व्याख्यानमाला-१९९०-४ (18)

प्रत्येक माणसाला कुठेतरी अशी जीवनामध्ये जुन्याची आणि नव्याची सांगड घालून आपले जीवन अधिक सुसह्य करावेसे वाटते. नाहीतर जुन्यानव्याचा हा संघर्ष वैचारिक आणि वर्तनाच्या पातळीवर त्याला पेलणार नाही इतका प्रचंड आहे आणि म्हणून भारतीय राजकारणाचा अभ्यास करताना भारतीय समाज परंपरानिष्ठ आहे असे ढोबळ विधान करून चालणार नाही. तो आधुनिक बनलेला नाही हे मान्य करायला तर काही कोणाचीच हरकत नाही तर परंपरेपैकी काही जपण्याचा प्रयत्न करणारा पण आधुनिकतेकडे प्रवास करणारा असा हा समाज आहे. आणि त्या परंपरेपैकी काही जतन करण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे. आधुनिकतेकडे चाललेल्या प्रवासात उपयोगी पडेल म्हणून त्यांनी आपल्याबरोबर जे सांस्कृतिक पाथेय घेतलेले आहे, गाठोडे घेतलेले आहे परंपरेचे. त्यातल्या ज्या वस्तू आहेत त्यातल्या प्रवासात कोणत्या उपयोगी पडतील, कोणत्यांची अडचण होणार आहे याच्यासंबंधीचा निर्णय होत नाही म्हणून समाजजीवनामध्ये हे संघर्ष निर्माण झालेले आहेत. कोणाला वाटते हिंदू परंपरेचे गाठोडे आपल्याबरोबर घेतल्याशिवाय भारताचे भारतीयत्व शिल्लक राहणार नाही. काहींना असे वाटते की, तसे नाही. वेगवेगळ्या धर्माचे बनलेले हे जे राष्ट्र आहे त्यामध्ये जर सर्वांना बरोबर घेऊन जायचं असेल तर धर्म ही वैयक्तिक जीवनापुरती मर्यादित बाब ठेवली पाहिजे. सार्वजनिक आणि राजकीय वर्तनाचा पाया धर्माला करता कामा नये असा दुसरा विचार मांडला जातो आहे. मग हा कशाचा विचार आहे? शेवटी आपण आधुनिकतेकडे जाण्यासाठी सुरू केलेल्या प्रवासात परंपरेतले नेमके काय उपयोगी पडेल आणि काय उपयोगी पडणार नाही. याच्यासंबंधी चाललेल्या वादंगाचा हा भाग आहे. स्वातंत्र्यलढा ज्यावेळी चालू होता त्यावेळच्या भारतीय राष्ट्रवादामध्ये हेच होतं. मग टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचते. महात्मा गांधींना रामराज्य संकल्पना सुचते. राजकीय पुढा-याला कुठेतरी आपला सांधा भूतकाळाशी जोडावा लागतो. असे करणे हे अपरिहार्य असते आणि राजकारणाचे स्वरूप हे त्याच्यामधूनच ठरत असते. म्हणून राजकारणाचा अभ्यास करायचा. त्यावेळेला राष्ट्रवादी का यशस्वी झाले आणि बुद्धिवादी नेमस्त का झाले नाहीत, हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे. ज्या नेमस्तांना आपल्या जुन्या समाजातले काहीच पटत नव्हते. “जुने जाऊ द्या मरणा लागूनी” असे म्हनून नवतेची तुतारी पुकारणारे जे लोक होते ते काही प्रामाणिक नव्हते असे नाही. ते राष्ट्रभक्त नव्हते असे नाही. परंतु त्यांना समाजाचा पाठिंबा न मिळण्याचे कारण समाजाला परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालून देणारा विचार हवा होता आणि तो आधुनिक राष्ट्रवादाने मिळाला. टिळकांच्यामुळे त्याला फार व्यापक पाया मिळाला. गांधींनी तो त्यांच्याही पुढे नेवून शेतक-यांच्यापर्यंत पोहोचविला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org