व्याख्यानमाला-१९९०-४ (10)

विकेंद्रीकरण वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीने होते आणि म्हणून राजकारणाचे स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला दिसून येते. राजकारणाचा अभ्यास करण्याची एक दिशा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण झाले आहे की नाही, किती प्रमाणात झालेय, ते कसे झालेय. लगेच तुम्हाला एक महत्त्वाचा असा निकष हातामध्ये मिळाला. राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी समाजामध्ये फार दूरवर आणि खोलवर पोहोचण्याचे काम राज्यसंस्था तिच्या प्रशासनामार्फत करते. अशा प्रशासन संस्थांचे आडवे उभे जाळे विणणे ही विकसनशील राष्ट्रापुढली फार महत्त्वाची गरज असते. आणि व्यक्तीचे जीवन जेवढे अशा आडव्या उभ्या धाग्यांनी घट्ट विणलेल्या स्वरूपाचे असेल तेवढा त्या देशाच्या राजकारणाला, लोकशाहीला विस्तृत व खोल आधार निर्माण होईल. आपल्याकडेसुद्धा असे दिसते की, मधल्या स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्या अतिशय तकलादू आहेत. म्हणून असहाय्य नागरिक एकटा आणि त्या जाणिवेपायी भयग्रस्त झालेला आढळतो. असा नागरिक एका बाजूला आणि प्रचंड सत्तेचे केंद्रीकरण झालेली राज्यसंस्था दुस-या बाजूला यांच्यामध्ये मध्यस्थी करणा-या संस्था आपल्याला निर्माण करायला पाहिजेत. जिल्हा परिषदा तेवढ्याकरिताच केलेल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ते कार्य असते. पण जर पंधरा पंधरा वर्षे जर त्यांच्या निवडणुकाच घेतल्या नाहीत तर व्यक्तीमधील असहाय्यता वाढत जाते. व्यक्तिमधली एकलेपणाची भावना वाढत जाते आणि त्याच्यामधून मग भलभलत्या विचारांचे आकर्षण व्यक्तीला वाटू लागते. हुकूमशाहीच्या वृत्तीचेसुद्धा आकर्षण वाटू लागते कारण कुठेतरी माणूस सुरक्षितता शोधीत असतो. भारत हा विकसनशील देश आहे हे आपण पाहिलंत. त्यामुळे या देशापुढेसुद्धा या पाच समस्या आहेत. त्या पाचापैकी जर डावे उजवे करायचे म्हटले व अग्रक्रम लावायचा म्हटला तर तीन गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. त्या तीन गोष्टी म्हणजे राष्ट्रीय ऐक्य भावना संवर्धन, राजकीय सहभागात वाढ आणि आर्थिक विकास आणि त्याचे न्याय्य वाटप. आता तुम्हाला भारतीय राजकारणाचा अभ्यास या तीन गोष्टींच्याकडे पाहून करायला सुरवात करता येईल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org