व्याख्यानमाला-१९९२-२ (22)

लोकशाहीच्या दृष्टीने निम्म्या असलेल्या स्त्रिया, त्यांची अवस्था काय आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरातून स्त्रियांच्या पदरात कोणते लाभ पडले? स्त्रियांच्या चळवळींना आता याची जाणीव यायला लागलेली आहे. चळवळीत नसलेल्या स्त्रियांना तर अजूनही ती नाही. त्यांना आपल्या चार गोष्टी नुसत्या मिळाल्या, फुलासारख्या अलगद कोणी आणून दिल्या की त्या संतुष्ट होतात. पण चळवळीतल्या स्त्रियासुद्धा कालपरवापर्यंत स्त्री पुरुष समतेबद्दल भांडायच्या, घरात पुरुषांनी कामे केली पाहिजते वगैरे असा स्वरुपाची आंदोलनं करायच्या. आज त्यांच्या लक्षात आलं आहे की हा प्रश्न केवळ पुरुषांच्या बरोबरीने हक् मिळविण्याचा नाहीये तर हा या सबंध विज्ञान-तंत्रज्ञानाशी आणि विकासप्रक्रियेशी जोडला गेलेला प्रश्न आहे. जसं जसं नवं तंत्रज्ञान आलं तसतशा स्त्रिया त्या त्या क्षेत्रातून बाहेर फेकल्या गेल्या हा आलेख आता त्यांच्यासमोर आला. कुठलीही गोष्ट जोपर्यंत काबाडकष्टाची होती तोपर्यंत ते स्त्रीचं काम होतं. कडब्याची कटनी करायचं कष्टाचं काम, घाम गाळायचं काम स्त्रिया करायच्या. कटनी यंत्र आल्यावर ते पुरुषाचं काम झालं. कारण आता विजेचं बटन दाबावं लागतं, बेल्ट चढवावा लागतो, हे पुरुषी काम. तंत्रज्ञानाचं काम हे पुरुषाचं आणि हे तुम्हाला सांगतो थेट इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत खरं आहे. कॉम्प्युटर तयार करण्याच्या कारखान्यामध्ये स्त्रियांना दिली जाणारी कामं आणि पुरुषांना दिली जाणार कामं यामध्ये गुणात्मक फरक आहे. स्त्रियांना फक्त असेंब्लींगचे काम मिळतं. चार स्पेअरपार्ट घ्यायचे, ते जुळवायचे, त्याची काय असेल ती बांधणी करायची. रिपीटिटिव असं हे काम मानलं जातं. आणि काय फारसं डोकं लागत नाह, त्याला फक्त सवय लागते. त्याला फक्त सराव लागतो. तो केला की बायका ते काम करू शकतात. मग बायका जे काम करू शकतात त्याला बुद्धीची गरज नसते हा समज यातून दृढ होतो. इलेक्ट्रॉनिक्सच्या विविध यंत्रांचा वापर करणा-या बायकांनी याचा विचरा कराव की नव्या यंत्रतंत्रांचा प्रसार करण्याच्या या प्रक्रियेमध्ये एक कारस्थान अंतर्भूत आहे. स्त्रियांना उत्पादन प्रक्रियेतून वगळण्याचं. कॉम्प्युटरसंबंधी धोरणात्मक निर्णय घेताना किती स्त्रिया तिथं हजर होत्या. आपल्याला या या प्रकारची टेक्नॉलॉजी पाहिजे, या या प्रकारची नको, असं म्हणायला किती स्त्रिया हजर होत्या? आज स्त्रीवादी चळवळींनी ज्या इकोफेमिनिझम – पर्यावरणनिष्ट स्त्रीवाद – असं म्हणतात, ती भूमिका घ्यायला सुरूवात केलेली आहे. त्यांच्या हे लक्षात आलंय की जोपर्यंत आपण या विकासक्रमाच्या विरोधात बोलत नाही आणि विकासक्रमाच्या विरोधात भूमिका घेत नाही, तोपर्यंत आपल्या समस्या आपण ख-या अर्थाने सोडवू शकत नाही.

निसर्ग आणि स्त्रिया या दोघांवरही पुरुषांनी स्वामित्व गाजवलेलं आहे. स्वामत्व गाजवलंय याचा अर्थ त्यांच्यावर वाटेल तसे बलात्कार केलेले आहेत. त्यांना मन मानेल तसं वापरलेलं आहे. कुठल्याही परिणामांची तमा नकरता वापलेलं आहे. आणि या भोगवृत्तीला निसर्ग आणि स्त्रिया दोघांनाही बळी पडावं लागलेलं आहे. आणि आपल्याला एकत्रितपणे स्त्रियांचे हक्क आणि निसर्गाचे संरक्षण या चळवळी चालवाव्या लागतील हे भान स्त्रीवादी चळवळीला आज आलेलं आहे. लोकशाहीच्या दृष्टीने निम्मी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना आजच्या विकासाच्या प्रक्रियेतून काय मिळालेलं आहे किंवा त्यांच्या पदरात काय पडलेलं आहे याचा ताळेबंद आपल्याला घ्यावा लागेल. मग आपल्या लक्षात येईल की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्त्रीला तिचं योग्य ते स्थान, तिचा दर्जा, तिची प्रतिष्ठा आणि नागरिक म्हणून असलेली तिची स्वायत्तता या गोष्टी स्त्रियांना कधीही लाभू शकणार नाहीत. जोपर्यंत मूलतःच वेगळा विचार केला जात नाही तोपर्यंत.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org