व्याख्यानमाला-१९८९-३५

'सार्वजनिक सत्यधर्मामध्ये' मानवी हक्काचा आणि मानवी प्रतिष्ठचा आग्रह आहे. नवमानवतावादाचा आशय कॉर्लमार्क्सने जरूर दिला असेल. भारतामध्ये मानवेंद्र रॉयनी नवमानवतावाद सांगितला असेल, तर मानवेंद्र रॉयच्या अगोदर जोतिराव फुल्यांनी नवमानवतावाद सांगीतला आहे. हे जे मी म्हणालो याच्यामध्ये काडीचाही अतिशयोक्ती नाही. मी समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपल्याला हे सांगतो. जेव्हा त्या सार्वजनिक सत्यधर्मातील जंत्री आपण पाहतो. तर मला असं वाटतं., 'ही तर आमची भारतीय राज्यघटना आहे.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर  हे तर घटनातज्ञ होते, बॅरिस्टर होते, डॉक्टर होते. पी. एच्. डी. होते, डॉक्टर ऑफ सायन्स होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्यांचे अलेक्झांडर होते. त्यांनी राज्यघटनेमध्ये जागतिक पातळीवरच्या सुंदर लोकशाहीचा आशय ओतण्याचा प्रयत्न केला. आपल्या राज्यघटनेमध्ये आमची राज्यघटना निर्माण होण्याच्या पाऊणशेवर्षे अगोदर जोतिराव फुल्यांनी जे जे सांगीतलं ते ते आमच्या भारतीय राज्यघटनेमध्ये आणावं लागलं. द्रष्टे पुरुष आपल्या काळाच्या पुढे असतात हे जोतिराव फुल्यांनी सिद्ध केलं.

सामन्य माणसं आपल्या पोटापुरतं पाहतात, आणि त्यालाच ते राष्ट्र म्हणतात. आपल पोट म्हणजेच राष्ट्र. जोतिराव फुल्यांची 'सार्वजनिक सत्यधर्मा' मधील व्याख्या फार सुंदर आहे. राष्ट्र म्हणजे काय? 'राष्ट्र म्हणजे एकमय लोक' शब्दरचना बघा किती सोपी आहे. राष्ट्र म्हणजे एकमय लोक. एका भूखंडामध्ये राहणारी सगळी माणसे जेव्हा आम्ही सगळे एक आहोत. एकमय शब्दाचा अर्थ काय? एकमय शब्दाचा अर्थ असा की, एका विशिष्ट मातीच्या  तुकड्यावर राहणारी माणसं जेव्हा आम्ही सगळे एक आहोत असे राहतात तेव्हा त्याला एकमय म्हणतात. जोतिराव फुल्यांनी राष्ट्रवादाचा जन्म आकाराला येत असतांना राष्ट्राची अतिशय सुंदर व्याख्या केली. राष्ट्र म्हणजे एकमय लोक.

आपल्याकडे राष्ट्र एक आहे पण लोक मात्र अनेक आहेत. आपल्या समाज व्यवस्थेचं वैशिष्टय असं की, आपल्या देशात पांच हजार जाती आहेत. साधं-सुधं कांहीच नाही. इंडियामध्ये तेहतीस कोटी देव, प्रचंडदेव, कमतरताच नाही, संतोषी माता, आता दलित बायकांच्या अंगात बाबासाहेब येऊ लागलेत झाले बाबासाहेब देव, मोठ्या माणसाला आम्ही सोडत नाही. कुणाच्या अंगात आता शिवाजी महाराज यायला लागलेत. तुम्ही ऐकताय आता. कुणाच्या अंगात जयभवानी आली. तेहतीस कोटी देव, आमच्या देशातील जातींची लोकसंख्या पाच हजार, १९८६ साली भारताची लोकसंख्या पंच्याऐंशी कोटी. सालांची आणि लोकसंख्येची अशी स्पर्धा चालू आहे. पंच्याऐंशी कोटी लोक त्यांच्या पाच हजार जाती, या पांच हजार जातीच्या डोक्यावर ब्राह्मण एका महाराष्ट्रामध्ये ४२ भटक्या जमाती.

भारतामधील ब्राह्मणांमध्ये किती पोटजाती आहेत. नऊशे पोटजाती. म्हणजे ब्राह्मण तरी एक आहेत काय? देशस्थ ब्राह्मण थोडे जवळ आहेत. पण कोकणस्थ चित्तपावन यांच वेगळच चालतं. कोकणस्थ आणि चित्तपावन ब्राह्मण काय म्हणाले, आम्ही सगळ्या ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहोत. म्हणाले का? डायरेक्ट परशुरामाचे वंशज आहोत म्हणाले. मध्ये आधी नाही. माणसांचे वंशज नाहीत परशुराम? आणि या परशुरामाचे शिवधनुष्य सीतेने पळविले, आणि सीतेला रावणाने पळविले कमाल आहे एवढ्या चिमुरड्या पोरीची. परशुरामाचे शिवधनुष्य तिनं घोडा म्हणून घेतल. म्हणजे परशुराम एवढा श्रेष्ठ होता मग आमची चिमुरडी सीता. हे शिवधनुष्य घेऊन रावण जेव्हा उभा राहिला तेव्हा ते शिवधनुष्य रावणाच्या उरावर पडलं. ( हे जोतिराव फुल्यांच म्हणणं आहे, माझ मत सांगत नाही मी इथं.) म्हणजे चिमुरड्या पोरीने जे शिवधनुष्य काठीत घोडा उडविण्यासाठी खेळलं, ते शिवधनुष्य रावणाच्या छातीवर पडलं. म्हणजे रावण सीतेला घेऊन गेला. सीतने शिवधनुष्य उचललं आणि सीतेला रावण घेऊन गेला. कळलं? याला ब्रह्मभोग म्हणतात.

जोतिराव फुल्यांनी सांगीतलं हे सगळं रामायण. 'सार्वजनिक सत्यधर्म' हे पुस्तक तु्मही जर वाटलं तर आपणाला पटायला लागतं, लॉजिकली किती क्लॅरिटी आहे जोतिराव फुल्यांच्या या विचारात लॉजिकली, साईन्टिफिकली ही थिअरी क्लिअर, माणूसपणाचं तत्त्व जोतिराव फुले कुठं सोडत नाहीत. त्यांच्या संबंध विचाराला बुद्धीवादाचा पाया आहे. आणि म्हणून ते गीतेला उत्तर देताना म्हणतात.  "श्रीकृष्ण हा जर तुमचा ईश्वर आहे, तर हा मथुरेच्या गौळणी जेव्हा नदीमध्ये नागव्या होऊन स्नान करतात तेव्हा हा श्रीकृष्ण त्यांची लुगडी घेऊन लपून बसतो. याला ईश्वर म्हणता?"

जोतिराव फुले असं म्हणतात की जगामधला कुठलाही धर्म शेवटचा नाही आणि जगामधल्या धर्म ग्रंथामध्ये जे सांगीतलंय ते अंतीम सत्य नाही. बुद्ध हेच म्हणतो, कुठलाही वाद हे सततचे विकसित होणारे तत्त्वज्ञान असते. जोतिराव फुले यांचे संबंध विचार सामाजिक क्रांतीचे महाविज्ञान आहे. त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की इंग्रजीमध्ये लिहिलं की फार चांगलं संस्कृत मधून लिहिलं की त्याहून फार चांगलं आणि आपल्या सोप्या भाषेत लिहिलं की फार वाईट, उथळ आहे. जोतिराव फुल्यांनी आपल्या महाराष्ट्रातला जो ९७ टक्के समाज जी भाषा बोलतो, त्याच्या जिभेवरती जी भाषा खेळते, जी लाखो लाखो माणसांचा श्वास आहे त्या त्या भाषेमध्ये शब्दांना प्राण दिला आणि सर्वसामान्य माणसाच्या दु:खांना वाचा फोडली. तोफेतून सुटलेल्या गोळ्यासारखा तो विचार भिडतो आपणाला आणि वाटायला लागतं की जोतिरावांचा विचार बरोबर आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org