व्याख्यानमाला-१९९२-२ (20)

म्हणजे विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्या त्रुटी – विकृती निर्माण झाल्यात त्या नीट समजावून न घेता आपण दरवेळी कोणीतरी काल्पनिक खलपुरुष निर्माण करतो. आणि त्यावरच शरसंधान करीत सुटतो. आपण समजतो की अमूक आमचा हितशत्रू आहे. हा आमचा दुष्मन आहे, हा मुस्लिम हा आमचा दुष्मन आहे. हा आमचा दुष्मन, तो आमचा दुष्मन आहे आणि मग त्यांच द्वेष मस्तर सुरू होतो, दंगली पेटवतात आणि दंगलींच्या त्या तापत्या तव्यावर राजकीय पुढारी आपला स्वार्थ साधून घेत असतात. हिंदुत्वाचं राजकारण करणारे जे कोणी आहेत किंवा इस्लामचं राजकारण करणारे जे कोणी आहेत किंवा जातीयतेचं राजकारण करणारे जे कोणी आहेत ते विकासाचे प्रश्न ख-या दृष्टीने समजावून सांगत नाहीत, लोकांना समजावून घेऊ देत नाहीत. लोकांची मनं भडकावतात आणि स्वतःचा स्वार्थच साधतात. त्यासाठी कधी ते गायीची शेपटी धरतील तर कधी गंगेचं पाणी आणतील तर कधी रामाची शपथ घेतील तर कधी एकता रथ काढतील! बहुसंख्यांकाना असं आक्रमक होतांना पाहिल्यावर अल्पसंख्याक आपल्या संकुचित विश्वात सुरक्षितता शोधू लागतात असं काहीतरी सुरू असतं. आणि या देशाच्या राजकारणामध्ये पेट्रोल ओतण्याचे काम आमच्या विकासप्रक्रियेतल्या विकृती व त्रुटी करीत असतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपल्या विकासाच्या क्रमामध्ये अधिक रोजगार निर्मा होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. या देशातले सगळे मुसलमान जरी आपण हाकलून दिले, सगळे दलित हद्दपार केले आणि या देशातले सगळे दाक्षिणात्या आपआपल्या प्रांतात परत पाठविले तरीसुद्धा उरलेल्या लोकांनाही रोजगार देण्याची ताकद आपल्या विकासप्रक्रियेत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि द्वेषाचं भ्रममूलक राजकारण थांबवलं पाहिजे.

आम्हाला बेकारीचा प्रश्न म्हणजे फक्त सुशिक्षित बेकारांचा वाटतो. हा तर फारच किरकोळ भाग आहे बेकारीचा. खरे बेकार खेड्यातील निरक्षर आहेत, शेतमजूनर आहेत किंवा अत्यंत अल्पभूधारक आहेत. ज्यांची बेकारी नोंदवलीच जात नाही. एम्प्लॉयमेटं एक्सचेंजमध्ये त्यांची नांवे नसतात, त्यामुळे ते बेकार नसतात असं थोडंच आहे. याचप्रमाणे पांच एकरांचा तुकडा धारण करणारा शेतकरीसुद्धा अर्धबेकार असतो तेव्हा अर्धबेकारी, छुपी बेकारी असे कितीतरी प्रकार आहेत आणि या विकास प्रतिमानामध्ये पूरण रोजगार, सन्मानीय रोजगार निर्माण होण्याची शक्यता नाही हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. कितीही कारखाने निघाले किंवा उद्योगधंदे निघाले तरीसुद्धा ग्रामीण भागातल्या बेरोजगारांना सन्माननीय रोजगार त्यातून उपलब्ध होऊ शकत नाही. प्रश्न केवळ लोकसंख्या वाढीचाही नाही. इथली निम्मी लोकसंख्या जरी भूकंपात गाडली गेली तरीसुद्धा उरलेली निम्मे याच प्रमाणात उपाशी राहील लक्षात घ्या. कारण आपल्या विकासाची चुकलेली दिशा या दुर्दशेला कारणीभूत आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे.

शहरीकरण या देशात झपाट्यानं चाललेलं आहे. लोक खेड्यातून शहरांत येतात. कशाशाठी शहरात येतात लोक? केवळ आकर्षण म्हणून येत नाहीत. शहरी जीवनाचं त्यांना आकर्षण वाटतं असा एक भ्रम आमचे लेखक निर्माण करतात. वस्तुतः त्यांना शहरी जीवनाचं आकर्षण नसतं. पण खेड्यात त्यांना पोट भरणं अशक्य झालेलं असतं. म्हणून ते शहराकडे धाव घेतात. खेड्याने नाकारलेले लोक, खेड्याने धिक्कारलेले लोक, खेड्याने बाहेर हुसकलेले लोक शहरात येतात. खेड्यामध्ये त्यांना ओळखणारे लोक असतात, म्हणून ते कुठलेही व्यवसाय तिथे करू शकत नाहीत. हमाली करू शकत नाहीत, बुटपॉलिश करू शकत नाहीत. शहरात आल्यानंतर त्यांना कोणी ओळखत नाहीत. तिथे ते अनामिक होतात, अँनानिमस होतात. अँनानिमस झाल्यानंतर ते वाटेल तो व्यवसाय करू शकतात. म्हणून ते शहरात येतात. शहरात येणा-यांना शहरामध्ये प्रतिष्ठापूर्ण रोजगाराची हमी असते म्हणून ते येत नाहीत, तर कसं बसं जगता येतं म्हणून येतात. यातून झोपडपट्ट्या वाढतात. आणि या गलिच्छ झोपडपट्ट्यांची राज्यकर्त्यांना लाज वाटल्यामुळे त्या उद्ध्वस्त केल्या जातात, राजकारणी लोकांच्या लहरीखातर, शहरांची विकृत होणारी वाढ त्यांच्यामुळे नागरी सुविधांवर पडणारा प्रचंड ताण आणि अक्षरशः मोडकळीला आलेली ती व्यवस्था हे आज चित्र आपल्याला शहरोशहरी दिसतंय. लोकशाहीच्या दृष्टीने हे भयानक खेडी ही राण्याच्या योग्यतेची होत नाहीत तोपर्यंत हे असंच चालणार आहे.

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org