व्याख्यानमाला-१९९२-२ (2)

सामान्य माणसाच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ काय? महात्मा गांधींनी ज्यावेळी स्वातंत्र्य संकल्पनेची मांडणी केली तेव्हा यशवंतराव गांधींच्या या मांडणीकडे आकर्षित झाले. गांधीजी म्हणाले होते, समाजातल्या शेवटच्या सामान्य माणसाला सार्वभौम सत्तेच्या विरोधात जोपर्यंत उभे राहता येत नाही, तोपर्यंत ख-या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं मी म्हणणार नाही. फाटक्यातला फाटका नागरिक आज सत्तेच्या विरोधात उभा राहिला पाहिजे. आणि यशवंतरावांना कुठेतरी ही खूणगाठ पटली की हेच आपल्या स्वराज्याचे सूत्र आणि ध्येय आहे. सामान्य माणसाची स्वायत्तता, सामान्य माणसाचा स्वाभिमान आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढावा, सामान्य माणसाची मुळं बळकट व्हावी. सशक्त मुळं असलेला माणूसच कुठल्याही सत्तेच्या विरोधात उभा राहू शकतो. सामान्यतः अनुभव असा आहे की राजकीय प्रतिकारशक्तीच नव्हे तर शारीरिक प्रतिकारशक्तीसुद्धा खेड्यातील शेतक-यांची साधारणतः जेवढी असते तेवढी शहरी कारखान्यात काम करणा-या, फॅक्टरीत काम करणा-या मजुराची नसते आणि त्याला एक कारण आहे. ते असे की शेतीत राबणा-या, कष्ट करणा-या माणसाचा आपल्या मुळांशी जैव संबंध असतो. ऑरगॅनिक संबंध टिकून असतो. कारखान्यात मजूर मुळांपासून तुटलेला असल्यामुळे दुबळा झालेला असतो. त्याची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते. त्यामुळे यशवंतरावांचा असा ठाम आग्रह होता की विकास हा शेतीशी संबंधित असचा असला पाहिजे. विकासाची गंगा सामान्य माणसाच्या उंबरठ्यार्यंत गेली पाहिजे.

यशवंतराव हा एक जाणता नेता होता. प्रत्यक्ष अनुभवांतून, जीवनानुभवांतून त्यांनी भोवतालची परिस्थिती नीट समजावून घेतलेली होती. स्वातंत्र्याचा सकारात्मक अर्थ त्यांना आपल्या नेतृत्वाची पायाभरणी करीत असतानाच गवसला होता. यशवंतरावांचं नेतृत्व हे वीटेवर वीट ठेवून पायरीपायरीनं क्रमशः तयार झालेलं नेतृत्व होतं. एकदम प्रकाशझोतात येऊन कालपर्यंत अज्ञात असलेली एखादी व्यक्ती महान नेता होतो तसा चमत्कार हा यशवंतरावांच्याबद्दल घडलेला नव्हता. नेतृत्वासंबंधीची त्यांची धारणासुद्धा अशीच आहे की नेतृत्व हे सामूहिक परिणाम करणारं असावं. यशवंतरावांनी असा सामूहिक परिणाम करण्याचा प्रयत्न केला. सबंध समाजाचं, भोवतालच्या समाजाचं उन्नयन करणारा, निश्चित अशी वैचारिक भूमिका असणारा, लोकांच्या मनाची मशागत करणारा तोच खरा नेता. राजकीय. स्वार्थासाठी लोकांच्या भावना भडकावून देणारा खरा नेताच नव्हे! विकासाठी-ख-याखु-या ग्रामीण विकासासाठी ज्या नेतृत्वाची आवश्यकता आहे ते नेतृत्व कसं असावं? तर ते संवेदनशील असावं, समूहातून वर आलेलं असावं, समूहाशी साक्षात संवाद असलेलं असावं आणि समूहाला काहीतरी वैचारिक दिशा देणारं असावं. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाबळेश्वरला काँग्रेस कार्यकर्त्यांना एक सांगितलं की मला जे नेतृत्व हवं आहे ते असं की ज्याच्यापुढे विकासाचा योजनाबद्ध व निश्चित कार्यक्रम असेल असंच नेतृत्व यापुढे काहीतरी करु शकेल. केवळ घोषणा करुन भागणार नाही तर या समाजाच्या सर्व उपलब्ध साधनसंपत्तीच्या आधारे येथील जनतेच्या विकासाच्या सर्व व्यक्त – सुप्त शक्तींना जे प्रवाहित करील आणि प्रवाहित करण्यासाठी ज्याच्यापाशी निश्चित असा कार्यक्रम असेल असे नेतृत्व यापुढं महाराष्ट्रात टिकेल.

यशवंतरावांच्या विकास कल्पनेविषयी बोलत असताना मी मुद्दामच अपेक्षा व फलश्रुती हे दोन्ही शब्द वापरले हे आपल्या लक्षात आलं असेल आणि यशवंतारावांना ज्या ज्या अपेक्षा बाळगल्या – नेतृत्वासंबंधी, विकासासंबंधी, शेतीसुधारेसंबंधी, सहकारासंबंधी, विकेंद्रीकरणासंबंधी, शिक्षणासंबंधी, त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत असे कोणीही म्हणणार नाही. मीही म्हणत नाही. विकासाची जी संकल्पना यशवंतरावांनी रेखाटली ती पूर्ण झालेली नाही. पण हे सर्व मान्य करून सुद्धा एक बाब निःसंशय उरतेच, ती ही की त्यांनी विकासाची जी रूपरेषा रेखाटली ती नीट समजून घेणे आजसुद्धा आवश्यक आहे. यशवंतरावांना ती साकार करण्यात अपयश आले असेल तर त्या आपयशाचीसुद्धा मीमांसा झाली पाहिजे. त्याच दृष्टीनं त्यांना यश कुठे आले आहे आणि अपयश कुठे आले आहे याचा ताळेबंद माझ्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न करीन. त्याचप्रमाणे अपयश जर आले असेल तर ते अपयश कोणत्या कारणांनी आले याची मला सापडणारी जी कारणं आहेत ती विशद करण्याचा मी प्रयत्न करीन, त्यातून माझ्या पुढच्या व्याख्यानाचं एक सूत्र हाती येऊन शकेल अशी माझी अपेक्षा आहे.

यशवंतरावांनी केलेली मांडणी १०० टक्के प्रत्यक्षात आलेली आहे अशी माझी धारणा नाही. हे मी सुरुवातीस यासाठी सांगतोय की जन्मदिनी भाषण देत असताना कदाचित कुणाला असे वाटेल मी केवळ गौरव करण्यासाठी इथं उभा आहे. प्रश्न तो नाही. हा नेता एवढा थोर आहे की त्याच्या अपयशातसुद्धा त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे. आणि अपयशाची मीमांसा होणंसुद्दा आज यासारख्या वैचारिक व्यासपीठावरून आवश्यक आहे, असे प्रमाणिकपणे मानणारा मी माणूस आहे. त्यामुळेच विकासाच्या त्यांच्या संकल्पनेची मांडणी करीत असताना मी प्रथम सर्व तपशीलांसह त्यांना अभिप्रेत असलेला विकासाचा आराखडा आपल्यासमोर ठेवीन. त्यानंतर यशापयश आपण पाहू. आणि मगा य़शापयशाची मीमांसा व्याख्यानाच्या शेवटी करू.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org