व्याख्यानमाला-१९९०-४ (17)

चातुर्वर्ण व्यवस्था जोपर्यंत भक्कम होती तोपर्यंत जन्मसिद्ध आणि कर्मविपाकाने जन्म मिळायचा. ठरलेल्या वर्णव्यवस्थेमध्ये, ठरलेल्या जातीमध्ये आणि ज्या जातीत जन्म झाला त्या जातीनुसार हक्कही ठरायचे, कर्तव्येही ठरायची आणि ही सर्वांनी मान्य केलेली हक्क आणि कर्तव्ये असल्याकारणाने कुणीही दुस-याच्या वाटेवर जाऊन त्याच्या हक्कावर बळजबरी करणे किंवा त्याची नसलेली कर्तव्ये त्याच्यावरती लादणे हेही फारसे होत नसे आणि त्याच्यामुळे काल मी म्हटलं की स्वा-या आल्या नि गेल्या. साम्राज्ये उदयाला आली आणि अस्ताला गेली. टोळधाड यावी तशा सैनिकानी या टोकापासून या भारतवर्षाच्या दुस-या टोकापर्यंत स्वा-या करून मुलुखगिरी केली पण सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये तात्पुरती जी काही वळवळ पृष्ठभागावरती झाली तेवढीच. ती चलबिचल सोडली तर शेकडो वर्षे हे असेच चालले. त्याच्यामुळे भारतीय समाजामध्ये मध्यवर्ती राजकीय केंद्र असे कधी निर्माण होऊ शकले नाही. मध्यवर्ती राजकीय केंद्र की ज्या केंद्रामधून हुकूम निघतो आणि त्या आज्ञेचे पालन होते. “Political Centre” असे निर्माण झाले नाही. बहुसंख्य लोकांचा धर्म एक असल्या कारणाने आणि इतर धर्मातले बहुसंख्य लोक हिंदू धर्मातून धर्मांतर करूनच गेलेले असल्याकारणाने सांस्कृतिक विचारांचा पाया जवळ जवळ सगळ्या धर्मामध्ये पसरला. परंतु धर्मातीत जातीव्यवस्थेपलिकडचा सर्वाना आपलासा वाटणारा असा एक राजकीय केंद्रासंबंधीचा, आत्मभावनेचा भाग निर्माण होऊ शकला नाही. जो स्वातंत्र्यानंतर करावा लागत आहे. आणि हे काम कधी सामोपचाराने तर कधी जबरदस्तीने शासनाला करावे लागत आहे हा एक भाग झाला. “The Failure of ancient India to create a Political Centre” दुसरा भाग असा आहे की, भारत हा परंपरानिष्ठ समाज असल्याकारणाने आणि लोकशाही ही आधुनिक संकल्पना असल्याकारणाने भारतामध्ये लोकशाही यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे, असा काही अभ्यासकांचा विचार आहे. समाज शास्त्राच्या अभ्यासकांमध्ये असा विचार रूढ होतो आहे की, परंपरा आणि नवता, परंपरा आणि आधुनिकता ही दोन टोकं नसून ती एक रेषा आहे आणि कुठलाही समाज या टोकाला किंवा त्या टोकाला असत नाही. तर ही दोन टोके जोडणारी जी रेघ आहे त्या रेघेवरती कुठेतरी असतो. कधी परंपरेच्याजवळ असतो तर कधी नवतेच्या किंवा आधुनिकतेच्या जवळ असतो. त्याहूनही अधिक शास्त्रशुद्ध विधान करायचे तर प्रत्येक समाज काही क्षेत्रामध्ये परंपरेच्या जवळ असतो. आणि त्याचवेळी इतर काही क्षेत्रात आधुनिकतेच्या जवळ असतो. घरामध्ये नवा टी. व्ही. आणला की पहिल्यांदा लोक त्याला हळदकुंकू वाहतात. मोटारगाडी घेतली की त्याला कुंकू लावतात. मला तर मुंबईमध्ये एका महाविद्यालयामध्ये त्यांनी नवा कॉम्प्युटर घेतला तेव्हा त्याच्या उद्घाटनासाठी बोलावले आणि त्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी मला आधी त्याला कुंकू लावा म्हणून सांगीतले. मी म्हटले लावणार नाही. प्रत्येक समाज शेवटी आपले जीवन कमीत कमी विरोधी करण्यासाठी आपल्याला ज्या विरोधी वाटतात अशा गोष्टींची सांगड घालत असतो. आपण आधुनिक उपकरणे वापरतो पण आपले मन काही पुरेसे आधुनिक झालेले नसते. कुठेतरी पूर्वीचे संस्कार आपल्यावरती असतात आणि त्याच्यामुळे आपण त्यांची सांगड घालतो. कुठल्याही संस्कृतीत असेच होते आणि मग त्या परंपरेची म्हणून काहीतरी एक शक्ती एक ताकद निर्माण होते. नाही तरी संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्सवर चालणारे जहाज ज्यावेळी त्याचे अनावरण करतात त्यावेळी पाश्चात्य देशात शँपेनची बाटली फोडतात आणि आपण नारळ फोडतो म्हणजे ते करत नाहीत, आपणच करतो असे नव्हे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org