व्याख्यानमाला-१९९२-१

अंतरंग

विषय : “आपल्या विकासाची दिशा आणि लोकशाहीचे भवितव्य”
प्रतिपादन : डॉ. भाल. ल. भोळे, नागपूर विद्यापीठ, नागपूर

* १२ मार्च – मा. यशवंतराव चव्हाण यांची विकासविषयक संकल्पनाः अपेक्षा व फलश्रुती

* १३ मार्च – विकासाचा विनाशकारी नमुना

* १४ मार्च – विकासाचे पर्यायी प्रतिमान

व्याख्यात्यांचा परिचय

डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे यांचा जन्म १९४२ साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण जळगांव जिल्ह्यातील वरणगांव येथे झाले. त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन व विश्यविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. १९६२ साली त्यांनी बी. ए. ची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून राज्यशास्त्र हा विषय घेवून ते १९६४ साली प्रथम श्रेणीतच एम. ए. झाले. पुढे त्यांनी ‘भारतीय शेतकरी कामगार पक्ष’ या तत्कालीन महत्वाचे विषयावर १९८२ साली नागपूर विद्यापीठास प्रबंध सादर केला आणि ते पीएच. डी. झाले.

ज्ञानलालसेतून त्यांनी अध्यापनाचा पवित्र व्यवसाय जाणीव पूर्वक निवडला आणि त्याप्रमाणे सुरवातीस पदवीपर्यंतचे अध्यापन कार्य औरंगाबाद येथे केले. १९७० सालापासून त्यांनी नागपूर विद्यापीठात राज्यशास्त्राचे पदव्युत्तर अध्यापन केले. सध्या ते तेथे राज्यशास्त्राचे प्रपाठक आणि विभाग प्रमुख म्हणून दुहेरी जबाबदारी पूर्ण कार्यक्षमतेने पार पाडीत आहेत.

साहित्यातील त्यांची कामगिरीही नजरेत भरण्यासारखी झालेली आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नियतकालिकामधून त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व वाङमयीन विषयावर शेकडो लेख प्रसिद्ध झालेले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, आजचा सुधारक, शब्दसंगत, विचारशलाका, पर्याय, इत्यादि वैचारिक  नियतकालिकांचे सल्लागार व संपादक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे. तेसच ‘युगवाणी’ आणि ‘अक्षरवैदर्भी’ या वाङमयीन नियतकालिकांचे संपादनाशी संबंधित म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. आजपर्यंत विविध विषयावरील त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झालेली असून बारावीपासून एम. ए. पर्यंतच्या राज्यशास्त्राचे अभ्यासास त्यापैकी काही नेमलेली आहेत. त्यांच्या “म. जोतिराव फुलेः वारसा व वसा” या पुस्तकास १९९१ मध्ये ‘चेतश्री’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या याच पुस्तकास १९९१-९२ सालचा ‘महात्मा जोतिराव फुले पुरस्कार’ महाराष्ट्र शासनाने नुकताच जाहीर केलेला आहे. तसेच त्यांनी ‘महादेव गोविंद रानडे’ व ‘इस्लामसंबंधी एक आधुनिक दृष्टीकोन’ हे दोन ग्रंथ अनुवादित केलेले आहेत.

सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान संस्था, दलित चळवळ, हुंडाविरोधी आघाडी या व अशा सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. त्याशिवाय त्यांनी मराठी विश्वकोषाच्या संपादक मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य दर्शनिका समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाच्या इतिहास समितीचे सदस्य – क्रमिक पुस्तके निर्मितीत प्रमुख सहभागदार, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य, जनसाहित्य संमेलन (अमरावती) अध्यक्ष, विदर्भ साहित्यसंघ कार्यकारिणी सदस्य – उपाध्यक्ष, यसवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शास्त्रज्ञ समितीचा सदस्य, महाराष्ट्र राज्य शास्त्र परिषदेच्या १२ व्या अधिवेशनाचे अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र विधीपीठाच्या (जळगांव) राज्यशास्त्र मंडळाचा सदस्य आदि जबाबदा-या सांभाळून सन्मान प्राप्त केला आहे.

महाराष्ट्रातील एक थो साहित्यिक, परखड विचारवंत, राज्यशास्त्रातील गाढे अभ्यासक – व्यासंगी म्हणून आणि विशेषतः आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वसमावेशक वृत्तीवर आणि चतुरस्त्र नेतृत्वावर श्रद्धा, विश्वास व नितांत आदर असलेली एक प्रमुख व्यक्ती म्हणून ते सर्वत्र ओळखले जातात.

पी. डी. पाटील
नगराध्यक्ष

पत्ता :
डॉ. भा. ल. भोळे,
राज्यशास्त्र विभाग प्रमुख,
नागपूर विद्यापीठ,
नागपूर – ४४० ०३२

 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org