व्याख्यानमाला-१९९२-२ (31)

गांधीजींनी जेव्हा हिंदस्वराज्य नावाचं पुस्तक १९०४ साली लिहिलं तेव्हा गजहब झाला होता. लोक तुटून पडले होते की हा माणूस काय प्रतिगामी आहे! या देशातल्या सगळ्या डाव्या विचारवंतांना गांधी हे प्रतिगामी वाटले होते. त्या काळात कारण त्यांनी असं सांगितलं होतं की, ख-या स्वराज्यतील समाजात वकील नकोत, डॉक्टर नकोत, रेल्वे नको. का सांगितलं होतं असं त्यांनी? कारण त्यांच्या मते स्वराज्याचा काहीएक अर्थ होता. ते म्हणतात या देशातले गोरे लोक निघून गेले आणि त्यांची, त्यांनी येथे निर्माण केलेली सभ्यता जर जशीच्या तशी त्यांच्या पश्चात इथं कायम राहिली तर मिळणारं स्वातंत्र्य हे स्वराज्य असणार नाही, राज्यकर्ते फक्त बदलतील. त्यांची सभ्यता, त्यांचं तंत्रज्ञान, त्यांची राज्यपद्धती सारं काही तसंच राहील आणि असं जर असेल तर आताची ही गुलामीही कायम राहील. ही गुलामी जर ख-या अर्थाने नष्ट व्हायची असेल तर सर्वच बाबतीतील पर्यायांचा विचार केला पाहिजे. संसदीय लोकशाहीवर गांधीजींचा विश्वास तेव्हाही नव्हता, कधीच नव्हता. गांधींनी सांगितलं होतं, संसद ही काय आहे? संसदेला त्यांनी वेश्येची उपमा दिली होती. अनेक लोक चिडले होते. त्यांच्या मते चवचाल असते संसद, विकली जाते संसद! इकडचं बहुमत तिकडं व्हायला काय लागत नाही. आज आपण संसदेचं/ विधिमंडळाचं प्रत्यक्ष कामकाज पाहिल्यानंतर गांधींचे ते शब्द आपल्याला कल्पनाशक्तीचे भीषण भयंकर प्रलाप तर वाटतच नाहीत, उलट अल्पोक्ती वाटते. कारण वेश्यांपेक्षाही वाईट अवस्था त्याची आहे. गुंडांचे ते अड्डे झालेले आहेत. मारामारी करतात तेथे लोकप्रतिनिधी! खुल्या चर्चेतून निर्णय घेण्याचं व्यासपीठ असं गोंडस व सौजन्यशील शब्दांत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना संसदेची व्याख्या सांगतो आणि प्रत्यक्षात टी. व्ही. वर ते पाहतात तर संसदेत मासळी बाजारापेक्षा घाणेरडा झालेला प्रकार त्यांना दिसतो. तिथे कोणी मारामारी करतात, कोणी माईक उचलून घेतात, कोणी कोणाला बोलू देत नाहीत. म्हणजे शक्ती प्रदर्शनाची जागा, कुस्तीचा अड्डा असं स्वरूप संसदेला आलेलं आहे. जिथं लोक लोकांच्या, मतदारांच्यावतीने बोलत नाहीत, मतदारांचा खरा आवाज बुलंद करीत नाहीत, जिथं लोक खोटं बोलतात अशी संसद कामाची नाही असं गांधींनी तेव्हा सांगितलं होतं. या सबंध व्यवस्थेलाच गांधीजींचा विरोध होता. त्यातल्या तंत्रज्ञानालासुद्धा विरोध होता. कारण त्यांच्या मते यंत्रांचा उपयोग करायला हरकत नाही, पण माणूस यंत्रांचा गुलाम होता कामा नये.

यंत्रांचं स्थान हे माणसाला दुय्यमच राहिलं पाहिजे, माणसाला पूरकच राहिलं पाहिजे. माणसाच्या सुखात यंत्राने भर घालायला काही हरकत नाही. पण माणसाच्या डोक्याचा ताबा घेणारं यंत्र येता कामा नये. आज आपण जी यंत्रसामग्री इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने आणि तंत्रक्रांतीच्या नावाने आणलेली आहे ती माणसाच्या डोक्याचं खोकं करून टाकणारी आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. काल मी सांगितल्याप्रमाणे जिथे विचारशक्ती संपते तिथे स्वार्थ येतो, मतलब येतो, निगरगट्टपणा येतो. अशाप्रकारची संस्कृती माणसाचं माणूसपण नष्ट करणारी संस्कृती आहे. तीच येथे या यंत्रसामग्रीने निर्माण केलेली आहे, नव्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org