूस जाणीवपूर्वक निर्मिती करतो. आपण ते सुगरणीचं घरटं पाहिलं असेल. तीसुद्धा निर्मिती असते. सुंदर असते, आकर्षक असते. परंतु जाणीवपूर्वक केलेली नसते. नैसर्गिकपणे केलेली असते. सुगरण हजारो वर्षे ती तशीच करीत आलेली आहे. जोतिराव फुल्यांनी शंभरदीडशे वर्षापूर्वी माणसाचं माणूसपण कशात आहे हे सांगताना माणसाची सुगरणीशी तुलना करून हे दाखवलं की माणसाच्या घरांची रचना पर्यावरणाप्रमाणे बदलते, वातावरणाप्रमाणे बदलते. काळाप्रमाणे बदलते आणि त्याच्यमुळे माणसाचं माणूसपण हे जाणीवपूर्वक निर्मिती करण्यामध्ये आहे. एखादा कलावंत कलाकृती निर्माण करतो. एखादा माणूस एखादी वस्तू निर्माण करतो. या वस्तू निर्माण करण्यामध्ये त्याची प्रतिभा, त्याची कल्पनाशक्ती, त्याचं वेगळंपण तो ओतत असतो. प्रत्येक माणसाच्या निर्मितक्षमतेला वाव मिळणं हे आदर्श समाजाचं लक्षण आहे. तेव्हा तंत्रज्ञान असं असावं की जे माणसाच्या या माणूसपणाला बाधा आणीत नाही.

स्टॅलिनच्या काळातल्या एका कामगाराचे विडंबनपर वर्णन चार्ली चॅप्लिनने आपल्या एका सिनेमात फार चांगलं दाखवंलं आहे. एका कामगाराला एका व्यक्तीने विचारलं, ‘तू काय काम करतोस?’ तो म्हणाला, ‘मी फक्त एक बोलट बसवतो.’ मग तुझ्या कामाबद्दल तुला काय वाटतं? तो म्हणाला, ‘काही नाही, मला फक्त एक गोष्ट माहिती की मी जे बोलट बसवतो त्याला बरोबर नऊ आटे आहेत, ते आठही नाहीत आणि दहाही नाहीत.’ यांत्रिक पद्धतीने एक गोष्ट जन्मभर करीत राहणे किती कंटाळवाणं असतं! त्याचं काम तेवढंच, पगार मिळतो त्याला पोट भरतं त्याचं. त्याच्या कुटुंबियांचंसुद्धा. रोजगार मिळालाय त्याला. तक्रकारीला जागा नाही. परंतु हा जो रोजगार त्याला मिळालेला आहे तो माणसाला लायक असलेला रोजगार नाही. खड्डे खोदा, परत भरा. परत खोदा असासुद्धा रोजगार असू शकतो. तुम्हास रोजगारच पाहिजे ना? मग रोजगार हमी योजनेवर जा, खड्डे खोदा परत बुजवा, कारण रोजगार मिळाला पाहिजे. परत खोदा परत बुजवा. रोजगार आहे. पैसा मिळतो. संध्याकाळी पोट भरतं तुमचं, मग तुम्हाला काय हवय? तुमची काय तक्रार आहे? तक्रार ही आहे की हा रोजगार माणसाला साजेसा रोजगार नाही. कारण माणसाच्या प्रतिभेला त्यात वाव नाही. कल्पनाशक्तीला त्यात वाव नाही. काय मानतो आपण की माझ्या ठिकाणी बुद्धिमत्ता आहे. मी घराचा नकसा काढणार आणि बांधकामासाठी लेबर लावणार त्यांना मात्र बुद्धीचा काही संबंधच नाही. ती जणू माणसं नव्हेत. ती जनावरं आहेत ती विचार करू शकत नाहीत. त्यामुले विचार करण्याचा मक्ता माझ्याकडे आणि राबण्याचं काम मात्र शेकडो मजुरांचं, त्यांनी डोक्याचा वापर करायचा नाही. अशी वाटणी एखादं तंत्रज्ञान करतं तेव्हा हे तंत्रज्ञान माणसासाठी अनुरूप तंत्रज्ञान असत नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org