राष्ट्रीय उभारणीचे किंवा राष्ट्रैक्यभावना निर्माण करण्याचे काम हा राजकारणाचे एक प्रधान अंग झालेले आहे. याचे कारण विकसनशील देशामधले हे जे परंपरागत समाज आहेत ते जाती, धर्म आणि इतर वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेले आहेत. आणि माणसाचे जीवन हे त्या विवक्षित गटानुसार ठरते आणि व्यापक राष्ट्रीय निष्ठा नव्याने निर्माण करावयाची आहे. आणि ती कशी निर्माण करावयाची याच्यावरून राजकारणाचे स्वरूप ठरते. त्याचे दोन पर्यायी मार्ग आहेत. एक मार्ग असा की अशी एक कणखर जबरदस्त हुकूमत, अशी एक मजबूत सत्ता प्रस्थापित करायची की त्या सत्तेने, कायद्याने आणि दंडुकेशाहीने भाषेविषयीची निष्ठा, प्रांताविषयीची निष्ठा, धर्माविषयीची निष्ठा ह्या सगळ्या संकुचित निष्ठा दडपून टाकायच्या आणि फक्त माझे राष्ट्र एवढी एकच निष्ठा लोकांच्यामध्ये बाणवायची. आक्रमक राष्ट्रवादी असे हे धोरण होईल. आणि त्यासाठी इतर सर्व निष्ठांच्यावरती वरवंटा फिरवण्याचे काम करावे लागेल. इतिहासामध्ये अशी उदाहरणे आहेत. मुसोलिनीचे आहे. हिटलरचे आहे. इतर कोणत्याही निष्ठा या तेवढ्या संकुचित आहेत. फक्त राष्ट्राचीच निष्ठा किंवा धर्माचीच निष्ठा तेवढी महत्त्वाची, बाकीच्या सगळ्या निष्ठा या निरर्थक आहेत असे म्हणून त्या कायद्याने आणि दमनाने दडपून टाकणे आणि एकच निष्ठा लोकांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग विविधतेतून एकता साधण्याचा. तो भारतानं स्वीकारलेला आहे. भारतामध्ये अनेक धर्म आहेत. अनेक भाषा आहेत, प्रादेशिक अहंता आहे. या सगळ्या अहंता आणि अस्मिता आपापल्या मर्यादेत जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचे स्वागत करायला काहीच हरकत नाही आणि त्या दडपून टाकण्याचा प्रयत्न करू नये. किंबहुना या सगळ्यांच्या विविधतेतून राष्ट्रीय एकतेला काही एक वेगळी शक्ती कशी निर्माण करून घेता येईल याचा विचार हा तो दुसरा मार्ग आपल्या सगळ्या राष्ट्रवादी आंदोलनाची हीच परंपरा राहिलेली आहे. काँग्रेसची हीच परंपरा राहिलेली आहे. गांधी, नेहरू आधीचे नेते यांचीही हीच परंपरा राहिलेली आहे की, भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे. अनेकविध वेगळेपणाने नटलेला हा समाज आहे. आणि हे आमचे भूषण आहे, ही आमची शक्ती आहे. कोणत्याही फुलाच्या जशा अनेक पाकळ्या असतात पण त्या सगळ्या पाकळ्यांचे मिळून फूल होते त्याप्रमाणे अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक इतर वैविध्ये असली तरी त्या सगळ्यांचे मिळून एक भारतीय मानस, एक भारतीय अस्मिता, एक भारतीय एतद्देशिय भावना अशी आपल्यास निर्माण करावयाची आहे. हा दुसरा मार्ग झाला. आता या दोन मार्गांपैकी कोणत्याही एकाचा अवलंब करणा-या समाजामध्ये राजकारणाचे स्वरूप मूलतः भिन्न होईल की नाही? एका ठिकाणी हुकूमशाहीचे राजकारण चालेल तर दुसरीकडे लोकशाहीचे व व्यक्ती स्वातंत्र्याधिष्ठित राजकारण चालेल. लोकांना मोकळेपणाने आपल्या भाषेचा अभिमान व्यक्त करता येईल. आपल्या धर्माचा अभिमान व्यक्त करता येईल. आपापल्या मर्यादेमधील सगळे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य व्यक्तीला मिळेल व त्यामुळे राजकारणाचे स्वरूप मूलतः बदलेल.