व्याख्यानमाला-१९८९-३८

मित्र हो, जोतिराव फुल्यांनी ज्या सामाजिक समतेचा आग्रह धऱला ती सामाजिक समता आमच्या शिक्षणामध्ये नाही, ती समाजात येणार नाही ! ज्या शिक्षणामुळे आम्ही एक नवा माणूस बनवितो तिथेच आम्ही समता आणलेली नाही. समाजात ते दिसणार नाही. आणि म्हणून आर्थिक दृष्टया धनदांडग्यांच्या हातात आम्ही चिपळूणकरांनी सांगितलेल्या ज्ञानाच्या किल्ल्या देत आहोत. जोतिराव फुल्यांच्या चळवळीला संकुचित करणारा हा आजचा सामाजिक संदर्भ आहे.

म्हणून जोतिराव फुले शेतक-यांच्या आसूडमध्ये सरकारला ज्या सूचना देतात, त्या वाचतांना मला आठवलं की शिवाजी महाराज एका आज्ञापत्रांत लिहितात की, शेतक-यांच्या कणसाला हात लावू नका, शेतक-याच्या सुतळीच्या तोड्याला हात लावू नका. तुम्ही जेव्हा झोपाल तेव्हा तुमचे दिवे मालवून झोपा, नाहीत काय होईल उंदीर तुमच्या दिव्यातील वात तोंडात पकडेल आणि शेतक-यांची कडव्याची गुंज जळून खाक होईल. ऐसे करु नका. वनविभागाच्या बाबतीत सुद्धा शिवाजी महाराजांनी जे मुद्दे मांडलेत तेच जोतिराव फुले मांडतात. म्हणजे वनखात्याचा अभ्यास, कृषि खात्याचा अभ्यास, जलसंपत्तीचा अभ्यास, शिक्षणाचा अभ्यास, स्त्रियांच्या शिक्षणाचा अभ्यास, सामान्य माणसाला मदत करण्याचा अभ्यास.

चांगल्या राजकारणाची व्याख्या काय? चांगलं राजकारण कशाला म्हणतात जे सर्वांसाठी उपयोगी आहे. चांगलं आहे. त्यालाच चांगलं राजकारण म्हणतात. जे उपयोगी आहे, स्वत:साठी चांगलं आहे त्याला लोकशाहीत सुद्धा वाईट राजकारण म्हणतात. जोतिराव फुल्यांनी या सबंध चळवळीमधून सामान्य माणसाला मदत  करण्याचं राजकारण केलं. १८८३ साली  "डयुक ऑफ कॅनॉट" जेव्हा पुण्याला आला. राणी व्हिक्टोरियाचा मुलगा ड्युक ऑफ कॅनॉट; हा ड्यूक ऑफ कॅनॉट जेव्हा आला तेव्हा हरी चिपळूणकरांनी एक मोठा समारंभ पुण्यामध्ये भरविला. स्वागत समारंभ, राजपुत्राचा स्वागत समारंभ, आणि संबंध सरंजामदारांना, देशमुखांना, जहागिरदारांना, इनामदारांना निमंत्रणे पाठविली. जोतिराव फुले पुण्यामधील बडी आसामी असल्यामुळे जोतिराव फुल्यांना सुद्धा ते निमंत्रण गेले.

जोतिराव फुले राजपुत्राच्या समारंभास कसे जावेत? लंगोटी, हातात काठी खांद्यावर घोंगडी, वाराबंडी, मुंडासं, खिशात निमंत्रणपत्रिका निघाले. पोलीसांनी अडवलं. त्यांची अडचण झाली. आता सोडाव तर हा माणूस काय भिकार पोशाखात आलाय. राजपुत्राचा स्वागत समारंभ, हा माणूस कोण? तेवढ्यात हरि चिपळूणकरांनी पाहिले. ते धावत धावत आले नी त्यांना सन्मानानं व्यासपीठावर नेलं. १८८३ सालाची गोष्ट. जोतिराव फुले अस्खलीत इंग्रजीमध्ये पंधरा मिनिटे राजपुत्राला उद्देशून बोलले. काय बोलले? पुणे मतदारसंघातून तिकीट द्या म्हणाले ? नाही. जोतिराव फुले असे म्हणाले की "ड्यूक ऑफ कॅनॉट, तुझ्या आईचे राज्य आमच्यावर चालू आहे. तुझ्या आईच्या साम्राज्यामध्ये असं म्हणतात सूर्य सुद्धा मावळत नाही. जेव्हा तू इंग्लडला जाशील तेव्हा तुझ्या आईला आमचा निरोप सांग. आई, ज्या मोठ्या देशावर आपलं राज्य चालू आहे. त्या देशातील ९७% टक्के रयत गुराढोरांसारखी निरक्षर आहे."

तिकडे सात समुद्राच्या पलिकडे आई तरी होती. इथं आता स्वातंत्र्यानंतर ४२ वर्षे आईही राहिलेली नाही. सातासमुद्राच्या पलिकडच्या इंग्रजांच्या विषयी एक उदाहरण मी आपल्याला सांगतो. १८५७ सालचं बंड आपल्या लक्षात आहे. ज्याला जोतिराव फुले बंड म्हणत नाहीत. हे बंड ज्याला काहीच मिळत नाही. म्हणून झालेलं बंड होतं. तर १८५७ सालची दुसरी घटना आम्हाला माहिती नाही. १८५७ साली धारवाडला एक प्रसंग घडला. अस्पृश्य समाजातला एक माणूस त्याने आपल्या पाच-सहा वर्षाच्या मुलाला घेतलं, त्याचं बोट धरलं आणि शाळेत गेला. मुख्याध्यापकाला म्हणाला, मला माझ्या तुमच्या शाळेत शिकवायचं आहे. मुख्याध्यापक ब्राह्मण गृहस्थ होते. ते म्हणाले, अरे बाबा तुझ्या मुलाला मी जर प्रवेश दिला तर सवर्णांची मुलं येणार नाहीत. शाळा बंद पडेल. मग आमचं काय? पण तो ब्राम्हण जरी असला तरी त्या मुख्याध्यापकामधला जो शिक्षक  होता त्याच्या बुद्धीला पटलं नाही. म्हणून त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं की माझ्या शाळेमध्ये असा एक प्रसंग घडलेला आहे. अस्पृश्य समाजातला मुलगा आहे त्याला शाळेत प्रवेश पाहिजे आहे. पण सामाजिक स्थिती अशी आहे की, त्या मुलाला मी जर प्रवेश दिला तर सवर्णांची मुलं येणार नाहीत. की काय करु ते सांगा. गव्हर्नरनी पत्र पाहिलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org