व्याख्यानमाला-१९९२-२ (29)

अशा पद्धतीने पाश्चात्य, विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित असलेला विकासाचा नमुना, पाश्चिमात्य भांडवलशाही, भांडवलप्रधान विकास-प्रतिमानावर आधारित असलेला विकास हा लोकांनी आज नाकारलेला आहे किंवा आव्हानित केलेला आहे. या विज्ञानतंज्ञानावर अंधश्रद्धा नको. नेहरूंची ती होती, मी काल सांगितल्याप्रमाणे यशवंतरावांची होती, किंवा त्या संपूर्ण पिढचीच होती. राजीव गांधींची तर भायनक अंधश्रद्धा होती. विज्ञान तंत्रज्ञानातून प्रश्न मिटतील, विज्ञान-तंत्रज्ञानातून समाजवाद येईल असं त्यांना वाटत होतं. या सगळ्यांना हा लढा आव्हानित करतो आहे. विज्ञान तंत्रज्ञानावरती अशी अंधश्रद्धा ठेवून चालणार नाही. नियोजन मंडळाला या देशाच्या साधनसामुग्रीचा वाटेल तसा उपयोग करण्याचा अधिकार कोणीही बहाल केलेला नाही. किंबहुना नियोजन मंडळाने दिल्लीत बसून संपूर्ण नियोजन करायचं ही जी केंद्रीभूत नियोजनाची पद्धत आहे. तीच मुळात आव्हानित केली गेलेली आहे. काय अधिकार आहे नियोजन मंडळाला एका चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासींच्यासंबंधीचे, त्यांच्या साधनसामग्रीच्या वापर करण्यासंबंधीचे निर्णय घेण्याचा? तो तिथे बसून घेतला जाऊ शकत नाही. याच्यासाठी विकेंद्रितच नियोजन लागेल. तिथल्या माणसांना हे ठरवावं लागेल. केंद्रीय नियोजन मंडलाला नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबडून घेण्याचा, ती हवी तशी वापरण्याचा, तिचा स्वार्थी विध्वंस करण्याचा कोणीही मक्ता दिलेला नाही आणि आम जनतेला या निसर्ग साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करता यावा. निसर्ग आणि मानव यांच्यामधलं संतुलन कायम टिकवून तो करता यावा. जी साधनसामग्री नूतनीकरण केली जाऊ शकत नाही तिचा वापर अत्यंत जपून केला जावा. पर्यायी अशा नवीन साधन सामुग्रीचा शोध घेतला जावा. या सगळ्या मागण्या या एका आंदोलनातून समोर आलेल्या आहेत. मी या लढ्याला या सर्व माण्यांचं प्रतीक मानतो, प्रातिनिधिक मानतो. एका पर्यायी विकासनीतीची मागणी हा लढा करीत आहे. तसं ते केल्याशिवाय दुसरा उपायच नाही. सध्या आहे त्या व्यवस्थेमध्ये पुरेसा रोजगार मिळणार नाही, सन्माननीय रोजगार मिळणार नाही. सामान्य माणसाचा विकास होणार नाही. सामान्य माणसाच्या दृष्टेने अर्थव्यवस्था राबविली जाणार नाही. हे सगळं व्हायचं असेल तर एका वेगळ्या दिशेनंच आपल्याला विकासाचा गाडा न्यावा लागेल.

काल मी असं सांगितलं की तंत्रज्ञान मूल्यमुक्त नसतं. तंत्रज्ञान तटस्थ नसतं. प्रत्येक तंत्रज्ञानाचे बरेवाईट परिणाम समाजावर होतच असतात. तंत्रज्ञानामधून समाजामध्ये काही सांस्कृतिक-सामाजिक-आर्थिक बदल सुरू होतच असतात. तंत्रज्ञानाचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम वेगवेगळ्या समाजघटकांवर होत असतात. पुरुषांवर वेगळे होतात – स्त्रियांवर वेगळे होतात, स्पृश्यांवर वेगळे होतात, अस्पृश्यांवर वेगळे होतात. कोणालातरी ते लाभदायक होतात तर कोणालातरी हानिकारक होतात. तेव्हा कुठल्याही तंत्रज्ञानाबद्दल बोलताना हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे. मग पुढचा प्रश्न असा येतो की तंत्रज्ञानाची निवड आपण कशी करायची? पर्यायी विकासनीती ठरवत असताना आपण कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा? तंत्रज्ञानाची निवड ही अभियांत्रिकी कार्यक्षमतेच्या निकषावर केली जाऊ शकत नाही. अभियांत्रिकी कार्यक्षमता (मेकॅनिकल इफिशियन्सी) इंजिनिअरींग इफिशियन्सी म्हणजे कोणतीही गोष्ट किती कार्यक्षम आहे एवढ्यावरच तिची ग्राह्याग्राह्यता ठरवायची. आताच्या आपल्या विकास प्रतिमानाची निवड बव्हंशी याच एका निकषावर झालेली आहे. यशस्वी होण्यासाठी कुठल्याही मार्गाचा वापर केला तरी आजच्या विकास प्रतिमानामध्ये तो क्षम्य ठरतो. सूक्तसूक्त कुठलाही मार्ग वापरा आणि यशस्वी व्हा. कारण यशासारखी यशस्वी होणारी  दुसरी कुठलीही गोष्ट नाही हे आजच्या विकास प्रतिमानाचं गृहीत आहे. हे गृहीतच आपल्याला सर्वात पहिल्यांजा नाकारावं लागले. एखादी गोष्ट केवळ यशस्वी होते म्हणून चांगली आहे असं नाही तर नैतिक निकष लावावे लागतील.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org