व्याख्यानमाला-१९९२-२ (24)

या सगळ्या विकासक्रमामध्ये जे वंचित राहतात ज्यांची संख्या ८० टक्के आहे, ते जेव्हा अस्वस्थ होतात, ते जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्यांच्याशी वागण्याची एकच भाषा फक्त आम्हाला माहीत असते ती म्हणजे दडपणे. आमचे गृहमंत्री आज म्हणाले की लष्कराला नाहीतरी काही उद्योग नाही युद्ध नसल्यामुळे, त्यामुळे आम्ही ते वापरणार आहोत, लष्कराच्या मदतीशिवाय यांना निवडणुका घेता येत नाहीत. काय लोकशाही आहे आपली? निवडणूका होऊ शकत नाहीत कारण पुरेसं लष्कर उपलब्ध नाही म्हणून. जसं काही निवडणुकांसाठी मतपेट्याप्रमाणे लष्करही लागतं. शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून आम्ही टेररिस्टांच्या प्रश्नाला एकजात सरसकट सारखेच ठरवतो. जसे काही आसामचे टेररिस्ट, पंजाबचे टेररिस्ट, काश्मीरचे टेररिस्ट हे सगळे एकच आहेत. आणि मग आम्ही टेररिस्ट डिसरपटिव्ह अँक्ट करतो व राज्याच्या ठिकाणी अमर्याद सत्ता देतो. आणि मग त्या सत्तेचा वापर करून आपल्या कुठल्याही विरोधकाला टेररिस्ट ठरवून मारता येते राज्यसंस्थेला. तो टेररिस्ट असलाच पाहिजे असे नाही. आणि कोणीही टेररिस्ट हा जन्मजात टेररिस्ट नसतो. नक्षलवाद्यांच्या विचाराचा मी नाही. हिंसाचारातून या समाजाचे प्रश्न मिटतील हे मी मानीत नाही. परंतु कोणीही जन्मजात नक्षलवादी नसतो हे माझं म्हणणं आहे. या विकासाच्या विपरीत प्रक्रियेने निर्माण केलेले हे नक्षलवादी आहेत. राज्यकर्त्यांना जर संविधानाची भाषा समजत नसेल तर संविधानबाह्य माध्यमांचा वापर केला पाहिजे असं त्यांना वाटतं. ते चुकीच्या दिशेने निघाले असतील पण ते प्रामाणिक आहेत. आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलायला राजकीय मार्ग सापडत नाही, कारण तुमची राजकीय प्रतिभा संपलेली आहे. तुमची राजकीय विचारशक्ती संपलेली आहे. तुम्ही त्यांना फक्त वरवंट्याखाली भरडून काढू पाहता. वरवंट्याखाली भरडून कुठलाही टेररिस्ट कधी नष्ट होत नसतो. जगाच्या इतिहासामधील कोणतीही दहशतवादी चळवळ ही केवळ वरवंट्याखाली भरडून नष्ट झालेली नाही. टेररिझमचासुद्धा निचरा राजकीय प्रक्रियेतूनच केला जाऊ शकतो. परंतु आम्ही आज फक्त हिंसाचाराची भाषा करतो. अतिरेक्यांच्या हिंसाचारापेक्षा राज्यसंस्थेने केलेला हिंसाचार याचे स्वरूप जास्त भीषण असते. कारण राज्यसंस्था ही कायदेशीरपणे हिंसाचार करू शकते. राज्यसंस्थेचं हिंसाचार करण्याचं सामर्थ्य मोठं असतं म्हणून ती जास्त हिंसाचार करू शकते.

या लोकशाहीत सर्वात मोठा धोका हा आहे की, राज्यसंस्थेचे स्वरूप हिंसक होत चाललेलं आहे. आक्रमक, क्रूर आणि पाशवी होत चाललेलं आहे. चुकीच्या विकासक्रमाची फलश्रुती म्हणून निर्माण झालेला लोकांच्या मनामधला असंतोष दडपण्यासाठी राज्यसंस्था हिंसाचार करते. संघटित शेतमजूर मोर्चा काढतात, आणि हे लाठीमार आणि गोळीबार करतात. विकासातला ते वाटा मागतायेत. तुम्हाला तो वाटा देणे शक्य नसेल, या विकासक्रमाला शक्य नसेल तर वेगळा विचार करा.

जेव्हा आंदोलन उभं राहतं एखाद्या सरदार सरोवराच्या विरोधात नर्मदा आंदोलन उभं राहतं तेव्हा सबंध ताकदीनिशी सरकार ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतं. कारण ते आंदोलन हे एका धरणाशी संबंधित आंदोलन नसतं, हे आंदोलन केवळ तिथल्या विस्थापितांचं पुनर्वसन मागणारं आंदोलन नसतं तर या सबंध विकासक्रमाला आव्हानित करणारं ते आंदोलन असतं. ते हे सांगतं की तुम्ही जी विकासाची दिशा घेतली ती चुकीची आहे. आणि तिच्यामधून हे सगळे दुष्परिणाम निर्माण झालेले आहेत. तिच्यामधून या सगळ्या आपत्ती निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही जोपर्यंत याचा पुन्हा विचार करीत नाही तोपर्यंत हे प्रश्न मिटणार नाहीत.

नर्मदा आंदोलनाच्या स्वरूपात आज उभ्या राहिलेल्या आव्हानाच्या मुद्द्यावरच मी आज थांबतो. आपण त्याच्यावरची विचार करावा असं मी आपल्याला आवाहन करतो. माझ्यापरीने पर्यायी विकासाचं प्रतिमान कुठलं असू शकतं याची मांडणी करण्याचा उद्या मी प्रयत्न करीन. आजच्या व्याख्यानाबद्दल मी आपले आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org